रुबीना दिलैकला दिग्दर्शकाने म्हटलं सफरचंदाची पे...

रुबीना दिलैकला दिग्दर्शकाने म्हटलं सफरचंदाची पेटी, अभिनयासंदर्भात दिला होता हा सल्ला (When a Director Told Rubina Dilaik ‘Seb ki Peti’, He Gave This Advice to Actress About Acting)

टीव्हीवरील छोटी बहू आणि किन्नर बहू या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या खतरों खिलाडी १२ मध्ये दिसत आहे. बिग बॉस १४ ची विजेती झाल्यापासून रुबीना कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे लाइमलाइटमध्ये राहत असते. काही दिवसांपूर्वीच तिने अर्ध या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

टीव्ही इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर रुबीना तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत होती. रुबीना आज टीव्हीची मोठी आणि टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते, पण तिचा इथपर्यंतचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या संघर्षाबद्दल खुलासा केला होता की,एकदा एका दिग्दर्शकाने तिला ‘अ‍ॅपल बॉक्स’ म्हणत अभिनयाबद्दल सल्ला दिला होता.

एका मुलाखतीत आपल्या करीअरबद्दल सांगताना रुबीनाने एका दिग्दर्शकाची गोष्ट सांगितली होती. त्या दिग्दर्शकाने आपल्यासोबत कसे असभ्य वर्तन केले ते सांगितले. रुबीना म्हणाली की, एकदा एका दिग्दर्शकाने मला सांगितले की मी चेहऱ्यावरुन खूप खाष्ट दिसते त्यामुळे मी नकारात्मक भूमिकाच कराव्यात.

रुबीनाने सांगितले की जेव्हा मी माझ्या स्ट्रगलच्या दिवसात एका दिग्दर्शकाकडे गेली होती तेव्हा त्याने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले होते. माझ्याशी बोलताना अपशब्द वापरले होते. त्याने मला ही सफरचंदाची पेटी कुठून आणली असे म्हटले. त्या दिग्दर्शकाच्या मते माझा चेहरा खाष्ट आहे. त्यामुळे त्याने मला नकारात्मक भूमिका करण्याचा सल्ला दिला होता. शिवाय त्या भूमिकांसाठी प्रयत्न न केल्यास मला काम मिळणार नाही असे देखील म्हटले होते.

रुबीनाने मात्र त्या दिग्दर्शकाने म्हणणे मनावर न घेता त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तिने छोटी बहू या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. रुबीनाने म्हटले की, एक काळ असा होता की माझी मालिका टीआरपीच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळेल अशी आशा होती. त्या पुरस्कार सोहळ्यासाठी मी छान तयार होऊन गेली होती. पण त्यावेळी मला कोणताच पुरस्कार मिळाला नाही. त्यामुळे माझी निराशा झाल्याने मी बाथरूममध्ये गेली आणि खूप रडली. त्यानंतर मी पुढे जरी मला नामांकन असेल तरीही कोणत्याच पुरस्कार सोहळ्यात जाणार नाही अशी शपथ घेतली होती.

रुबीनाने मुलाखतीत असेही सांगितले की, सतत काम करूनही तिला 9 महिन्यांपासून एकदाही पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे पगार घेण्यासाठी मला प्रॉडक्शन हाऊसच्या अनेक फेऱ्या माराव्या लागल्या होत्या.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम