प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन (Veteran A...

प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन (Veteran Actress Shashikala Passes Away At Age Of 88 In Mumbai)

प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे आज दुपारी वयाच्या ८८व्या वर्षी मुंबईतील कुलाबा येथील घरी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही दु:खद बातमी शेअर केली आहे.
४ ऑगस्ट १९३२ रोजी शशिकला जवळकर यांचा सोलापुरमध्ये जन्म झाला होता. ७० व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री, खलनायिका आणि सहाय्यक अभिनेत्री अशा सर्व प्रकारच्या भूमिका करून चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये काम केलं. २००७ साली भारत सरकारनं शशिकला यांना त्यांच्या सिनेमातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं असून २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्रदान करण्यात आला आहे. शशिकला यांनी ‘सुजाता’, ‘आरती’, ‘अनुपमा’, ‘पत्थर और फूल’, ‘आई मिलन की बेला’, ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘खूबसूरत’, ‘छोटे सरकार’, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलिकडची त्यांची चित्रपट कारकीर्द सांगायची तर शशिकला यांनी करण जोहरच्या मल्टीस्टारर चित्रपट कभी खुशी कभी गम या चित्रपटात विशेष भूमिका साकारली होती. याशिवाय ‘बादशाह’, ‘चोरी चोरी’, ‘परदेस’ या चित्रपटांतही त्यांनी काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त शशिकला अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये आई आणि सासूच्या भूमिकेतही दिसल्या आहेत.