केसात कोंडा झालाय, लिंबू वापरा (Use Lemon To Re...

केसात कोंडा झालाय, लिंबू वापरा (Use Lemon To Remove Dandruff)

पावसाळ्यात बर्‍याच जणांना केसांच्या समस्या उद्भवतात. या मोसमात केसात कोंडा होण्याचं प्रमाण अधिक असतं. हा कोंडा लवकरात लवकर घालवला नाही, तर केसांच्या इतर समस्या उद्भवतात. परंतु आपण लिंबाचा वापर करून घरच्या घरी कोंड्याची समस्या दूर करू शकतो.
केसांत कोंडा होणं ही एक सामायिक समस्या आहे जिला प्रत्येकाला कधी ना कधी सामोरं जावं लागलं आहे. कोंड्यामुळे केसांतून पांढर्‍या रंगाचे पापुद्रे निघतात. कोणत्याही वयामध्ये कोंड्याचा त्रास होऊ शकतो. कोंडा झाल्यामुळे डोक्यात प्रचंड खाज येते. कधी कधी तर ती इतकी असह्य असते, की खाजविण्याशिवाय पर्याय नसतो. अशा प्रसंगी कधी कधी लोकांसमोर लज्जित व्हावं लागतं.

 Lemon, Remove Dandruff

खरं तर कोंडा ही केसांची नव्हे तर त्वचेची समस्या आहे. डोक्यावरील त्वचा कोरडी झाली किंवा त्वचा रोग झाल्यास डोक्यावरील त्वचेचे पापुद्रे निघण्यास सुरुवात होते. हेच त्वचेचे पापुद्रे केसांमध्ये दिसू लागतात, ज्यास आपण कोंडा असं म्हणतो. बाजारात कोंडा घालविण्यासाठी अनेक शाम्पू, कंडिशनर आणि तेलंही उपलब्ध आहेत. परंतु, त्यामध्ये हानिकारक रसायनं वापरलेली असतात, त्यामुळे ते सगळ्यांनाच परिणामकारक ठरत नाहीत. तेच घरगुती उपाय करून आपल्याला कोणत्याही हानिशिवाय कोंड्याची समस्या दूर करता येऊ शकते. आपल्या सगळ्यांच्या घरी लिंबू तर असतंच हेच लिंबू तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरून आपण केसांतील कोंडा घालवू शकतो.

1. चहापावडर आणि लिंबू
चहा पावडरच्या वापराने आपले केस काळे, घनदाट आणि मजबूत होतात. याशिवाय चहापावडर आणि लिंबाचा रस कोंडा घालविण्याकरिताही अत्यंत उपयुक्त आहे.

 Lemon, Remove Dandruff

कसे वापरावे?
एका पॅनमध्ये एक लिटर पाणी गरम करा आणि त्यात दोन चमचे चहापावडर घाला. पाणी उकळू लागलं की त्यात लिंबाचा रस घाला. दोन मिनिटं उकळवा, नंतर गॅस बंद करा. ते पाणी थंड झाल्यानंतर केसांवर लावून 10 मिनिटं मसाज करा. नंतर साध्या पाण्याने कसे धुवून टाका. असं केल्याने दोन दिवसात कोंड्याची समस्या दूर होईल.

2. मध आणि लिंबू
त्वचा आणि केस या दोहोंच्या बाबतीत ज्या काही समस्या उद्भवतात त्यासाठी बरेच वर्षांपासून मध आणि लिंबाचा वापर केला गेलेला आहे. लिंबाचा रस नैसर्गिकरित्या ब्लिचिंगचं काम करतो आणि केसांना उत्तम प्रकारे स्वच्छ करतो. तर मधामध्ये जंतूनाशकाचे गुण असतात, ज्यामुळे त्वचेवरील जंतूचा नाश होतो.

 Lemon, Remove Dandruff

कसे वापरावे?
एका वाटीमध्ये 3 चमचे मध आणि 1 चमचा लिंबाचा रस घ्या. त्याचे चांगले मिश्रण करा. तयार पेस्ट केसांच्या मुळांशी लावा. 20 मिनिटं ठेवून नंतर साध्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा प्रयोग केल्यास केसात कोंडा राहणार नाही.

3. दही आणि लिंबू
दही हे केसांसाठी चांगलं असतं हे आपण जाणतोच. दही केसांना चांगल्या पद्धतीने स्वच्छ करते. तसेच केसांतील कोंडा दूर करते आणि केसांना नैसर्गिक चमक देते. शिवाय लिंबूसोबत वापरल्यास परिणाम दुप्पट आणि लवकर मिळतो.

 Lemon, Remove Dandruff

कसे वापरावे?
दोन चमचे दह्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा. तयार झालेली पेस्ट केसांना लावा. अर्ध्या तासाने केस शाम्पूने धूवा. आठवड्यातून दोन-तीन वेळा हा हेअर मास्क लावल्यास त्वचा कोरडी होण्याची समस्या दूर होईल.
लिंबामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल हे मुख्य गुण असतात, ज्यामुळे केसांतील कोंडा घालविण्यास मदत होते.