कोविडच्या संकटातून सुटका झाल्यावर काय खावे? काय...

कोविडच्या संकटातून सुटका झाल्यावर काय खावे? काय खाऊ नये? (What to eat And what not to eat during the corona recovery period)

करोनामुक्त झाल्यानंतर देखील बरेच दिवस शरीरात अशक्तपणा असतो. यातून लवकर बाहेर येण्याकरीता डॉक्टर्स रुग्णांना सकस आहार घेण्याचा सल्ला देतात. तेव्हा करोनाच्या रिकव्हरी दरम्यान आहार कसा असावा, रुग्णांनी काय खाल्ले पाहिजे आणि काय खाऊ नये ते पाहूया.

करोनाच्या रिकव्हरी दरम्यान काय खावे?

– करोनामुक्त झाल्यानंतर रुग्णाने हलका आहार घेतला पाहिजे.

– यासाठी खिचडी हा उत्तम पर्याय आहे. पालेभाज्या, बीट, गाजर, फरसबी अशा भाज्या घालून सकस आणि स्वादिष्ट खिचडी बनवता येते. खिचडी खाल्ल्याने शरीराची तूट लवकर भरून येण्यास मदत होते.

– क आणि ड जीवनसत्त्वं तसेच खनिजे आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खावेत.

– आहारात चोथायुक्त पदार्थांचा समावेश करा. जसे – नाचणी, सुजी, संपूर्ण धान्यं इत्यादी. यात भरपूर प्रमाणात फायबर, ब जीवनसत्त्व आणि कार्ब असतात. शिवाय हे पचायलाही हलके असतात.

– करोनापासून मुक्त झाल्यानंतर रुग्णाने आपल्या आहारातील प्रथिन्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. उदाहरणार्थ – डाळींचं सूप, हिरवी फळं आणि अंडी इत्यादी.

– रोज नियमितपणे एक मुठ सुकामेवा जरुर खा.

– दररोज एक-दोन फळं खा.

– आजारातून बाहेर पडल्यानंतर रुग्णाला हवी तशी भूक लागत नाही, तेव्हा एकाच वेळी न खाता दिवसभर अधूनमधून थोडे थोडे खावे. असं केल्याने पचनशक्तीवर ताण येणार नाही आणि शरीरास ऊर्जा मिळत राहील.

– दिवसभर कमीत कमी ८-१० ग्लास पाणी प्या, शरीरात पाण्याची कमतरता असू नये.

रिकव्हरी काळात काय खाण्याचे टाळावे?

–  या काळात मसालेदार पदार्थ टाळा. तिखट पदार्थांमुळे घशामध्ये इन्फेक्शन होऊन घसा खराब होऊ शकतो. जेवणात लाल तिखट मिरचीऐवजी काळी मिरी वापरा. यामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

–   रिकव्हरी दरम्यान रुग्णास चटपटीत, तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. परंतु अशा पदार्थांकडे दुर्लक्ष करा. तळलेले पदार्थ पचण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे असे पदार्थ तात्पुरते टाळलेलेच बरे.

– कोल्ड ड्रिंक्स आणि सोडा बिलकूल प्यायचा नाही. या पेयांमुळे पोटात सूज येते. या ऐवजी लिंबूपाणी, ताक, लस्सी, जलजीरा यांसारखे उत्तम पर्याय तुम्ही निवडा आणि ते प्या.

– पॅक्ड केलेल्या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात सोडियम आणि प्रिझर्वेटिव्हस्‌ असतात. यामुळे शरीरात सूज येते आणि रिकव्हरी होण्यास विलंब लागू शकतो.