विजय देवरकोंडाने लाइगर चित्रपट फ्लॉप झाल्याने न...

विजय देवरकोंडाने लाइगर चित्रपट फ्लॉप झाल्याने नुकसान भरपाईसाठी उचललं मोठं पाऊल (Vijay Deverakonda Took This Step to Compensate for Loss After Flop of Film ‘Liger’)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे चांगलेच नुकसान झाले. साऊथमध्ये विजय देवरकोंडाचे चित्रपट जरी जोरदार चालत असले तरी ‘लाइगर’ हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे निर्मात्यांनाही चांगलाच फटका बसला आहे. विजय देवरकोंडा देखील हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे दुखावला गेला आहे. चित्रपटाचे नुकसान झाल्यामुळे ते भरुन काढण्यासाठी विजयने मोठे पाऊल उचलले आहे.

प्रेक्षक ‘लायगर’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते मात्र 25 ऑगस्टला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरला. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या अपेक्षेपेक्षा चित्रपटाने खूपच कमी कमाई केली. तसेच अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो देखील रद्द झाले. त्यामुळे 100 कोटी खर्च करून बनवलेला हा चित्रपट आपल्या बजेटच्या निम्मीही कमाई करू शकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार प्रदर्शनानंतर या चित्रपटाने फक्त 40 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘लायगर’ चित्रपट  फ्लॉप झाल्यामुळे दुखावलेल्या विजय देवरकोंडाने हे नुकसान स्वतःहून भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.  विजय देवरकोंडाने चित्रपटातून मिळालेल्या कमाईपैकी 6 कोटी रुपये निर्मात्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 ज्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला, त्या दिवशी त्याचे ओपनिंग कलेक्शन 15 कोटींच्या आसपास होते. तेव्हापासून चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घसरण होऊ लागली आणि अनेक ठिकाणी शो रद्द झाल्यानंतर हा एक मोठा फ्लॉप चित्रपट ठरला, त्यामुळे वितरक आणि निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे, मात्र आता विजय देवरकोंडा त्यांना 6 कोटी परत करणार आहे.

विजय देवरकोंडा येत्या काळात ‘जन गण मन’ या चित्रपटात दिसणार आहे. पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, मात्र ‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवकोंडा चिंतेत आहे.त्यामुळे विजय देवरकोंडासोबतच दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनीही या चित्रपटाची फी न घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.