ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन (Vetera...

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन (Veteran Bollywood Actor Dilip Kumar Passes Away)

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. परंतु बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिलीप कुमार यांना श्वसनाच्या त्रासामुळे 29 जून रोजी दुस-यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांना 6 जून रोजी देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हादेखील त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवला होता. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते. 9 जून रोजी त्यांच्यावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.