प्रेक्षकांना अक्षरशः जागीच खिळवून ठेवणारा, ‘वध’...

प्रेक्षकांना अक्षरशः जागीच खिळवून ठेवणारा, ‘वध’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (Vadh trailer: Neena Gupta and Sanjay Mishra trapped by a dark crime)

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता अभिनित ‘वध’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा आहे. अलीकडेच, या चित्रपटाचे टीझर पोस्टर्सदेखील प्रदर्शित झाले, ज्यामुळे दर्शक या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच, ‘वध’या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महरौलीमध्ये नुकत्याच झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण करून देणारा जवळपास २ मिनिट ४१ सेकंदांचा हा दमदार ट्रेलर तुम्हाला श्वास रोखून धरण्यास भाग पाडतो.

‘वध’च्या बहुचर्चित ट्रेलर प्रेक्षकांना अक्षरशः जागीच खिळवून ठेवतो. प्रेक्षकांनी संजय मिश्रा यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारताना पाहिलं आहे, पण आता ‘वध’या चित्रपटामार्फत संजय मिश्रा एका अनोख्या भूमिकेसह दर्शकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर इतका अनपेक्षित आहे कि यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या व्यक्तिरेखेत खूपशी निरागसता दिसत असली तरीसुद्धा त्यांची डार्कसाइड ट्रेलरचा एक महत्वपूर्ण भाग आहे.

‘वध’बद्दल बोलताना संजय मिश्रा म्हणाले, “एक अभिनेता म्हणून मी अशा पात्राची कल्पनाही केली नव्हती, तीही नीनाजींसोबत. प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

नीना गुप्ता म्हणाल्या, “‘वध’ही एक अतिशय मनोरंजक थ्रिलर कथा आहे आणि या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी चांगला वेळ घालवला. कथा जशी दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने आकर्षक आहे. आणि प्रेक्षक ट्रेलर तसेच चित्रपट पाहण्याचा आनंद घेतील.”

‘वध’हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.