बॉलिवूड सिताऱ्यांच्या विचित्र सवयी (Weirdest Ha...

बॉलिवूड सिताऱ्यांच्या विचित्र सवयी (Weirdest Habits Of Bollywood Stars)

आपल्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांच्या खासगी जीवनाबद्दल तसेच त्यांच्या दैनंदिन क्रमाबद्दल चाहत्यांना औत्सुक्य असते. पण रुपेरी पडद्यावर हे कलाकार अतिश्रीमंत, रुबाबदार जीवनशैली जगताना दाखवत असले तरी खासगी आयुष्यात ते तुमच्या आमच्यासारखेच असतात. त्यांनाही सर्वसामान्य माणसांप्रमाणे विचित्र किंवा वाईट सवयी असतात…

अमिताभ बच्चन

महानायक अमिताभ बच्चनची एक विचित्र सवय आहे. त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे की, कधी कधी अमिताभ मनगटावर दोन घड्याळे बांधतो. कारण काय, तर त्याच्या घरातील कोणी परदेशात गेला तर ती व्यक्ती ज्या देशात जाईल, तिथले टायमिंग तो एका घड्याळात सेट करतो, तर दुसऱ्या घड्याळात आपली भारतीय वेळ दिसत असते.

सलमान खान

सलमान खानचे शौक तसे खूपच मोठमोठे आहेत. त्याबद्दल तुम्हाला चांगलीच माहिती असेल. पण त्याचा एक विचित्र शौक आहे. सवय आहे म्हणा तर. सलमान खानला वेगवेगळ्या प्रकारचे साबण गोळा करण्याची सवय आहे. तो कामाच्या निमित्ताने किंवा मौजमजा करायला जगभर हिंडतो. जाईल तिथून तो हॅन्डमेड सोप, हर्बल सोप, डिझायनर सोप गोळा करतो आणि घरी घेऊन येतो.

करीना कपूर

फॅशन आणि स्टाईल आयकॉन म्हणून नावारूपास आलेली करीना कपूर भलेही सॉलिड फॅशनेबल राहते. पण एका वाईट सवयीमुळे मार खाते. कारण तिला नखे खाण्याची वाईट सवय आहे. रिपोर्टस्‌ असं सांगतात की, करीना टेन्शनमध्ये असते किंवा विचारात गढली असते तेव्हा नखे खाते. कपिल शर्मा शो मध्ये तिनं या गोष्टीची कबुली दिली आहे.

शाहरूख खान

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खान प्रत्यक्ष जीवनात राजेशाही जीवन जगतो. पण त्याची एक वाईट खोड आहे. तो आपले बूट कधीच काढत नाही. अगदी तो स्वतःच्या घरात देखील जोडे घालूनच वावरतो. एका मुलाखतीत तर त्याने सांगितले होते की, कधी कधी मी जोडे घालूनच झोपतो. याशिवाय शाहरूखची एक चांगली सवय अशी आहे की, त्याला जिन्सचा संग्रह करायला आवडतो. त्याच्या या संग्रहात १५०० हून अधिक जिन्स आहेत.

दीपिका पादुकोण

दीपिकाची एक विचित्र सवय आहे. जेव्हा ती काहीच काम करत नसते, तेव्हा तिच्यासमोर जी कुणी व्यक्ती बसली असेल, तिला बघून दीपिका काही कल्पना करू लागते. बसल्या बसल्या त्या व्यक्तीबाबत ती मनात एक कहाणी रचते. विमान प्रवासात तर ती हेच काम करते. कारण तेव्हा ती रिकामटेकडी असते.

आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून लोक आमीर खानची पाठ थोपटतात. त्याला प्रत्येक गोष्टीत परफेक्शन लागतं. पण या स्वारीला आंघोळीची नफरत आहे. त्याला आंघोळ करायला आवडत नाही. त्याच्या या वाईट सवयीमुळे घरातील माणसे परेशान असतात.

सैफ अली खान

आमीरच्या बरोब्बर उलट सैफ अली खानची सवय आहे. त्याला बाथरूममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडते. बाथरूम हे त्याचं दुसरं घरच आहे. म्हणा ना! तिथे तो तासन्‌तास घालवतो. एका रिपोर्टनुसार त्याच्या बाथरूममध्ये लायब्ररी आणि फोनची लाईन देखील मौजुद आहे. म्हणजे वाचण्याची आवड सैफ बाथरूममध्ये पुरी करतो.

विद्या बालन

बॉलिवूडचा लहानमोठा कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असतो. स्मार्ट फोनच्या माध्यमातून ते बिझी असतात. पण विद्या बालनची मात्र वेगळीच तऱ्हा आहे. तिला मोबाईल फोन जास्त वेळ वापरता येत नाही. किती तरी दिवस ती आपला सोशल मीडिया अकाऊंट तपासत नाही.

सनी लिओनी

सनी लिओनीला वारंवार पाय धुण्याची सवय आहे. शूटिंग चालू असताना सेटवर जायला उशीर झाला, तरी ती दर १५ मिनिटांनी आपले पाय धूत असते.

सुश्मिता सेन

नेहमीच काही जगावेगळं करण्याबाबत सुश्मिता सेनची ख्याती आहे. तिला साप खूप आवडतात. एकदा तर तिने घरी अजगर पाळला होता. त्याचप्रमाणे तिची आणखी एक विचित्र सवय आहे. तिला खुल्या वातावरणात आंघोळ करायला आवडते. त्यासाठी तिने आपल्या घराच्या गच्चीत बाथटब बसवून घेतला आहे, अशी बातमी आहे.