वरुण धवन आहे उच्चशिक्षित, शिक्षण ऐकून व्हाल थक्...

वरुण धवन आहे उच्चशिक्षित, शिक्षण ऐकून व्हाल थक्क (Varun Dhawan Is Very Educated, You Will Be Stunned To Know His Qualification)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फारसे शिकलेले नाहीत. अभिनय क्षेत्रात करीअर करण्यासाठी अनेकांनी शिक्षण सोडून दिले, तर काहींना इच्छा असूनही शिक्षण घेता आले नाही. पण असेही अनेक कलाकार आहेत, जे अभिनयातील हुशारीसोबत उच्चशिक्षितही आहेत. या कलाकारांनी आपलं करिअर सुरू करण्यापूर्वी आपलं शिक्षण पूर्ण केलं. वरुण धवन हा सुशिक्षित कलाकारांपैकी एक आहे. 

24 एप्रिल 1987 रोजी मुंबईत जन्मलेला वरुण धवन हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. वरुणचा भाऊ रोहितही फिल्म इंडस्ट्रीत काम करतो. वरुण धवनच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्याने एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने युनायटेड किंगडमच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधून बिझनेस स्टडीजची पदवी घेतली आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर वरुणने शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात सर्वप्रथम करण जोहरला असिस्ट केले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने प्रथम सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

यानंतर वरुणने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘मैं तेरा हीरो’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बदलापूर’ आणि ‘ABCD’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि धमाकेदार नृत्याने सर्वांना वेड लावले.

वरुण धवनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्याने 24 जानेवारी 2021 रोजी बालपणापासूनची मैत्रीण नताशा दलालशी लग्न केले. त्याची पत्नी नताशा एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.

वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘भेडिया’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे. याशिवाय वरुणकडे ‘बवाल’ हा चित्रपटही आहे, ज्यामध्ये जान्हवी कपूर त्याच्यासोबत दिसणार आहे.

इतकेच नाही तर वरुण प्रसिद्ध अमेरिकन ड्रामा सीरीज ‘सिटाडेल’च्या भारतीय स्पिनऑफचा भागही असणार आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या वरुण धवनची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. वरुणचे इन्स्टाग्रामवर ४४.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम