ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्...

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड (Veteran Director Sumitra Bhave Passes Away)

प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा यांनी आकाशवाणीवर वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते.

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट गाजले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले; तर अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

‘विचित्र निर्मिती’ या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि सर्वसामान्य माणसांच्या गोष्टी त्यांनी चित्रपटातून मांडल्या. सुमित्रा भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. सुमित्रा भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये काम केलं.

पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर सुमित्रा भावे अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे.