प्रतिक्षा संपली… रंग माझा वेगळा मालिकेत आ...

प्रतिक्षा संपली… रंग माझा वेगळा मालिकेत आली नवी कार्तिकी ( Wait Is Over : New Child Artist Maitreyi Datey To Play The Role Of Kartiki In ‘Rang Maza Vegla’ Serial)

टीआरपीच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडतं. या मालिकेत दाखवलेल्या दिपा आणि कार्तिकच्या मुली म्हणजेच दिपिका आणि कार्तिकी तर या मालिकेच्या प्राण आहेत. पण या मालिकेतील कार्तिकीचे पात्र साकारणाऱ्या बालकलाकार अभिनेत्री साईशा भोईरने ही मालिका सोडल्याने या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. साईशाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. साईशाच्या पालकांनी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी साईशाला नवा चित्रपट मिळाल्याने तिला ही मालिका सोडावी लागत असल्याचे सांगितले.  ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या टीमकडूनही तिच्या या निर्णयाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे मालिकेतून साईशाच्या अशा अचानक एक्झिटने आता कार्तिकी कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला होता.   

मात्र प्रेक्षकांची नव्या कार्तिकीबद्दलची उत्सुकता आता संपली असून नवी कार्तिकी कोण असणार हे उघड झाले आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत बालकलाकार ‘मैत्रेयी दाते’ कार्तिकीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. मैत्रेयीची ही आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी अभिनय अकादमीमध्ये तिचा प्रवेश घेतला. मैत्रेयीने बऱ्याच जाहिराती आणि बालनाट्यांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच मैत्रेयी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत असून तिला चित्रकलेचीही आवड आहे

मैत्रेयी आधीपासूनच ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका पाहत होती. तिला या मालिकेतील सर्वच पात्र आवडायचे. आता तिला स्वत:ला या मालिकेचा भाग व्हायला मिळणार असल्याने ती खूप आनंदी आहे. शिवाय शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच तिची आणि दिपिकाची म्हणजेच स्पृहाची सुद्धा चांगली गट्टी जमली आहे.