केस धुवा, पण जपून….(Wash Your Hair With Utmost ...

केस धुवा, पण जपून….(Wash Your Hair With Utmost Care To Keep Them Healthy)


केस कसे धुवायचे… हे काय आम्हाला माहीत नाही, असं कुणीही म्हणेल.
परंतु, केस धुणं ही एक प्रक्रिया आहे आणि ती योग्य पद्धतीने पूर्ण केली, तर केसांचं आरोग्य आणि सौंदर्य वधारतं, असं कुणी सांगितलं तर…?
लहानपणापासून… अगदी आपल्याला कळत नव्हतं तेव्हापासून आपले केस धुतले जात आहेत. इतकी वर्षं सातत्याने केस धुऊनही अनेकांना केस धुण्याची योग्य पद्धत कळलेलीच नाही, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. उन्हाळ्यात थंडगार पाण्याने आणि हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुणं सर्वांनाच आवडतं, नाही का? पण यामुळे केसांना इजा होऊ शकते. मग काय करावं? …तर केस धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्या आणि नियमितपणे त्याचा अवलंब करा. यामुळे केस स्वच्छ तर होतीलच, सोबत त्यांचं आरोग्य आणि सौंदर्यही सुधारेल.

तेल मालीश करा
केस धुण्यापूर्वी तेल मालीश जरूर करा. आपली आजी-आई, हे नेहमी सांगते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तेल मालीश केसांसाठी आवश्यक आहे. केस धुण्याच्या किमान दोन ते तीन तासांपूर्वी केसांच्या मुळाशी तेलाने हळुवार मालीश करा. बरेचदा केस धुताना केसांचं नैसर्गिक तेल निघून जातं. तेल मालीशमुळे या तेलाचा समतोल राखण्यास मदत होते. तसंच तेलामुळे केस आर्द्र राहतात, मजबूत बनतात आणि धुताना त्यांचा गुंता होत नाही. तेल मालीश करण्यासाठी खोबरेल, बदामाचं किंवा ऑलिव्ह ऑईल वापरता येईल.

केस विंचरा
केसांच्या मुळाशी योग्य रक्ताभिसरण होण्यासाठी, तेथील सूक्ष्म त्वचा छिद्रं उघडण्यासाठी आणि तेल केसांवर सर्वत्र पसरण्यासाठी, केस धुण्यापूर्वी व्यवस्थित विंचरा. केसांमधील गुंता पूर्णतः निघून जाईल, याची काळजी घ्या. यामुळे केस धुणंही सोपं होईल. ओले केस विंचरत असाल, तर ते अगदी काळजीपूर्वक करा, कारण ओले केस खूप नाजूक असतात, सहजच तुटतात.

शाम्पू करा
चांगल्या प्रतीच्या शाम्पूची निवड करा. कोमट पाण्याने संपूर्ण केस ओले करून घ्या. नंतर त्यावर शाम्पू लावा. शाम्पूही थेट न वापरता, शक्यतो थोड्या पाण्यामध्ये घोळून मग वापरा. शाम्पू केसांच्या मुळाशी पसरवा आणि केसांच्या मुळाशी हळुवार मसाज करा. केसांच्या मुळाशी हळुवार दाब देत, वर-खाली बोटं फिरवत हलका मसाज करा. यामुळे त्या भागातील रक्ताभिसरण सुधारेल आणि केसांच्या वाढीसही मदत होईल. चुकूनही गोलाकार मसाज करू नका, कारण त्यामुळे केसांचा गुंता होईल. नंतर केसांच्या टोकापर्यंत शाम्पू पसरवा. केस चोळू नका, दोन्ही हातांमध्ये केस घेऊन, हात हळुवार खाली आणा किंवा एका तळहातावर केस ठेवून त्यावरून दुसरा हात उभा फिरवा. मात्र हे सर्व करताना केसांच्या टोकांना विशेष सांभाळा. नंतर केस पाण्याने पूर्णतः स्वच्छ धुवा. मानेवरचा भाग धुवायला विसरू नका. लक्षात ठेवा, केस जोरजोरात घासू नका. त्यामुळे ते स्वच्छ होत नाहीत, उलट तुटण्याचीच शक्यता वाढते.

कंडिशनर लावा
बरेचदा आपण घाईघाईमध्ये केवळ केस धुतो, मात्र कंडिशनर लावत नाही. हे योग्य नाही. प्रत्येक वेळी केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करायलाच हवा.
हातावर लहान नाण्याइतकं कंडिशनर घेऊन, ते केसांच्या मुळापासून साधारण एक इंच वरून टोकापर्यंत पसरवा. कारण मुळांजवळचे केस तरुण व सर्वाधिक तेलकट असतात आणि केसांची टोकं सर्वांत जुनी व कोरडी असतात, त्यामुळे खूप नाजूक असतात. तेव्हा त्यांना कंडिशनर लागणं गरजेचं असतं. मात्र लक्षात ठेवा, केसांच्या मुळाशी मुळीच कंडिशनर लावू नका. केस हळुवार विंचरा आणि दोन ते चार मिनिटं केस तसेच ठेवून, नंतर व्यवस्थित धुवा. लक्षात ठेवा, कंडिशनर केसांवर कंडिशनर जितका अधिक वेळ राहील, तितकं उत्तम.
केसांवरील कंडिशनर पूर्णतः धुऊन स्वच्छ करा. कारण कंडिशनर केसांवर राहिला, तर केसांवर अधिक प्रमाणात तेल जमा होण्याची शक्यता वाढते.
केस धुतल्यानंतर केसांच्या मुळाशी खाज येत असल्यास, कंडिशनर केसांच्या मुळांना लागत नाहीये ना, याची खात्री करून घ्या.

थंड पाणी
केसांची तेल-शाम्पू-कंडिशनर ही ट्रिटमेंट झाली की, सर्वांत शेवटी केसांवर थोडं थंड पाणी घाला. केस धुण्यासाठी वापरलेल्या कोमट पाण्यामुळे केसांच्या मुळाशी असलेल्या त्वचेची उघडलेली सूक्ष्म छिद्रं थंड पाण्यामुळे बंद होतात. त्यामुळे आवश्यक कंडिशनर आणि नैसर्गिक तेलं त्वचेच्या मुळाशी राहतं. तसंच केसांना चमकही येते. थंड पाणी डोक्यावर घेणं शक्य नसेल, तर 2 कप पाण्यात 1 कप अ‍ॅपल सिडर व्हिनेगर एकत्र करून ते शाम्पू-कंडिशनर झाला की, केसांवरून ओता. व्हिनेगर हे एक सौम्य एक्सफॉलिएटर आहे.

लिव्ह-इन कंडिशनर लावा
केस धुतल्यानंतर विस्कटल्यासारखे दिसत असतील किंवा त्यात पटकन गुंता होत असेल, तर हेअर वॉशनंतर
लिव्ह-इन कंडिशनरचा वापर करता येईल. त्यामुळे केस दिवसभर व्यवस्थित राहतील. मात्र दररोज केस शाम्पूने धूत असाल, तरच लिव्ह-इन कंडिशनरचा वापर करा.

केस नैसर्गिक पद्धतीने सुकवा
केस धुऊन झाल्यावर केसांमधील अतिरिक्त पाणी केस हलवून किंवा टॉवेलच्या साहाय्याने काढून टाका.
काही मिनिटं टॉवेल तसाच केसांवर बांधून ठेवा, म्हणजे केसातील अतिरिक्त पाणी टॉवेलमध्ये शोषलं जाईल. मात्र ओल्या केसांवर टॉवेल जोरजोरात घासू नका, त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटण्याची शक्यता असते. त्यानंतर शक्यतो ड्रायरचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने केस सुकू द्या.केस धुण्याची योग्य पद्धत जाणून घेतानाच, या पद्धतीतील विविध घटकांविषयीही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण एखादी लहान चूकही केसांसाठी धोकादायक ठरू शकते.

केस धुण्यासाठी पाणी कसं वापरावं?
केस शक्यतो कोमट पाण्याने धुवा. कोमट पाण्यामुळे त्वचेवरील छिद्रं उघडण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेवर जमा झालेली घाण किंवा तेल सैल होतं आणि सहज निघून जातं. तसंच कंडिशनरमधील तेल त्वचेमध्ये शोषून घेण्यास मदत होते. मात्र सर्वांत शेवटी केसांवर थोडं थंड पाणी घालायला विसरू नका.

शाम्पू किती वापरावा?
बरेचदा आपण केसांसाठी गरजेपेक्षा जास्तच शाम्पू वापरतो. खरं तर केसांची लांबी खांद्याच्या वरपर्यंत असेल, तर एका नाण्याएवढा शाम्पू पुरेसा असतो. तेच केसांची लांबी खांद्यावरून खाली रुळणारी असेल, तर शाम्पूचं प्रमाण दुप्पट करा.

कोणता शाम्पू वापरावा?
बरेचदा या मुद्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. तुम्ही कोणता शाम्पू वापरताय, यावरही बरंच काही अवलंबून असतं. केसांच्या प्रकारानुसार शाम्पू आणि कंडिशनरची निवड करा. बर्‍याच जणांसाठी सामान्य शाम्पू चालतो. तरीही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कोरड्या केसांसाठी क्रिमी शाम्पू वापरा. केस नाजूक असतील तर प्रोटिन-बेस्ड शाम्पू वापरा. व्हॉल्युमायजिंग शाम्पू वापरल्यावर केस कोरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलकट केसांसाठी किंवा मॉइश्‍चरायजिंग उत्पादनं वापरल्यामुळे चिकचिकीत झालेल्या केसांसाठी त्याचा वापर करता येईल. केसांना कलर केला असेल, तर कलर-सेफ प्रकाराची निवड करा. केस खूप तेलकट असतील किंवा तुम्ही केसांवर चिकचिकीत स्टायलिंग उत्पादन वापर असाल, तर महिन्यातून एकदा किंवा दोनदा नेहमीच्या शाम्पूऐवजी क्लॅरिफाईंग शाम्पू वापरा.
शाम्पू वारंवार बदलू नका. काही जणांना असं वाटतं की, सतत शाम्पू बदलत राहिल्यास, केसांचं आरोग्य उत्तम राहतं. मात्र तज्ज्ञ सांगतात की, तुमच्या केसांना एखादा शाम्पू किंवा कंडिशनर व्यवस्थित सूट झाला असेल, तर तो बदलू नका.

केस किती वेळा धुवावेत?
आठवड्यातून केस किती वेळा धुवावेत, हेही तुमच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून आहे. वारंवार केस धुऊ नका. बहुतांश लोकांना दररोज केस धुण्याची गरज नसते.
एक दिवस आड किंवा दोन दिवसांनी एकदा केस धुणं योग्य ठरतं. कारण केसांच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केसांच्या मुळाशी असलेलं नैसर्गिक तेल केसांच्या टोकापर्यंत पोहोचल्यावर केस सर्वाधिक सुंदर दिसतात. केस वारंवार धुवायची गरज भासत असेल, तर वापरत असलेल्या उत्पादनाविषयी पुन्हा विचार करा. आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या प्रकारानुसार हेअर प्रॉडक्ट्स वापर करा.
केस धुण्याच्या योग्य पद्धतीमुळे तुमच्या केसांचा रंगढंग पूर्णतः बदलू शकतो. केसांचं आरोग्य सुधारून त्यांना छान चमक आणि बाउन्स मिळू शकतो. केस मुलायम होऊ शकतात. तेच काही सामान्य चुकांमुळे तुमचे सुंदर केस नकळतच खराबही होऊ शकतात. तेव्हा काळजीपूर्वक केस धुवा.