गर्भातील बाळ आडवं असल्यास… (What To Do If The B...

गर्भातील बाळ आडवं असल्यास… (What To Do If The Baby Is Positioned Horizontal In The Womb?)

Baby Is Positioned Horizontal, Womb, गर्भातील बाळ आडवं असल्यास


माझी वहिनी आठ महिन्यांची गर्भवती आहे.
तिच्या गर्भातील बाळ आडवं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. प्रसूतीच्या आधी बाळ गर्भात फिरून योग्य स्थितीत आलं नाही, तर सिझेरियन करावं लागेल, असंही डॉक्टर म्हणत होते. वहिनीला आणि आम्हालाही सामान्य प्रसूती व्हावी, असं वाटतं आहे. हे शक्य आहे का ?

  • स्वरा, पालघर
    प्रसूतीच्या वेळी गर्भातील बाळाची आदर्श स्थिती ही डोकं खाली अशी असायला हवी. म्हणूनच गर्भातील बाळ आडवं असेल, तर डॉक्टर ते फिरवण्याचा प्रयत्न करतात. बाळ फिरून, डोकं खाली या परिस्थितीत आल्यास, सामान्य प्रसूतीचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र बाळाची स्थिती आडवीच राहिली, तर सिझेरियन करावं लागतं. त्यामुळे तुमच्या वहिनीच्या गर्भातील बाळाच्या स्थितीवरच हा पर्याय अवलंबून आहे.

माझ्या बहिणीची मागच्याच महिन्यात प्रसूती झाली. गर्भातील बाळ आडवं असल्यामुळे तिचं सिझेरियन करावं लागलं. गर्भातील बाळाची स्थिती आडवी असण्याची काय कारणं असू शकतात?

  • कला, पुणे
    गर्भाशयामध्ये बाळाची स्थिती आडवी असण्याची अनेक कारणं असू शकतात, जसं- बाळ कमी दिवसांचं असणं, बाळाभोवती खूप प्रमाणात पाणी असणं, गर्भवतीचं गर्भाशय खूपच ढिलं असणं, गर्भवतीच्या गर्भाशयाच्या रचनेमध्ये व्यंग असणं, वार खाली असणं, गर्भवतीच्या हाडांची रचना (पेल्विक बोन्स) आकुंचित असणं इत्यादी. तुमच्या बहिणीच्या बाबतीतही यांपैकी एखाद्या कारणामुळे बाळ गर्भात आडव्या स्थितीत असू शकेल.

माझी मैत्रीण, लेखा गर्भवती आहे. डॉक्टरांनी तिच्या गर्भातील बाळ आडवं असल्याचं सांगितलं आहे. तेव्हापासून लेखा खूप चिंता करते. गर्भातील अशा स्थितीमुळे बाळाला काही धोका असतो का?

  • शमा, सोलापूर
    प्रसूतीच्या वेळेपर्यंत बाळाची गर्भाशयातील स्थिती आडवीच राहिली, तर सामान्य प्रसूती होऊ शकत नाही. कारण सामान्य प्रसूतीच्या वेळी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते, जसं- प्रसूतीच्या वेळी आधी नाळ बाहेर येणं, बाळाचा हात बाहेर येणं, प्रसूतीमध्ये अटकाव निर्माण होणं, बाळाच्या भोवतीचं पाणी निघून जाणं, गर्भाशय फाटणं इत्यादी. यामुळे बाळाच्या आणि आईच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. मात्र हे टाळण्यासाठीच बाळाची स्थिती न बदलल्यास डॉक्टर सिझेरियनचा सल्ला देतात. तेव्हा लेखाला सांगा, काळजी करू नका. तिला डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्यायला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागायला सांगा.