‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाच्या सु...

‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाच्या सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका तबस्सुम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन… (Veteran Actor Tabassum Dies Of Cardiac Arrest At 78, Deets Inside)

सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे.

तबस्सूम यांच्याबरोबर एका कार्यक्रमासाठी चित्रीकरण सुरू होते. काही भाग पूर्ण झाला होता आणि उर्वरित भागाचे चित्रीकरण पुढच्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र त्याआधीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहिती त्यांचा मुलगा होशांगने दिली. त्या रुग्णालयातून घरी परतल्या होत्या. मात्र शुक्रवारी त्यांना पुन्हा प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

१९४७ साली बालकलाकार म्हणून तबस्सुम यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’या कार्यक्रमाचे त्यांनी सुत्रसंचलन केले होते. या शोमध्ये त्यांनी सिने जगताशी संबंधित लोकांशी खास संवाद साधाला. या शोला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.

वयाच्या तिसऱ्या वर्षी कॅमेऱ्यासमोर उभे राहून त्यांनी नर्गिस चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर बैजू बावरा चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.  हिर रांझा, गॅम्बलर, जानी मेरा नाम, तेरे मेरे सपने, सूरसंगम, अग्निपथ, नाचे मयुरी अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले.

रामायण फेम अरूण गोविल यांच्याशी तबस्सुम गोविल यांचे जवळचे नाते आहे. अरूण गोविल यांचे भाऊ विजय गोविल यांच्या त्या पत्नी होत्या. २१ नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ येथे त्यांची प्रार्थना सभा होणार आहे.