मराठी माणसाच्या मनात, महाराष्ट्राच्या मातीत ख्...

मराठी माणसाच्या मनात, महाराष्ट्राच्या मातीत ख्रिस्त प्रथम रूजला अहमदनगरमध्ये… (When Christ appeared in Maharashtra first)

मराठी माणसाच्या मनात, महाराष्ट्राच्या मातीत ख्रिस्त प्रथम रूजवला गेला तो अहमदनगरमध्ये. नंतर राज्यातील अन्य शहरांत ख्रिस्ती धर्म पसरला. ख्रिस्तविचारांना याच भूमीत मराठी चेहरा मिळाला.  त्यामुळेच ‘महाराष्ट्रातील जेरूसलेम किंवा येरूसलेम’ म्हणून हे शहर ओळखलं जातं. १८९ वर्षांची ही परंपरा नगरमधील ख्रिस्ती समाजाने आजही जपली आहे….

मुंबईत १८१३ मध्ये मिशनऱ्यांचं पहिलं पाऊल पडलं. दीनदुबळ्यांची सेवा करण्याच्या उद्देशानं त्यातील काही जण १८३३ मध्ये नगरला आले. तेव्हा दुष्काळ आणि साथीचे रोग नित्याचे होते. शोषित, पीडित आणि वंचितांना मिशनऱ्यांचा मोठा आधार मिळाला. शाळा सुरू करून ज्ञानाची कवाडं मिशनऱ्यांनी खुली केली. मराठीतील पहिलं नियतकालिक ‘दर्पण’नंतर अवघ्या दहा वर्षांत १८४२ मध्ये नगरला ‘ज्ञानोदय’ सुरू झालं.  महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये मुलींची एतद्देशीय पहिली शाळा पुण्यात सुरू करण्याआधी मिशनरी नगरमध्ये उत्तम प्रकारे मुलींची शाळा चालवत होते. ‘दगडी दवाखान्या’च्या माध्यमातून मिशनऱ्यांनी आरोग्य सेवा सुरू केली. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा विकास ख्रिस्ती संस्थांनी केला. फादर बाखर यांनी देशाला दिशा देणारा पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवला तो नगरमधूनच. डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी जिल्ह्यातील पहिले कॉलेज नगरमध्ये सुरू केले. मिशनऱ्यांच्या सेवाकार्यामुळे अन्य धर्मातील अनेकजण ख्रिस्ती धर्मात आले.

इथल्या लोकांना येशू ख्रिस्त आपला वाटावा,  म्हणून मराठी व संस्कृत भाषा अनेक मिशनरी आणि पाद्री मंडळींनी आत्मसात केली. बायबलचा मराठी अनुवाद करणाऱ्या पंडिता रमाबाईंचा नगरशी जवळचा संबंध होता. रेव्हरंड नारायण वामन टिळकांनी ख्रिस्तावर अभंग लिहिले. ते कीर्तनं करत. त्यांनी लिहिलेली शेकडो पदं लोकांच्या ओठांवर रूळली,  आजही अनेक चर्चमध्ये टिळकांच्या रचना म्हटल्या जातात. टिळकांचे ‘ख्रिस्तायन’, ‘अभंगांजली’मुळे ख्रिस्त समजायला मोठी मदत झाली. टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी लिहिलेले ‘स्मृतिचित्रे’ हे मराठीतील स्त्रीने लिहिलेले पहिले आत्मचरित्र ठरलं…

नगरचा ख्रिस्ती समाज तत्कालीन रोम,  अमेरिका व इंग्लंड या देशांनुसार विभागला आहे. शंभरी ओलांडलेली अनेक गिरिजाघरं नगरमध्ये आहेत. हातमपुऱ्यातील गॉर्डन हॉल चर्च सर्वात जुनं. ते कमी पडू लागल्याने खिस्तगल्लीत नवं ह्यूम मेमोरिअल चर्च उभारण्यात आलं. ही वास्तू उभारणारा आर्किटेक्ट अमेरिकन होता, पण त्यानं नगरच्या निजामशाही वास्तूंचा अभ्यास करून मनोऱ्याऐवजी घुमट असलेले चर्च बांधले. भिंगारमधील सेंट जॉन चर्च, ख्राईस्ट चर्च, तारकपूरमधील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल, चितळे रस्त्यावरील ‘चर्च ऑफ लॅम्ब’ यांनी शंभरी ओलांडली आहे. 

नाताळ मोठ्या उत्साहात नगरमध्ये साजरा होतो. चर्च सजवले जातात, विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते. मध्यरात्री ख्रिस्ताचा जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. सकाळी प्रार्थना होते. फादर संदेश देतात. शहरातील सगळे चर्च ख्रिस्ती मंडळींनी भरून जातात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने उत्सवावर निर्बंध आहेत. मात्र, इथला ख्रिस्ती समाज प्रेम आणि शांतीचा संदेश देत, माणुसकीची शिकवण सदैव देत राहणार आहे…

मराठीत केली जाते उपासना
चर्चमध्ये मराठीतून उपासना सुरू करण्याचा मानही नगरकडे जातो. संतकवी ना. वा. टिळक, कृ. रा. सांगळे यांचे त्यात मोठे योगदान राहिले आहे. लॅटिनमधील विधींना नगरमध्ये भारतीय साज चढवला गेला. नंतर अन्यत्र त्याचे अनुकरण केले गेले. फादर स्टीफन्सन यांनी लिहिलेले ‘क्रिस्तपुराण रोमन लॅटिन लिपीत होते. ते मराठी देवनागरीत संपादित करण्याचे काम माझे (प्रा. प्रियदर्शन बंडेलू)  वडील एस. पी. बंडेलू यांनी केले.

नगरचा वैशिष्यपूर्ण नाताळ
महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेत नगर शहरात ख्रिस्ती समाज आणि चर्चची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे नाताळ मोठ्या उत्साहात आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. ख्रिस्ती मंडळींच्या अनेक संस्था, संघटना असून विविध क्षेत्रांत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्रातील जेरूसलेम’म्हणून हे शहर ओळखले जाऊ लागले.

‘ऐक्य सभे’ची प्रथा
अमेरिकन मिशन दरवर्षी ‘ऐक्य सभा’ नगरमध्ये आयोजित करत. नऊ चर्चेसच्या एकत्र येण्याने ‘ऐक्य’ ही संकल्पना अस्तित्वात आली. सर्व कुटुंबे आगगाडी, बैलगाडी किंवा पायी चालत दूर अंतरावरून येत. नगर म्हणजे त्यांच्यासाठी ‘येरुशलेम’ असे. रोमन कॅथोलिक, अमेरिकन मिशन, सोसायटी ऑफ प्रपोगेशन ऑफ गॉस्पल, सॅल्वेशन आर्मी, मेथोडिस्ट आदींचे धर्मप्रसारासह शैक्षणिक, सामाजिक कार्य नगर शहरात होत राहिले.