कतरिनाने तिच्या लग्नसोहळ्यात विकीचे १ कोटी रुपय...

कतरिनाने तिच्या लग्नसोहळ्यात विकीचे १ कोटी रुपये वाचवले, नेमकं काय घडलं विकीनेच सांगितलं (Vicky-Kaushal-Reveals-Katrina-Kaif-Scold-Her-6-Sisters-For-Joota-Chupai-Rasam-At-Their-Wedding)

राजस्थानमधील सवाईमाधोपूर येथे ९ डिसेंबर २०२१ रोजी विकी-कतरिनाने काही जवळच्या नातलगांसमवेत लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या खासगी स्वरुपाच्या लग्नसोहळ्याचे किस्से आजही चर्चिले जातात.

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या डेटिंगपासून ते लग्नाच्या विधींपर्यंत सगळ्याच गोष्टी गुपित ठेवण्यात आल्या होत्या. लग्नाआधी या दोघांनी कधीच रिलेशनशिप किंवा लव्हस्टोरीबाबत भाष्य केलं नव्हतं. एवढंच नाही तर त्यांनी बॉलिवूडमधील कोणालाच लग्नासाठी निमंत्रण दिलं नव्हतं. राजस्थानमधील सवाईमाधोपूर येथे ९ डिसेंबर २०२१ रोजी विकी- कतरिनाने सप्तपदी घेतली होती. पण त्याच्या खासगी स्वरुपाच्या लग्नसोहळ्याचे किस्से आजही चर्चेत असतात.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नानंतर विकीने बुट लपविणाऱ्या त्याच्या ६ मेहुण्यांसाठी १ कोटीपेक्षा जास्त रक्कम दिल्याचं बोललं गेलं होतं. त्यांच्या लग्नाचा हा किस्सा त्यावेळी बराच चर्चेतही होता. पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा विकी कौशलने नुकताच ‘कपिल शर्मा शो’मध्ये केला आहे. लग्नात बूट लपवण्याच्या खेळात विकीने कतरिनाच्या बहिणींना काय दिलं असा प्रश्न विचारल्यानंतर विकीने लग्नातला तो धम्माल किस्सा शेअर केला.

विकी कौशल म्हणाला, “आम्ही दुपारी सप्तपदी घेतली होती. कतरिनाच्या बहिणी माझे बूट लपवण्यासाठी तयार होत्या आणि दुसरीकडे माझे चंदीगढमधून आलेले भाऊ त्यांना असं करू देणार नाही अशा तयारीत होते. पण सप्तपदी सुरू होताच कतरिनाच्या बहिणींनी माझे बूट लपवले. सप्तपदी झाल्यानंतर कतरिनाला लगेचच सनलाइटमध्ये फोटोसेशन करायचं होतं. त्यामुळे ती म्हणाली, चला लवकर फोटो काढू नाहीतर सूर्यप्रकाश जाईल. मला फोटो काढायचे आहेत.”

विकी कौशल पुढे म्हणाला, “कतरिनाने असं म्हटल्यानंतर मी उभा राहिलो, पण माझे बूट तिथे नव्हते. मग असं झालं की बूट चोरले गेलेत आता पैसे वैगरे द्यावे लागणार. पण सनलाइटच्या गोंधळात कतरिनाच तिच्या बहिणींवर चिडली आणि म्हणाली, त्याचे बूट आणून द्या. ती स्वतःच तिच्या बहिणींवर भडकल्याने मला काहीच पैसे द्यावे लागले नाही आणि माझे बूट मला परत मिळाले.”

(फोटो सौजन्य- कतरिना कैफ, विकी कौशल इन्स्टाग्राम)