रणवीर सिंहच्या पाठी एका मोठ्या निर्मात्याने सोड...

रणवीर सिंहच्या पाठी एका मोठ्या निर्मात्याने सोडला होता कुत्रा, अभिनेत्याने सांगितला किस्सा (When A Big Producer Left A Dog Behind Ranveer Singh, The Actor Narrated The Incident)

‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करीअरची सुरुवात करणारा अभिनेता रणवीर सिंहने इंडस्ट्रीत स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली आहे. आजच्या काळात, तो बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागलेली असते. इंडस्ट्रीतील प्रत्येक चित्रपट निर्मात्याला आपल्या चित्रपटात रणवीर सिंहला कास्ट करण्याची इच्छा असते. पण रणवीरला सुद्धा हे यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. कास्टिंग काउचसारख्या प्रकाराचा तोही बळी पडलेला. मात्र त्याने प्रत्येक अडचणीवर मात करत यश संपादन केले. एकदा तर एका निर्मात्याने स्वत:च्या मौजमस्तीसाठी रणवीरच्या मागे कुत्रा सोडला होता. याबाबत किस्सा रणवीरने स्वत: सांगितला.

अलीकडेच, रणवीरने मॅराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थिती लावली होता, तिथे त्याला Etoile d’Or पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना रणवीर सिंहने बॉलिवूडमधील आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी बरंच काही सांगितलं.

करीअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये केलेल्या संघर्षाची आठवण करून देताना रणवीरने सांगितले की एका मोठ्या चित्रपट निर्मात्याने आपल्या मौजमस्तीसाठी एका पार्टीत स्वत:चा कुत्रा माझ्या मागे सोडला होता. तो निर्माता आता या जगात नाही. रणवीरने पुढे सांगितले की, निर्मात्यानेच मला पार्टीसाठी बोलावले होते. या संपूर्ण घटनेबद्दल रणवीरने सविस्तर माहिती दिली. मात्र, त्या निर्मात्याचे नाव त्याने उघड केले नाही.

याच संवादादरम्यान रणवीरने कास्टिंग काउचचा किस्साही शेअर केला. अभिनेत्याने सांगितले की,“त्या माणसाने मला एका ठिकाणी बोलावले आणि विचारले की तू मेहनती आहेस की हुशार? मी स्वत:ला हुशार समजत नसल्याने मी मेहनती असल्याचे सांगितले. तर तो म्हणाला, ‘डार्लिंग, स्मार्ट हो, सेक्सी हो.’ मी त्या साडेतीन वर्षांत अशा प्रकारच्या अनुभवांतून गेलो आहे. कदाचित त्या वेळेमुळेच मी मला मिळालेल्या संधींचा नेहमी आदर राखतो.

रणवीर सिंहच्या पुढील कामाबद्दल सांगायचे तर, तो लवकरच ‘सर्कस’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. रणवीरचे चाहतेही त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.