वॉटरप्रूफ मेकअप (Water Proof Make Up)

वॉटरप्रूफ मेकअप (Water Proof Make Up)

थोडी काळजी घेतली, तर पावसातही तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकेल आणि सौंदर्यही खुलेल…
दररोज मेकअप करून अपटूडेट राहणार्‍या स्त्रिया, ऋतू कोणताही असो अगदी पाऊस असला तरी मेकअपशिवाय बाहेर पडण्याची कल्पना तरी का करावी? फक्त ऋतूनुसार मेकअपमध्ये काही बदल करा नि बघा. तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकेल आणि सौंदर्यही खुलेल…

अतिशय साधा आणि नैसर्गिक वाटेल असा मेकअप करा.


स्टायलिश दिसण्यासाठी गडद रंगाच्या वॉटरप्रूफ लिपस्टिकची निवड या काळात योग्य ठरते.
या दिवसात मॅट फिनिशिंग आणि ग्लॉस फिनिशिंग असलेली लिपस्टिक देखील तुम्ही वापरू शकता.


पावसाने तुमच्या डोळ्याचा मेकअप खराब होऊ शकतो. डोळ्यांच्या मेकअपसाठी वॉटरप्रूफ काजळ आणि वॉटरप्रूफ पेन्सिल लायनर वापरू शकता.
शक्यतो पावसाळ्यात चेहर्‍यावर फाउंडेशन लावणे टाळा. आणि लावायचेच असल्यास कन्सिलर, लिक्विड फाउंडेशन किंवा लूज पावडर वापरा.

मेकअप करायचाच असल्यास, प्रथम चेहर्‍यावर बर्फ चोळून घ्यावा. यामुळे पावसात भिजलो तरी मेकअप पसरत नाही आणि टिकून राहतो.
तुमची त्वचा कोरडी असल्यास बर्फ चोळून झाल्यानंतर चेहर्‍यास टोनर लावा.
तुमची त्वचा तेलकट असल्यास बर्फानंतर अ‍ॅस्ट्रिंजट लावा.
या मौसमात आपण वेगवेगळ्या रंगांचा वापर करून पाहू शकतो.
क्रिमी पिंक, लाइट ब्राऊन, पेस्टल आणि बेज कलर्सच्या आयशॅडो वापरल्यास कॉम्प्लीमेंट मिळाल्याशिवाय राहणार नाही.

वॉटर बेस्ड मॉइश्‍चरायझर्सचाच वापर करा.
केसांची स्टाइल करताना ती साधी ठेवा, फार गुंतागुंतीची नसू द्या. किंवा केस शॉर्ट ठेवा.
भुवया ट्रिम करून ठेवा, कारण या मौसमात आयब्रो पेन्सिल
वापरणं खूप वाईट कल्पना आहे. यामुळे तुमचं सौंदर्य बिघडू शकतं.
मेकअप करण्याची सवय असणार्‍या स्त्रियांना मेकअपशिवाय स्वतःलाच आरशात पाहण्याची इच्छा होत नाही. मग मेकअपशिवाय बाहेर जाणं तर दूरच राहिलं. अशा स्त्रियांनी पावसाच्या दिवसांत मेकअप करताना तो सौंदर्य जपणारा तसेच टिकून राहणारा असेल याची काळजी घ्यावी. त्यासाठी लाइट आणि वॉटरप्रूफ मेकअप करावा.

हे करा… हे करू नका…
पाऊस म्हणजे उत्साह. आता पावसात वातावरणात तीव्र आर्द्रता, त्वचेवर रॅशेस येणं किंवा इन्फेक्शन होणं हे नेहमीचंच झालेलं आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून खाज येणं, मुरुमं, जंतूसंसर्ग आणि निर्जलीकरण या गोष्टीही येतात. परंतु, त्वचेची योग्य काळजी घेतल्यास याच समस्या अगदी क्षुल्लक वाटतील बघा. त्यासाठी-


हे करा
दिवसातून तीन वेळा पीएच घटक संतुलित असणार्‍या क्लिन्जर्सने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे प्रदुषण, धुळीचे कण, अतिरिक्त तेल यासारख्या मुरुमांना निमित्त ठरणार्‍या गोष्टी निघून जातील.
आठवड्यातून दोनदा माती हा घटक असलेला मास्क वापरा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित ठेवता येतं.
त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी लाइट टेक्शर्सच्या सिरम किंवा लोशन्सचा वापर करा.
रोज स्वच्छ स्नान करा. घामामुळे जो त्वचेचा पोत बिघडलेला असतो तो पुन्हा मिळवता येतो.
केसही स्वच्छ आणि कोरडे ठेवा.


सूर्याच्या विषारी किरणांपासून संरक्षण म्हणून जेल सनस्क्रीनचा वापर करा.
त्वचेच्या सुरक्षेसाठी चहापत्ती, कोरफड, मध, लिंबू किंवा कडुनिंब यासारखे नैसर्गिक घटक असलेल्या प्रसाधनांचा वापर करा. त्वचेस संसर्ग होईल अशा कोणत्याही रासायनिक गुणधर्माच्या प्रसाधनांच्या वापरापासून दूर राहा.
हायपरहायड्रॉसिस सारख्या समस्येमध्ये काहींना काखेत, हातांचे तळवे, तळपाय, चेहरा, धड आणि केसांची त्वचा याठिकाणी घाम येतो. तो घाम तसाच राहिल्यानं शरीराला गंध येतो, ज्यानं जंतू संसर्ग होण्याची शक्यताही निर्माण होते.
अशा वेळी बोटोक्सचा वापर करणं उत्तम.
बोटोक्स अतिरिक्त घाम येण्याचं प्रमाण कमी करतो, तसंच फंगल वा विषाणुंमुळे होणारे संसर्ग होण्यापासून वाचवतो.
पावसाच्या दिवसात शक्यतो पायांचे तळवे कोरडे ठेवा. ते कोरडे ठेवण्यासाठी फुट स्प्रे मिळतो तो वापरा. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होत नाही.

हे करू नका.
चेहर्‍याचं सौंदर्य अधिक उठावदार करण्यासाठी गडद मेकअप करू नका. या दिवसात हवेत दमटपणा असल्यानं त्वचा शुष्क होते.
त्वचेसाठी तैलीय प्रसाधनं वापरण्याचं टाळा. त्यामुळे चेहरा चिकट दिसेल.
चेहर्‍याच्या त्वचेसाठी अल्कोहोलीक टोनर्सचा वापर करू नका. ते त्वचेस शुष्क व आपल्याला चिडचिडं बनवितात. त्याऐवजी सौम्य टोनर्स किंवा मग गुलाबपाणी वापरा.
कडकडीत गरम पाण्याचा शॉवर घेऊ नका. त्यामुळे त्वचेवरील केशिकांचं नुकसान होऊन त्वचा कमजोर आणि निस्तेज होते.
पावसात भिजण्याचं टाळा. रोज छत्री बाळगा. ओलसरपणा जंतूसंसर्गास कारण ठरू शकतो.
सार्वजनिक शौचालयांचा वापर करताना स्वच्छतेसंबंधीची सावधगिरी बाळगा.
त्वचा सतत ओलसर असणं, अस्वच्छ मोजे आणि चपला वापरणं टाळा. कारण दमटपणा आणि घर्षणामुळं पायांच्या बोटांमध्ये इन्फेक्शन होतं.

  • डॉ. स्नेहा प्रभुदाबोलकर