विशाखा सुभेदारने जागवल्या आपल्या लोकल प्रवासाच्...

विशाखा सुभेदारने जागवल्या आपल्या लोकल प्रवासाच्या आठवणी: ती फेरीवाली देखील झाली होती( Vishakha Subhedar Reminds Her Journey Of Mumbai Local Trains: Where She Worked As An Hawker Also)

सध्या बस बाई बस या शोला प्रेक्षकांची चांगली प्रसिद्धी मिळत आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तबगार स्त्रिया येऊन आपल्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से सांगतात. प्रेक्षकांना सुद्धा सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यात रस असतो. त्यामुळे या शोला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत आहे. नुकतीच या शोमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदारने उपस्थिती लावली होती.

विशाखाने या शोमध्ये सूत्रसंचालक सुबोध भावेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन रंगत आणली. तसेच तिने आपल्याबाबतच्या अनेक गोष्टी शेअर केल्या. करिअरच्या सुरुवातीला तिला रोज अंबरनाथ ते दादर असा प्रवास करावा लागायचा. त्याकाळी लोकलच्या प्रवासात वस्तूही विकल्या असल्याचं सांगत तिने करिअरच्या सुरुवातीच्या काळातील खडतर आठवणी सांगितल्या.

विशाखा म्हणाली, “मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी मी शाळेत शिक्षिका होते. तेव्हा मी आकाशवाणीलाही काम करायचे. दुपारी एक वाजता शाळा सुटली की मी लोकल पकडून व्ही.टी.ला जायचे. उल्हासनगरवरून मी ड्रेस मटेरिअल घ्यायचे. आणि या लोकलच्या प्रवासात ते विकायचे. लिपस्टिक, नेलपेंटचा होलसेलने घेतलेला स्टॉकही मी लोकल आणि आकाशवाणीमधील महिलांना विकायचे. त्यामुळे आयुष्यातील लोकलप्रवास हा अविस्मरणीय आहे”.

“लोकलमध्ये वेफर्स, नेलपेंट विकणाऱ्या महिलांशीही माझी मैत्री होती. त्या मला नावाने ओळखत होत्या. नंतर कलाक्षेत्रात आल्यानंतर प्रयोग असल्यावर मी कायम शेवटची लोकल पकडून दोन सव्वा दोनला घरी जायचे.

लोकलमधील तृतीय पंथीयांचीही मला या रात्रीच्या प्रवासात साथ मिळायची. मला कधीच त्यांची भीती वाटली नाही. त्यामुळे या लोकल प्रवासातील खूप आठवणी माझ्याजवळ आहेत”, असं म्हणत विशाखाने आपल्या लोकलमधील प्रवासाच्या आठवणी शेअर केल्या.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया