तुमचा मोबाईल फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास ...

तुमचा मोबाईल फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास काय कराल? (What To Do If Your Mobile Phone Is Lost Or Stolen?)

सर्वजण मोबाईल फोनचे इतके गुलाम झालो आहोत की, क्षणभर देखील त्याचा विरह आपल्याला सहन होत नाही. सर्व महत्त्वाची कामे हा फोन करतो. अन्आपण त्याच्यावर अवलंबून असतो. त्यामुळेच जर तो फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर आपल्याला काही सुचेनासे होते.
काही जण त्वरीत आपला मोबाईल नंबर ब्लॉक करतात, तर काही जण पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करतात. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही गोष्टी करु नये. त्याऐेवजी स्टेप बाय स्टेप या गोष्टी करा. म्हणजे तुमचा फोन सापडणे सोपे जाईल…

गुन्हा नोंदवा
तेव्हा तुमचा फोन हरवला अथवा चोरीस गेला तरी पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करणे अनिवार्य आहे. पोलीस स्टेशनात स्वतः जाऊन आयएमईआय अर्थात्इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेन्ट आयडेन्टिटी नंबर देऊन एफ आय आर म्हणजे गुन्हा नोंदवा. जेणेकरून या नंबरच्या आधारे तुमच्या मोबाईलवर पोलिसांची नजर राहील. अन्तुमच्या मोबाईलचा जर कुणी गैरवापर करताना आढळला, तर पोलिसांना खबर मिळेल.
सर्वसाधारणपणे असं आढळून येतं की, मोबाईल फोन गायब झाला की, आपण त्यावर फोन करत राहतो. पण असं करू नये. कारण तो जर चोरीला गेला असेल तर चोरट्याला कळतं की, तुम्ही फोन ट्रॅक करताय्. अर्थात्शोधताय.

नंबर ब्लॉक करा
मोबाईल गायब झाल्यावर बराच वेळ जर त्याचा पत्ता लागला नाही तर, तो नंबर ब्लॉक करा. आपल्या मोबाईलमध्ये आपण आपल्या खासगी गोष्टी, क्रेडीट – डेबिट कार्डचा तपशील, फोन बँकींग, सोशल मिडिया अकाउंट – फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, ई मेल या गोष्टी साठवून ठेवल्या असतात. त्या परक्याच्या हाती लागल्या तर आपण अडचणीत येऊ शकतो. म्हणून नंबर ब्लॉक करणे हिताचे ठरते. तेव्हा तुम्ही ज्या कंपनीचे सिम कार्ड वापरता, त्यांच्या कस्टमर केअर सर्व्हिसला फोन करून तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक करा. त्याचप्रमाणे तुमचा आयएमइआय पण ब्लॉक करा.
मोबाईल फोनची चोरी अथवा हरविणे, ही प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्र सरकारने 14422 हा हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे.त्यावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
सदर नंबर डायल करून, त्यावर मेसेज करून तक्रार देऊ शकता. त्यानुसार पोलीस आणि मोबाईल कंपनीचे लोक या प्रकरणाची चौकशी चालू करतात. या हेल्पलाईन नंबरमुळे आपल्या तक्रारींची वास्तपुस्त करणे सोपे झाले आहे.

शिक्षेची तरतूद
केंद्र सरकारच्या एका विभागाने सर्वेक्षण केले असता, चकित करणारी गोष्ट बाहेर आली आहे. ती अशी की, एकाच आयएमइआय नंबरवर जवळपास 18 हजार हॅन्डसेट वापरले जात होते. त्यामुळे सदर आंतरराष्ट्रीय उपकरण नंबरबाबत अफरातफर करण्याचे वाढते प्रकार पाहून दूरसंचार मंत्रालयाने टेलिग्राफ क्टमध्ये सुधारणा करून, अशा गुन्हेगारांची शिक्षा कठोर केली आहे. अशा आयएमईआय नंबरवर गडबडघोटाळा करून तो बदलण्याचा प्रयत्न करणार्‍या गुन्हेगारास दंड आणि तीन वर्षांची शिक्षा फर्मावण्याची तरतूद करण्यात आली आहे.
आणखी एका सर्वेक्षणातून असं उघडकीस आलं की देशातील जवळपास अडीच कोटी लोक आयएमईआय नंबरशिवाय मोबाईल फोनचा वापर करत होते. त्यावरून 2009 सालापासून बनावट आणि आंतरराष्ट्रीय उपकरण नंबराशिवाय वापरले जाणारे हे मोबाईल फोन नंबर बंद करण्यात आले.