मराठी मालिकेतील आगळीवेगळी वटपौर्णिमा (Vatapaurn...

मराठी मालिकेतील आगळीवेगळी वटपौर्णिमा (Vatapaurnima Celebrations In Marathi Serials)

वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. यमाच्या तावडीतून सत्यवानाला वाचवणाऱ्या सावित्रीची आठवण ठेवून हा सण महिला सर्वत्र उत्साहाने साजरा करतात. सौभाग्याचं प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार वडाला अर्पण करतात आणि वडाला सात प्रदिक्षणा घालत सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्षाचे पूजन करतात. पडद्यावरील वैवाहिक आयुष्य रंगवताना टेलिव्हिजनच्या वेगवेगळ्या चॅनेलवरील मालिकांतूनही सध्या वटपौर्णिमेच्या गेटअपमध्ये अभिनेत्री हा सण साजरा करताना चित्रित केले जाते.

हा सण आपल्याला निसर्गाच्या जवळ जायला भाग पाडतो. वडाचं झाड म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करणारी निसर्गाची देणगीच. सध्याच्या घडीला आपल्या प्रत्येकालाच या ऑक्सिजनचं महत्त्व पटतं आहे. हे लक्षात घेऊनच स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या अतिशय लोकप्रिय मालिकेच्या सेटवर आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. या मालिकेच्या टीमने कुंडीतच वडाचं झाड लावून त्याची साग्रसंगीत पूजा केली आणि यानिमित्ताने

प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. या मालिकेतील अंकिताची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. तर दुसरीकडे अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नात्यात तणाव असला तरी अनिरुद्धच्या निरोगी आयुष्यासाठी अरुंधती प्रार्थना करणार आहे.

कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘सुंदरा मनामध्ये या मालिकेमध्ये संजू आणि लतिका देखील वटपौर्णिमा साजरी करत आहेत. नोकरी आणि घराचं कर्तव्य पार पाडणाऱ्या संजूची वटपौर्णिमा देखील जरा निराळीच असणार आहे. अन्‌ यामध्ये तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळणार आहे. तर, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये, अभि – लतीचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आता त्यांच्यातील नात्याची अग्नीपरीक्षाच आहे जणू… वटपौर्णिेमेच्या मुर्हूतावर कामिनी, लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशीच अभि आणि लती यांचं लग्न खोटं असल्याचं सत्य घरच्यांसमोर उघडकीस येणार आहे. तेव्हा या सर्वच मालिकांचे वटपौर्णिमा विशेष भाग निश्चितच आगळेवेगळे ठरणार आहेत.