वहिनी फार सोसते आहे… (Vahini is very tole...

वहिनी फार सोसते आहे… (Vahini is very tolerant…)

माझे वडील वारल्यापासून घरात मी, आई आणि मोठा भाऊ, असे तिघेच जण आहोत. आमचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. आम्हा बहीण-भावांत खूप प्रेम आहे, जिव्हाळा आहे. आईचीही आमच्यावर मोठी माया आहे. गेल्या वर्षी मोठ्या भावाचं लग्न झालं. त्याचं लव्ह मॅरेज आहे. मला वहिनी मिळाली. तिचं नाव राधा. ती पण आमच्यात चांगली मिसळून गेली. भाऊ ऑफिसात  जातो, तेव्हा घरात आम्हा तीन बायकांचं राज्य असतं. आम्ही खूप मजा करतो; पण राधा मौजमजा करताना आपलं कर्तव्य विसरत नाही. ती प्रत्येक कामात पुढाकार घेते. आम्हाला काहीच काम करू देत नाही. शिवाय ती घरूनच कॉम्प्युटरवर काम करते. त्यातून मिळणार्‍या पैशांचा घराला हातभार लागतोच. ही राधा एवढी गुणी असून, आता माझा भाऊ तिला सतत टोचून बोलू लागला आहे. छोट्या-छोट्या गोष्टीवरून तिची इज्जत काढतो. तरीही राधा शांत राहते. माझी आई त्याला अडवते; पण तो तिच्या मागे राधाला अपमानास्पद वागणूक देतोच. रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्याकडे पाहुणे आले होते. त्यांच्यासमोर भावाने राधावहिनीचा इतका पाणउतारा केला की, ती बेडरूममध्ये जाऊन ढसाढसा रडली. मीही तिथे जाऊन खूप रडले. आमच्या घरात यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. भावाच्या स्वभावापायी वहिनी फार सोसते आहे. मला भावाचा खूप राग आला आहे; पण त्याला कसं समजवावं, ते कळत नाही. कृपया मार्गदर्शन करा.

दुर्दैवाने या जगात आपल्या बायकोला, बहिणीला, आईला गृहीत धरणारी माणसं आहेत. तुझा मोठा भाऊ हा त्यापैकीच एक आहे. त्यामुळे घराघरात स्त्रियांचे अपमान होतात. अन् तुझ्यासारख्या संवेदनशील मन असलेल्या तरुण मुलीला ते पाहवत नाही. स्त्रीला काही किंमत नाही, असं तुझ्या भावाला वाटत असावं. पण तू वेळीच जागरूक असल्याने त्याला मार्गावर आणता येईल. एक स्त्री या नात्याने तुला आपल्या वहिनीची निंदा पाहवत नाही, ही चांगली गोष्ट आहे. राधाची निंदा, अपमान थांबवायचं असेल, तर तुला गप्प बसून चालणार नाही. तू मन घट्ट करून तुझ्या मोठ्या भावाशी बोल. घरात आलेली सौभाग्यवती ही लक्ष्मी असते. तिची पूजा करायला हवी, याची जाणीव त्याला करून दे. या लक्ष्मीचा मान राखायचा असतो. चारचौघांत काय; पण एकांतातही तिचा अपमान करू नकोस, हे त्याला समजावून सांग. आता तर लग्नाला एकच वर्ष झालं आहे. उभं आयुष्य एकमेकांना एकत्र घालवायचं आहे. तेव्हा असं वागून कसं चालेल, याची समज तुझ्या भावाला दे. तो तुझा मोठा भाऊ असल्याने कदाचित अशी समज देणं तुला जड जाईल. तेव्हा तुझ्या आईला विश्‍वासात घे. तिच्यासमोर तू भावाला सांग. अथवा तिला, तुझ्यासमोर त्याच्याशी बोलायला सांग. हे समानतेचं युग आहे. आपल्या बायकोला गुलामासारखं वागवून, तिचा अपमान करण्याची आता प्रथा नाही, अन् गरजही नाही. अशी भावाची व्यवस्थित कानउघडणी करा. आज राधा मुकाटपणे सगळं सहन करते आहे. पण कधी तिचा संंयम सुटला अन् तिने उलट उत्तरं देऊन तुझा अपमान केला तर… याची कल्पना त्याला दे.