मराठी चित्रसृष्टीतील कलाकारांची भव्य भिंतीचित्र...

मराठी चित्रसृष्टीतील कलाकारांची भव्य भिंतीचित्रे : प्रवाह पिक्चर वाहिनीचा उपक्रम (Wall Paintings Of Marathi Cine Artistes On Tulsi Pipe Road : Pravah Pictures Unique Presentation)

दर्जेदार मराठी चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन आलेल्या ‘प्रवाह पिक्चर’ या वाहिनीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवला. या अनोख्या उपक्रमा अंतर्गत मुंबईतील तुलसी पाईप मार्गाजवळ मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सिनेमांचं भव्यदिव्य भिंतीचित्र साकारण्यात आलं. गेला महिनाभर अनेक चित्रकारांचा ताफा या निस्तेज भिंतीमध्ये जीव ओतण्यासाठी मेहनत घेत आहे. मराठी कलाकारांची हुबेहुब चित्र साकारत या चित्रकारांनी तुलसी पाईप मार्गाचं रुप पालटलं आहे. ही बोलकी भिंतीचित्रं सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव, अंकुश चौधरी आणि प्रतिभावंत दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खास उपस्थितीत ह्या भव्यदिव्य भिंतीचित्रांचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी ही अनोखी भिंतीचित्र रेखाटणाऱ्या चित्रकारांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रवाह पिक्चर वाहिनीच्या अगदी लॉन्च सोहळ्यापासून ते आता या भव्यदिव्य अशा भिंतीचित्रांपर्यंत प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा दिसत आहे, अशी भावना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केली. आम्ही जेव्हा चित्रपट करायला लागलो तेव्हा फ्लेक्सचा जमाना होता. पण आम्ही जेव्हा चित्रपट पाहायचो तेव्हा आपल्या सिनेमाची अशी चित्रकारांच्या कुंचल्यातून रंगलेली भिंतीचित्रं सर्वत्र लागावीत अशी इच्छा होती. आज प्रवाह पिक्चरमुळे ही इच्छा पूर्ण झाली आहे. तुलसी पाईप मार्ग हा बऱ्याच आठवणींचा साक्षीदार आहे. या मार्गाने अनेक एकांकिका जिंकल्याचा आनंदही पाहिलाय आणि बक्षिस मिळालं नाही याचं दु:खही वाटून घेतलं आहे. आज याच मार्गावर आपल्या सिनेमांची चित्रं साकारली जात आहेत, याचा अभिमान आणि आनंद आहे.

चला पिक्चरला जाऊया हे प्रवाह पिक्चर या वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे भिंतीचित्रांच्या माध्यमातून रेखाटलेले असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील, जे त्यांच्या आयुष्याशी आणि आठवणींशी निगडीत असतील असं दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले.

सध्या डिजिटलचा जमाना असला तरी हाताने रंगवलेल्या या भिंतीचित्रांची मजा न्यारीच आहे. यानिमित्ताने अनेक चित्रकारांना पुन्हा एकदा रोजगाराची संधी मिळाली आहे. प्रवाह पिक्चर वाहिनीचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आपली संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी या मार्गावर दिमाखात साकारण्यात आली आहे. हे सुखावणारं आहे, अशी भावना अंकुश चौधरी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अभिनेता भरत जाधव यांनी हाताने रेखाटलेल्या चित्रांची ही कल्पना खूप भन्नाट असल्याची भावना व्यक्त केली. प्रवाह पिक्चर वाहिनीच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक करावसं वाटतं. आज आमच्या सिनेमांची चित्र रेखाटण्यात आली आहेत आणि त्याच्या अनावरणासाठी आम्ही तिघं एकत्र आलो याचा आनंद आहे. ही भिंतीचित्रं पाहून आज निर्जीव भिंतींमध्येही नवं चैतन्य आलं आहे. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कलाकार म्हणून मला अतिशय अभिमान वाटतोय. इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही चित्रं आनंद देत राहतील असं भरत जाधव म्हणाले.