विवेक ओबेरॉय गरजवंत मुलांच्या शिक्षणासाठी देणार...

विवेक ओबेरॉय गरजवंत मुलांच्या शिक्षणासाठी देणार १६ कोटींची शिष्यवृत्ती (Vivek Oberoi To Help Needy Children, Announces Scholarship Worth Rs 16 Crore)

मागील काही दिवसांपूर्वी विवेक ओबेरॉयला हेलमेट आणि मास्क न घालता बाइक चालविल्यामुळे पोलिसांकडून बरेच भलेबुरे ऐकावे लागले होते आणि दंडही भरावा लागला होता. परंतु, सध्या विवेकचे नाव एका चांगल्या कामाच्या निमित्ताने घेतले जात आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयने गरजवंत मुलांच्या मदतीसाठी एका नवीन शैक्षणिक मोहिमेची सुरुवात केली आहे. त्याच्या या मोहिमेची सगळ्यांकडून प्रशंसा केली जात आहे.

विवेकने या शिष्यवृत्तीबद्दल सांगितले की, “जेव्हा खेड्यातील एखादं मूल काहीतरी मोठं काम करतो, त्यामुळे केवळ त्याचं कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव पुढे जातं. आपल्या आजूबाजूला अनेक प्रतिभावान मुलं आहेत. परंतु ते उच्च शिक्षण आणि कोचिंगचा खर्च उचलू शकत नाहीत. आर्थिक अडचणींमुळे ते त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. ही मुले कुठेही मागे राहू नये, असे मला वाटते. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी ही शैक्षणिक मोहीम आम्ही सुरू करत आहोत. जेणेकरून ते बाहेर जाऊन त्यांचे करिअर घडवू शकतील.’

सदर शैक्षणिक मोहिमे अंतर्गत पात्र मुलांना १६ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याचा खेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील मुलांना मोठा फायदा होईल. जेईई आणि एनईईटी क्रॅक करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलांना या शिष्यवृत्तीमुळे मदत होईल. याची सुरुवात आय ३० ट्रेनिंग प्रोग्रामपासून केली गेली आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम गणितज्ञ आनंद कुमार यांच्या सुपर ३० प्रोग्रामचाच एक भाग आहे.

आय ३० प्रोग्राम अंतर्गत लहान-लहान शहरांमध्ये ९० व्हर्च्युअस लर्निंग सेंटर सुरू केले गेले आहेत. जेणेकरून आयआयटी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी क्लासरुमपर्यंत पोहोचू शकतील आणि कमी किंमतीत जेईई आणि एनईईटीचा अभ्यास करू शकतील.

विवेक ओबेरॉय आणि त्याच्या टीमचे खरोखर या शिष्यवृत्ती मोहिमेसाठी कौतुक करावं तेवढं थोडं आहे. विवेकच्या करिअरबद्दल बोलायचं तर लवकरच तो अनेक चित्रपटांतून आपणांस दिसणार आहे शिवाय काही चित्रपटांची तो स्वतः निर्मिती करत आहे. ‘रोजी: सैफरन चैप्टर’ असं त्यापैकी एका चित्रपटाचं नाव असून या चित्रपटातून टीव्हीवरील अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी डेब्यू करणार आहे.