खुलेपणाने आपलं प्रेम व्यक्त करणारे छोट्या पडद्य...

खुलेपणाने आपलं प्रेम व्यक्त करणारे छोट्या पडद्यावरील हे ८ टी.व्ही. कलाकार (Valentine Special: 8 TV stars Who Proposed To Their Sweethearts On National Television)

टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी सगळ्यांसमोर अगदी खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केलेले आहे. कोणी अंगठी घालून, तर कोणी आपल्या मनातील भावना बोलून नॅशनल टेलिव्हिजनवर सगळ्यांसमोर आपल्या प्रेमप्रकरणाबद्दलचा दुजोरा दिला होता. व्हॅलेन्टाईन दिन सेलिब्रेशनच्या निमित्ताने टेलिव्हिजनवरील ज्या कलाकारांनी अशाप्रकारे आपलं प्रेम व्यक्त केलं आहे, त्यांच्या प्रेमाचे रंग पाहुयात.

दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम
दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम ही टेलिव्हिजनवरील सर्वाधिक रोमॅन्टिक जोडी मानली जाते. ‘ससुराल सिमरन का’ या मालिकेच्या सेटवर या दोघांचं सूत जमलं. तेव्हा सगळ्यांसमोर शोएबने आपल्या प्रेमाचा खुलासा केला होता. या जोडीने डान्स रिॲलिटी शो ‘नच बलिए’च्या सीजन ५ मध्येही भाग घेतला होता. याच डान्स शोच्या मंचावर एका गुडघ्यावर बसून शोएबने दीपिकाला मागणी घालत असं म्हटलं की, ”आज मी जो काही आहे तो केवळ तुझ्यामुळेच. ‘ससुराल सिमरन का’ मालिका सोडल्यानंतर मला काम मिळत नव्हतं, त्यावेळेस माझी वेळ वाईट असताना त्यातून कसं बाहेर पडायचं हे तू मला सांगितलंस. हो, मी खूप रोमँटिक आहे, पण तू समोर आलीस की मी काही बोलू शकत नाही.” इतकं ऐकल्यानंतर दीपिकाने त्याला मिठीच मारली. आता लग्न करून दोघंही आनंदी आहेत आणि टेलिव्हिजनवरील आदर्श जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

हिना खान आणि रॉकी जायसवाल
हिना खान आणि रॉकी जायसवाल गेली ७ वर्षं रिलेशनशिपमध्ये आहेत आणि दोघांमध्ये खूपच छान बाँडिंग आहे. ‘बिग बॉस’च्या सीजन ११ मध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या हिनाला रॉकीने जाहिरपणे आपल्या मनातील भावना सांगितली. बिग बॉसमध्येच आपलं प्रेम व्यक्त करताना रॉकी हिनाला म्हणाला होता,” आपण एकमेकांसोबत अतिशय चांगला वेळ घालविला आहे. तुझ्याशिवाय जो वेळ मी घालविला आहे, त्याच्याइतके वाईट दिवस माझ्या आयुष्यात नाही. आता बिग बॉस संपल्यानंतर तुझं संपूर्ण आयुष्य तू माझ्या नावे लिही.” रॉकीने इतक्या भावुकतेने आपलं प्रेम व्यक्त केलं की हिना आपल्या डोळ्यांत तराळलेलं पाणी रोखू शकली नाही.

रित्विक धनजानी आणि आशा नेगी
एक वेळ अशी होती की ज्या वेळेस रित्विक धनजानी आणि आशा नेगी यांची जोडी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लव्हेबल कपल म्हणून ओळखली जात होती. टेलिव्हिजनवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. त्यानंतर दोघांनी रितसर आपल्यातील नातं जाहीर केलं. रित्विकनेही एका डान्स शोमध्ये आशाला मागणी घातली होती. सहा वर्षं रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. त्यांच्या ब्रेकअपच्या खबरेने त्यांच्या चाहत्यांना अतिशय वाईट वाटले होते.

रवि दुबे आणि सरगुन मेहता
रवि दुबे आणि सरगुन मेहताने टी.व्ही. शो ‘१२/२४ करोल बाग’ मध्ये एकत्र काम केलं होतं. येथूनच त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. या शोनंतर रविने टेलिव्हिजनवरील एका डान्स रिॲलिटी शोमध्ये सरगूनवर आपलं प्रेम असल्याचं सांगितलं होतं. डान्स रिॲलिटी शो ‘नच बलिए’च्या ५ व्या सीझनमध्ये या दोघांचा सहभाग होता आणि त्याच मंचावर रविने गुडघ्यावर बसत अतिशय रोमँटिक अंदाजात सरगुनला अंगठी देऊन लग्नासाठी मागणी घातली होती. सरगुनला नवलंच वाटलं. कारण रविचं आपल्यावर प्रेम आहे हे तिला आधी माहीत नव्हतं. परंतु मग तिनेही सगळ्यांसमोर रविचं प्रेमाचं प्रपोजल स्वीकारलं. आज ही दोघंही टेलिव्हिजनवरील अतिशय क्यूट कपल मानले जातात.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूत आता आपल्यात नाही. पण जिवंत असताना सुशांत आणि अंकिता लोखंडे यांची जोडी अतिशय लोकप्रिय झाली होती. काही कारणास्तव दोघांचे मार्ग नंतर बदलले. परंतु या दोघांना एकत्र पाहणं हे त्यांच्या दर्शकांच्या इतकं अंगवळणी पडलं होतं, की ब्रेकअपनंतरही बराच काळ लोकांच्या मनात या जोडीनं घर केलेलं होतं. एकता कपूर निर्मित ‘पवित्र रिश्ता’ या मालिके दरम्यान दोघांची भेट झाली होती. सुरुवातीला ते दोघे चांगले मित्र बनले. नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यांनी ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमध्ये भाग घेतला होता. डान्सच्या या रिॲलिटी शोमध्ये व्हॅलेंटाईन डे स्पेशल एपिसोड असताना सुशांतने लाइव्ह टीव्हीसमोर अंकिताला प्रपोज केलं आणि अंकितानेही सुशांतसोबत लग्नास होकार दिला होता. दोघं काही वर्षं एकत्र राहिली पण पुढे त्यांचं ब्रेकअप झालं.

गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी
टेलिव्हिजनवर राम आणि सीताच्या रुपाने लोकप्रिय झालेली गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांची जोडी टीव्हीवरील आदर्श जोडप्यांपैकी एक आहे. गुरमीतने देबिनाला ‘पति, पत्नी और वो’ या रिॲलिटी शोच्या शुटिंगच्या वेळी प्रपोज केलं होतं. गुरमीतच्या प्रेमळ प्रपोजलने देबीना इतकी भावूक झाली की तिच्या डोळ्यांत पाणी आले. त्यानंतर २०११ साली या दोघांनी एका खाजगी समारंभामध्ये लग्न केलं.

उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना
उपेन पटेल याने करिश्मा तन्नाला टेलिव्हिजनवर सगळ्यांसमोर प्रपोज केलं होतं. ‘बिग बॉस’ सीझन ८ आणि ‘नच बलिए’ सीजन ७ अशा दोन रिॲलिटी शोमध्ये ही दोघं एकत्र दिसली होती. ‘नच बलिए’च्या मंचावर गुडघ्यावर बसून हातात अंगठी घालत त्याने करिश्माला प्रपोज केलं होतं. परंतु त्यांच्यातील प्रेम फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांचा ब्रेकअप झाला.

सारा खान आणि अली मर्चेंट
‘बिग बॉस’ ४ या रिॲलिटी शो दरम्यान सगळ्या जगासमोर अली मर्चंटने सारा खानला प्रपोज केलं होतं. एवढंच नव्हे तर याच शोच्या मंचावर त्या दोघांनी सात फेरेही घेतले होते. परंतु शो संपल्यानंतर त्यांचं लग्नही पूर्णपणे कोलमडलं आणि त्या दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले.