विक्रम गोखले माझे कोणी नाहीत…..;सखी गोखले...

विक्रम गोखले माझे कोणी नाहीत…..;सखी गोखलेने व्यक्त केला संताप (” Vikram Gokhale Is Not My Relative”- Sakhi Gokhale Clarifies To Trollers)

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत  सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. मात्र अशातच दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री सखी गोखलेने आपला संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.

विक्रम गोखले हे सखी गोखलेचे सख्खे काका असल्यांचा गैरसमज अनेकांना होता. शिवाय इंटरनेटवरीही तशीच माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे विक्रम गोखलेंचे निधन झाल्यावर संपूर्ण इंडस्ट्रीतील लोक शोक व्यक्त करणाऱ्या, श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मात्र सखी त्यांची सख्खी पुतणी असूनही तिने काहीच पोस्ट केले नाही म्हणून युजर्स तिला ट्रोल करत होते. कमेंट बॉक्समध्ये तिला उलटेसुलटे प्रश्न विचारत होते. त्यामुळे यासंदर्भात सखीने एक पोस्ट शेअर करुन आपला संताप व्यक्त केला आहे.

सखीने पोस्टमध्ये लिहिले की,  “अभिनेते विक्रम गोखले हे एक उत्कृष्ट अभिनेता होते. लहानपणापासून त्यांचं काम व त्यांची पडद्यावरची जादू मी पाहिली आहे. त्यांचं जाणं ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. पण विक्रम काका व माझे वडील हे दोघं भाऊ नव्हते. विक्रम काकांच्या कुटुंबांचा व आमचा काहीही संबंध नाही. फक्त दोन कुटुंबामध्ये मैत्रीचं नातं आहे. इंटरनेटवरील प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विकिपीडियाचा वापर करत तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडत असाल तर ती तुमची चुकी आहे.”

“त्यांचा (विक्रम गोखले) माझ्याशी काही संबंध आहे की नाही, मी त्यांच्याबाबत काही पोस्ट करायचं की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. विक्रम काका गेल्यानंतर त्यांच्याबाबत मी काहीच पोस्ट शेअर केली नाही. याबाबतचे असंख्य मॅसेज मला आले आहेत. शिवाय काहींनी माझ्यावर राग व्यक्त केला आहे. माझ राग करण्याआधी यामागे खरं कारण काय आहे हे शोधा.

माझ्याशी विनम्र वागण्यात तुम्ही जेवढा वेळ घालवलात त्या वेळेचा तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी वापर करा. जेणेकरून तुमच्या कुटुंबियांना व मित्रांना तुमची लाज वाटणार नाही.” सखीने या पोस्टमार्फत ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.