योगसाठीच योग्य वय कोणतं? (What Is The Right Age...

योगसाठीच योग्य वय कोणतं? (What Is The Right Age To Perform Yoga?)

निसर्गाने माणसाला अश्मयुगापासून आरोग्याची देणगी दिली आहे. ही देणगी आपण जपावी अशी अपेक्षा असते. पण आरोग्य बिघडत नाही, तोपर्यंत त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. आपण रोग बरा होण्यासाठी औषधं घेतो आणि पुन्हा बिनधास्त होतो. रोग दूर होणं म्हणजे आरोग्य नाही हे आपल्या लक्षातच येत नाही. योग साधनेमुळे आपणास ही देणगी जपता येते. 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आपण याचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे.

योगासनांशी मैत्री करा
सध्या प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. घरकाम असो अथवा नोकरी, व्यवसायाचे ठिकाणी काम हलके करणार्‍या यंत्रांनी आपल्या शरीराची हालचाल कमी केली आहे. आपल्या आहाराच्या सवयी बदलल्या आहेत. निरोगी आयुष्यासाठी आहार, विहार व व्यायामाचं महत्त्व सांगणार्‍या नवनवीन साइट्स, अ‍ॅप्स सर्व उपलब्ध आहेत. परंतु आपण यावरून मिळणार्‍या माहितीचा खरंच वापर करून घेतोय का? बरं, मोठ्यांप्रमाणं घरातील मुलांनीही कामाची बैठी पद्धतच अंगीकारली आहे. मोबाईलवर किंवा तत्सम बैठे खेळ खेळण्याकडेच त्यांचा कल आहे. शिवाय जंक फूडची आवड यामुळे लहान वयातच त्यांना स्थूलतेस तसेच आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागत आहे. या कुरबुरींना वेळीच आवर घालायचा असेल तर योगासनांशी मैत्री करायलाच हवी. ज्याचे फायदे आयुष्यभर जाणवणार आहेत.
लहान मुलांना योगासनं शिकवावी का? त्यासाठीचं योग्य वय कोणतं? असे प्रश्‍न बरेचदा पालकांच्या मनात असतात. परंतु योगाचे फायदे दीर्घकाळ मिळावेत असं वाटत असेल तर तो लहान वयातच शिकला पाहिजे, असं योग विशेषज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नव्हे तर मुलं जन्मापासून नैसर्गिकरीत्या योगासनं करत असतात, हे ते आपल्या लक्षात आणून देतात. मुलांचं शांत-निवांत झोपणं, रांगणं, बसणं, पुढे सरकणं, दुडुदुडु चालणं या सर्व योगाच्याच निरनिराळ्या स्थिती आहेत, असे तज्ज्ञमंडळी सांगतात.

योगसाठी योग्य वय
लहान मुलांना वाढत्या वयात उत्तम आहाराची गरज असते तशीच व्यायामाचीही. मुलांच्या व्यायामासाठी योगासनं हा चांगलाच पर्याय आहे. हा फक्त मोठ्यांनी करायचा व्यायामप्रकार नाही. मुलांसाठीही अनेक प्रकारची सोपी आसनं या प्रकारात आहेत. साधारण वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षापासून मुलांना योगासनं करण्याची सवय लावल्यास उत्तम! यामुळे, स्वभावानं चंचल किंवा भरपूर मस्ती करणार्‍या मुलामुलींना एकाजागी शांत बसण्याची, मन एकाग्र करण्याची सवय लागते. तर स्वभावानं लाजाळू, घाबरट मुलांच्या मनातील आत्मविश्वास वाढीस लागून, त्यांच्यात उत्साह व ऊर्जा निर्माण होते.
लहान वयात योग करण्याचा सराव सुरू केल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. योग्य प्रमाणात भूक लागून शरीराची वाढ व्यवस्थित सुरू राहते. लहान मुलांच्या मनावरील अभ्यासाचा ताण, नैराश्य दूर होऊन त्यांना अभ्यास करणं सोप्पं जातं. मुलं स्वत:च्या चिडचिड्या स्वभावावर नियंत्रण मिळवू शकतात. तेव्हा लहान मुलांच्या शरीर आणि मनाची जडण घडण होत असतानाच्या काळातच नैसर्गिक तसंच मनोरंजनात्मक पद्धतीनं त्यांना योगासनं आणि व्यायाम करण्याची सवय लावली पाहिजे. उदा. अतिउत्साही मुलाला शांत आणि श्वासाचे व्यायाम द्यायला हवेत तर सतत एकाजागी बसून असणार्‍या मुलांना उत्साह आणि ऊर्जा निर्माण करणार्‍या व्यायाम प्रकारांची गरज असते.

चांगले संस्कार अंगीकारा
वयाच्या सातव्या आठव्या वर्षी मुलांनी दररोज सूर्यनमस्कार घालावेत. यामुळे मुलांचे मन शांत होते, मनाची एकाग्रता वाढते तसेच त्यांच्या शरीरामध्ये लवचिकता देखील येते. मग हळूहळू पुढे प्राणायाम, भुजंगासन, ताडासन अशा योग प्रकारांशी त्यांची ओळख करून द्यावी. प्राणायाम करणंही मुलांच्या फायद्याचं आहे. परंतु हा योग प्रकार सुरुवातीला तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त योगासनांचे काही नियमही आहेत, त्यांना यमनियम म्हणतात. जसे – अहिंसा, चोरी करू नये, खोटं बोलू नये, स्वच्छता राखणं, चिकाटीनं काम करणं, समाधानी वृत्ती ठेवणं इत्यादी मूल्यं लहान वयात मुलांच्या अंगात बाणवली गेली तर ती पुढे चांगली माणसं आणि चांगले नागरिक होतील.

सूर्यनमस्कार का करावेत ?


सूर्यनमस्कार हा बारा आसनांचा संच आहे, जे शक्यतो सूर्योदयाच्या वेळी करतात. कारण त्यामुळे शरीर ताजेतवाने होते आणि मनाला तजेला मिळतो तसेच दिवसभराची कामे करण्यासाठी आपण एकदम तयार होतो. जर दुपारी केले तर त्याने शरीराला ताबडतोब ऊर्जा मिळते आणि जर संध्याकाळी केले तर मन हलकं होण्यास मदत होते. सूर्यनमस्कार हा हृदयाकरिता सर्वोत्तम व्यायाम आणि वजन कमी करण्याचा चांगला उपाय आहे.
सूर्यनमस्कारामुळे डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाचा फारच मोठा फायदा होतो आणि म्हणूनच सर्व योग तज्ज्ञ सर्वांनाच सूर्यनमस्कार करण्यास सुचवितात.
आज मुलं जीवघेण्या स्पर्धेला तोंड देत आहेत. तेव्हा त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सूर्यनमस्काराचा समावेश केला पाहिजे, कारण त्याने मानसिक स्थैर्य वाढते, चिंता आणि अस्वस्थता कमी होते. स्नायूंकरिता हा सर्वोत्तम व्यायाम असून याने पाठीच्या कण्याची आणि हातापायांची लवचिकता वाढते. 5 वर्षाचे लहान मूलही दररोज सूर्यनमस्कार करू शकते, असा हा योगप्रकार आहे. लहान वयापासूनच अनेकांना सूर्यनमस्कारांची ओळख होते. दहा योगासने एकदम करवून घेणार्‍या या व्यायाम प्रकाराचे व्यायामासाठी अनेक फायदे आहेत. मात्र हे फायदे मिळण्यासाठी ते योग्य प्रकारे व नियमितपणे घालायला हवेत.
सूर्यनमस्कार हा योगासनांचा लोकप्रिय प्रकार असला तरी बर्‍याच जणांचा सूर्यनमस्कार आपले आपणच सुरू करण्याकडे कल असतो. परंतु ते योग्य पद्धतीने घातले जाणे गरजेचे आहे. ही योग्य पद्धत केवळ योगासनांची पुस्तकं वाचून वा चित्रं पाहून समजते असं नाही. त्यामुळे तज्ज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार शिकून घेणं चांगलं.

मुलांना भूक लागत नाही?


लहान मुलांच्या वाढीमध्ये सगळ्यात मोठं योगदान आहाराचं असतं. आहार म्हणजे केवळ अन्न नाही तर भूक, पचनशक्ती, अन्न द्रव्यांचे गुणधर्म आणि व्यक्ती या सर्वांचा एकत्रितरीत्या केला गेलेला विचार आहे. बरेचदा लहान मुलांमध्ये भूक न लागण्याची समस्या दिसून येते. अभ्यास व इतर उपक्रमातील सहभागामुळे (एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज) मुलांना दिवसभरात वेळेवर पुरेसा आहार घेणं शक्य होत नाही. तर कधी सततच्या स्पर्धेमुळं मुलं मन लावून जेवत नाहीत. या सर्व गोष्टींच्या परिणामांमुळे त्यांच्यात भूक कमी लागण्याची समस्या निर्माण होते. परंतु योगामुळे मुलांमध्ये भूक लागण्याचं प्रमाण वाढतं. योग तज्ज्ञांनी सांगितलेली ही योगासनं कोणती ते आपण पाहूया. मात्र ही आसनं तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखी खालीच करणं गरजेचं आहे.

बद्धकोनासन किंवा फुलपाखरू मुद्रा

भूक वाढवण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असून या आसनामुळे पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

कसे कराल?
प्रथम जमिनीवर बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा.
पाय गुडघ्यात दुमडा व पायाचे तळवे एकमेकांसमोर येतील असे जोडा.
आता हाताने पायांच्या टाचा पकडा व जास्तीत जास्त ओटीपोटाजवळ ओढून घ्या.
हात टाचांवर ठेवून गुडघे फुलपाखराच्या पंखांप्रमाणे वर व खाली करा.
शक्य असेल तेवढा वेळ असं करत राहा.
लक्षात ठेवा – पायांच्या टाचा जितक्या जास्त ओटीपोटाजवळ येतील तितका जास्त फायदा या
आसनामुळे मिळतो. शक्य आहे तेवढा वेळच हे आसन करा.शरीराला ताण
देऊन हे आसन करण्याचा प्रयत्न करू नका. सरावानेच जास्त वेळ हे आसन करू शकाल.

शशांकासन किंवा ससा मुद्रा
हे आसन चिंता, काळजी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे पोटातील अवयवांना मसाज होतो तसेच पचनसंस्था सुधारते.


कसे कराल?
प्रथम वज्रासनात बसा. (दोन्ही पाय गुडघ्यात मागे दुमडून बसा.) दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.
दोन्ही हात वर उचला. हात खांद्यातून वर सरळ रेषेत असू द्या. तळहात पुढील दिशेस ठेवा.
आता अलगद शरीराचा वरचा भाग समोर आणत हात, तळहात व डोकं जमिनीला टेकवा.
हात वर करताना श्वास घ्या व हात वरून खाली आणताना श्वास सोडा.
डोकं व हात जमिनीवर टेकलेलेच राहू द्या. शक्य तेवढा वेळ या स्थितीत राहा.
पुन्हा श्वास सोडत हळूहळू पूर्व स्थितीत या.

चिन्मय मुद्रा
ही मुद्रा शरीरातील ऊर्जेचा स्रोत सुधारते. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत होऊन भूक लागण्यास मदत होते.

कसे कराल?
सुखासनात बसा व डोळे बंद करा.
हात मांडीवर ठेवा. तळहात वरच्या दिशेला असू द्या.
अंगठा व तर्जनी एकमेकांना जोडा व इतर तीन बोटे तळहाताकडे झुकवा.
हळुवार शांत उज्जायी श्वास घ्या. दोन ते तीन मिनिटं याच स्थितीत राहा.
आसन करताना श्वासावर लक्ष केंद्रित करा.

योगासनं करताना घ्यावयाची काळजी
सुरुवातीला फक्त 10 ते 15 मिनिटं आसनं करावीत.
हळूहळू ही वेळ वाढवत न्यावी.
तेरा वर्षापुढील मुलांना थोडे पुढचे व्यायाम प्रकार शिकवता येतात. अर्थात त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायामांचं प्रमाण कमी जास्त करता येतं.
लहान मुलांना योगासनं करताना एकटं सोडू नका. हवेशीर, व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी, सैलसर कपडे घालून मुलांना योगासनं करायला सांगावीत.
आरामदायी योगा मॅटवर योगासनांना सुरुवात करण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं वॉर्मअप करणं आवश्यक आहे.
योगासनांमध्ये श्‍वासोच्छ्वासाचे व्यायाम व्यवस्थित योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केले पाहिजेत.

लहान मुलांनी करायला हवीत अशी सोपी योगासनं

ताडासन
ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते. त्यामुळे या आसनाचे ताडासन असं नाव आहे.

कसे कराल?
ताडासन हे सरळ उभं राहून केलं जातं. पायाची बोटं व पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभं राहावं. त्यानंतर हळूहळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या वर नेताना केवळ तळपायांवर उभं राहावं. मग हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेनं नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होतो त्या दिशेत उभं राहावं.

लक्षात ठेवा
हात डोक्याच्या दिशेनं नेत असताना लक्षात ठेवायचे की, हाताची बोटं देखील सरळ रेषेत ठेवावीत. या अवस्थेत शरीराचं वजन हे पायाच्या बोटांवर असतं. जेव्हा हातांना वरच्या बाजूला नेतात तेव्हा मात्र पोट हे आतल्या बाजूला घेतलं पाहिजे.

फायदा
ताडासन नियमित केल्यानं पायांचे स्नायू व पंजे मजबूत होतात. ताडासन लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

भुजंगासन
या आसनात शरीराचा आकार सापासारखा बनतो,
अर्थात भुजंगासारखा. म्हणूनच या आसनाला भुजंगासन असं म्हटलं जातं.

कसे कराल?
हे करताना आधी पोटावर झोपावं. दोन्ही पायांना जोडावं. हनुवटी फरशीवर ठेवावी. कोपरे कमरेला टेकलेले.
आता हळूहळू दोन्ही हातांच्या आधारे कमरेपासून वरचा भाग जितका शक्य असेल तितका वरती उचलावा. वर आकाशाकडे पाहावं.
आता त्याच सावकाश गतीने पुन्हा जमिनीच्या दिशेने यावं. हे आसन करण्याचा कालावधी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार कमी अधिक ठरविता येतो.

फायदा
या आसनाने गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे आपल्या पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. पचनशक्ती वाढतेे. पोटावरील अतिरिक्त चरबीही हे आसन केल्याने कमी होते आणि आपण सुडौल दिसतो.

लक्षात ठेवा
हे आसन करताना मागे झुकण्याचा प्रयत्न मुळीच करू नका, अन्यथा पाठीवर ताण निर्माण होईल. ज्यांना पाठीचे दुखणे आहे, त्यांनी डॉक्टर अथवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा व्यायाम करावा.