एअर प्युरिफायर शुद्ध हवेचा अधिकार (Use Purifier...

एअर प्युरिफायर शुद्ध हवेचा अधिकार (Use Purifier To Combat Polluted Air)

सध्याच्या वायू प्रदूषणाचा स्तर लक्षात घेता एअर प्युरिफायर ही चैनीची बाब नसून, प्राथमिक गरज आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
स्पर्धात्मक विकासाच्या ओढीमुळे सतत वाढणारं औद्योगिकीकरण, नवनवीन तंत्रज्ञान यांचा अर्थातच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत होता आणि होत आहे. आता हा घातक परिणाम आपल्याला थेट जाणवू लागला आहे एवढंच. ऋतुचक्रात झालेला लक्षणीय बदल आणि त्यात वाढतं प्रदूषण यामुळे आजार वाढताहेत, बळावताहेत. आजवर आपण पाण्याच्या प्रदूषणाबाबत चिंता करत होतो. आता त्याहून चिंतेचा विषय आहे, वायू प्रदूषण. सध्या सर्वच स्तरातील, वयोगटातील व्यक्तींमध्ये श्‍वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. बरेचदा या तक्रारी जिवावरही बेतत आहेत. हे सर्व वायू प्रदूषणाचंच द्योतक आहे.


वाढत्या वायू प्रदूषणाची कारणं
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात सोडले जाणारे विविध वायू, वाहनांचा धूर, धूळ, पोलन इत्यादी. याव्यतिरिक्त कचरा-अनावश्यक वस्तू जाळणं, पिकांची भाजणी अशा अनेक कारणांमुळे वायू प्रदूषणात भर पडते.

वायू प्रदूषणाचे साइड इफेक्ट्स
डोकं दुखणं, मळमळणं, चक्कर येणं, दम लागणं, अस्थमा आणि श्‍वसनासंबंधी अन्य विकार इत्यादी अनेक आरोग्याविषयी समस्या वायू प्रदूषणामुळे उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त वायू प्रदूषणाचा विपरीत परिणाम हृदय, मूत्रपिंड, यकृत, मज्जातंतू, मेंदू आणि इतर शरीर अंगांवरही होऊ शकतो.

बचावासाठी उपाय
– खासगी गाड्यांऐवजी वाहतुकीच्या सार्वजनिक साधनांच्या वापरावर भर द्या.
– आपल्या वाहनाची वेळोवेळी तपासणी करून घ्या. वाहन शासकीय मानकांनुसार सुस्थितीत ठेवा.
– पर्यावरणाचं संवर्धन करण्याच्या हेतूने सुरक्षित साधनांच्या वापरावर भर द्या.
– वॉटर बेस्ड पेंट्सचा वापर करा.
– जिथे जिथे वस्तूंचा पुनर्वापर किंवा रिसायकल शक्य आहे, तिथे तिथे हा पर्याय जरूर निवडा.
– कचरा किंवा अन्य निरुपयोगी वस्तू जाळू नका.
– ज्या व्यक्तींना दमा किंवा श्‍वसनासंबंधी इतर समस्या आहेत, त्यांनी प्रदूषण वाढल्यास घराबाहेर पडणं टाळा. तसंच घराबाहेर पडायचंच झाल्यास मास्कचा वापर जरूर करा.
– घराबाहेरचंच नाही, तर घरातील प्रदूषणही कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी, सिगरेट, स्टोव्ह, चूल इत्यादींच्या धूर शक्यतो टाळा. कॉस्मेटिक्स, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, हेअर स्प्रे, पेंट्स, अगरबत्ती इत्यादींमुळेही श्‍वसनाच्या समस्या डोकं वर काढू शकतात, याची नोंद घ्या.

आपण बरेचदा घराबाहेरच्या प्रदूषित हवेची चिंता करतो. घरातील हवा शुद्ध आणि ताजी असते, असा आपला भाबडा समज असतो. मात्र घराबाहेरील प्रदूषणाची चिंता करताना आपण एक बाब विसरतो की, हीच बाहेरची प्रदूषित हवा आपल्या घरात येते आणि आतच कोंडली जाते. आणि अशी कोंडलेली प्रदूषित हवा जास्त घातक असते. मे 2018 मध्ये ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, घरातील वायू प्रदूषणामुळे 4 दशलक्षहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू झाला आहे. त्यात असंही नमूद करण्यात आलं आहे की, घरातील वायू प्रदूषणामुळे हृदय आणि फुप्फुसासंबंधी अनेक रोगांना निमंत्रण मिळतं. वायू प्रदूषणाची ही दाहकता लक्षात घेता, घरातील घातक वातावरणाला शुद्ध करण्यासाठी योग्य मार्ग शोधणं गरजेचं ठरतं.

दूषित पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण बरेच उपाय करतो. पाणी गाळतो, उकळवतो, वॉटर प्युरिफायरची मदत घेतो. पण वायू प्रदूषण टाळण्यासाठी काय करावं, हे अनेकांना कळत नाही. दूषित पाणी टाळण्यासाठी ज्या प्रकारे वॉटर प्युरिफायर उपयुक्त ठरतं, तसंच प्रदूषित हवा टाळण्यासाठी एअर प्युरिफायर कामी येतं. म्हणूनच सध्याच्या वायू प्रदूषणाचा स्तर लक्षात घेता एअर प्युरिफायर ही चैनीची बाब नसून, प्राथमिक गरज आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

शुद्ध हवेसाठी एअर प्युरिफायर
– एअर प्युरिफायर घरातील प्रदूषण कमी करून, हवा शुद्ध करतो. त्यामुळे दम्याच्या झटक्याची शक्यता कमी होते.
– हवेतील कार्बन डाय ऑक्साइडच्या अधिक प्रमाणामुळे डोकं दुखणं, चक्कर येणं, मळमळणं, अशक्तपणा, बेशुद्धी, रक्तदाब, फुप्फुसांचे विकार, श्‍वसनास त्रास होणं, अगदी मृत्यू होण्याचीही शक्यता असते. एअर प्युरिफायर वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण कमी करून हवा शुद्ध करण्यास, अर्थात वातावरणातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यास मदत करतो. यामुळे आरोग्य उत्तम प्रकारे राखलं जातं.
– एअर प्युरिफायरमुळे घरातील धूलिकण, इतर सूक्ष्म कण, पाळीव प्राण्यांचे केस इत्यादीही आटोक्यात आणण्यास मदत होते. परिणामी, अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनची समस्या कमी होते.
– तंबाखूच्या धुरामुळे फुप्फुसाच्या गंभीर आजारांसोबतच हृदयरोग, कानातील संसर्ग, दमा, न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस यासारख्या रोगांचीही शक्यता वाढते. थेट धूम्रपानाइतकंच पॅसिव्ह स्मोकिंगही धोकादायक आहे. ते विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत घातक आहे, कारण लहान मुलांची फुप्फुसं विकसित होत असतात आणि त्यांची श्‍वसन गतीही वयस्क व्यक्तींच्या तुलनेत जलद असते. त्यामुळे ते यास लवकर बळी पडतात. मात्र एअर प्युरिफायरमधील हेपा फिल्टर्स आणि अ‍ॅक्टिव्हेटेड कार्बन अशा धुराचा प्रभाव कमी करतात. त्यामुळे फुप्फुसाच्या तक्रारी कमी होतात.
– एअर प्युरिफायर वातावरणातील विषारी-सूक्ष्म कण आणि तत्त्वही शुद्ध करतो. यामुळे मेसोथेलियोमासारख्या कर्करोगाची शक्यता कमी होते.
– तो फुप्फुसांच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारा रेडॉन गॅस नष्ट करतो.ल्युकेमिया आणि लिम्फोमा यासारख्या घातक आजारांना कारणीभूत ठरणारे तत्त्व नष्ट करून तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासही एअर प्युरिफायर उपयुक्त ठरतो.
– लहान मुलं आणि वयस्क व्यक्तींना होणार्‍या श्‍वसनासंबंधी आजारांमध्ये एअर प्युरिफायर अतिशय उपयुक्त आहे.
– मच्छर आणि इतर आजार निर्माण करणार्‍या कीटकांपासून एअर प्युरिफायर तुमचा बचाव करतो. त्यामुळे मलेरियासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
– एअर प्युरिफायर हवेची शुद्धता वाढवून तुमच्या मेंदूला शांत आणि निरोगी ठेवतो. यामुळे ताण, निराशा इत्यादींची शक्यता कमी होते. शांत झोप लागण्यास मदत होते.
– घरातच नाही, तर कार्यालयं, क्लिनिक्स, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणीही हवा शुद्ध राहण्यासाठी एअर प्युरिफायर उपयुक्त आहे.

करा योग्य निवड
बाजारात नानाविध प्रकारचे, विविध क्षमता, आकार, रंगाचे एअर प्युरिफायर उपलब्ध आहेत. यातील एखाद्या प्युरिफायरची निवड करणं कठीण काम आहे. मात्र योग्य मानकांचा विचार केल्यास, हे कामही सोपं होऊ शकतं.
– एअर प्युरिफायर खरेदी करताना सर्वप्रथम तुमच्या घर किंवा खोलीचं आकारमान लक्षात घ्या. त्या प्युरिफायरमध्ये या जागेतील संपूर्ण हवा शुद्ध करण्याची क्षमता असायला हवी. असं व्हायला नको की, प्युरिफायर बसवल्यानंतर लक्षात येईल की, खोलीच्या आकारापेक्षा प्युरिफायरची क्षमता कमी आहे आणि तो संपूर्ण खोलीची हवा शुद्ध करण्यास समर्थ नाही. अशा प्युरिफायरचा काहीच फायदा होणार नाही.
– बहुतांश एअर प्युरिफायर लहान किंवा मध्यम आकाराच्या खोलीसाठी योग्य असतात. मात्र प्युरिफायरची निवड करताना त्या खोलीतील विविध वस्तूंची आणि उपकरणांची संख्याही लक्षात घ्यायला हवी.
– एअर प्युरिफायरमध्ये वापरले जाणारे फिल्टर्सही अतिशय महत्त्वाचे आहेत. यात कम्पोझिट आणि हेपा (हाय-इफिशिअन्सी पर्टिक्युलेट एअर), असे दोन प्रकारचे फिल्टर असतात. कम्पोझिट फिल्टर सामान्यत: वापरला जातो आणि तो हवेमधून सूक्ष्मजीव पकडण्याचं काम चांगल्या प्रकारे करतो. परंतु, त्यासाठी वारंवार साफसफाईची आवश्यकता असते. त्यापेक्षा हेपा उत्तम मानला जातो. कारण तो हवेतील दूषित कण विभक्त करून, त्यांचा 99 टक्के नाश करण्यास समर्थ असतो. त्यामुळे अगदी शुद्ध हवा मिळते. तसंच यात फिल्टर बदलण्याची वेळ झाली की, त्याचे संकेतही प्युरिफायर देतो.
– एअर प्युरिफायरमध्ये विविध प्रकारचे अनेक एअर फिल्टर्स असतात. प्रत्येक फिल्टरची क्षमता आणि किंमत वेगळी असते. तुमच्या घरातील हवा किती प्रदूषित आहे आणि ती स्वच्छ करण्यासाठी एअर प्युरिफायरमध्ये किती फिल्टर्सची गरज आहे, हे ठरवणं गरजेचं आहे.
– प्युरिफायर केवळ दुर्गंधी दूर करतो की, आजारपण आणणार्‍या तत्त्वांचाही नाश करतो, हे जाणून घ्या.
– त्यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही याचाही विचार करा.
– प्युरिफायर पोर्टेबल आणि वापर करण्यास सोपा अर्थात यूजर फ्रेंडलीही असायला हवा.
– एखाद्या प्युरिफायरमध्ये सर्व असलं तरी, शेवटी त्याची किंमत आपल्या पाकिटाला परवडणारी असायला हवी. भारतात काही शे रुपयांपासून हजारो रुपयांचे एअर प्युरिफायर उपलब्ध आहेत.
एका सर्वेक्षणानुसार, बाहेरील हवेच्या दर्जापेक्षा घरातील हवेचा दर्जा पाच पटीने वाईट असू शकतो. आणि घरात कोंडलेल्या या प्रदूषित हवेचा दर्जा सुधारण्यासाठी एअर प्युरिफायरचा पर्याय उत्तम आहे.