उर्वशी ढोलकियाने शेअर केले स्ट्रेच मार्क्सवाले ...

उर्वशी ढोलकियाने शेअर केले स्ट्रेच मार्क्सवाले फोटो. म्हणाली, “कोणी मला थांबवून दाखवा…” (Urvashi Dholakia Shares Her Stretch Marks Photos On Social media, Actress Says, ‘Koi Mujhe Rok Ke Batao’)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कसौटी जिंदगी की’ मधील कामोलिका अर्थात उर्वशी ढोलकिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी स्वतःच्या खाजगी आयुष्यामुळे, तर कधी गरोदरपणानंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे. प्रत्येक वेळी उर्वशी आपल्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजाने ट्रोलर्सना निरुत्तर करत आली आहे. या वेळेस उर्वशीने आपले स्ट्रेच मार्क्स दाखविणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंटरनेटवर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये उर्वशी स्विमिंग ड्रेसवर असून त्यातून तिचे स्ट्रेच मार्क्स स्पष्टपणे दिसत आहेत.

उर्वशी ढोलकिया ही भारतीय टेलिव्हिजनच्या सर्वाधिक स्टायलिश अभिनेत्रींपैकी आहे. वीस वर्षांपूर्वी टीव्हीवरील ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील कामोलिकाला आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. सध्या ती टीव्हीवरील कोणत्याही शोमध्ये काम करत नाहीये तरीही आपलं महत्त्व काही करून कमी होऊ द्यायचं नाही हे तिला चांगलंच माहीत आहे. म्हणूनच अधूनमधून सोशल मीडियावर ती आपल्या जुळ्या मुलांसोबतचे गमतीशीर व्हिडिओज्‌ आणि फोटोही शेअर करत असते. अलिकडेच उर्वशीने स्विमिंग कॉश्च्युम घालून काढलेले काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती आपले स्ट्रेच मार्क्स दाखवत आहे.

या फोटोंमधे विशेषत्वाने तिने आपले स्ट्रेच मार्क्स दाखवले आहेत. तसेच या फोटोंना तिने ‘अनअपॉलोजेटिकली मी’ अशी कॅप्शनही दिली आहे. याचा अर्थ असा होतो की, हे फोटो शेअर करताना तिला कोणतीही खंत वाटत नाही. तिला आपले स्ट्रेच मार्क्स दाखविण्यास काहीच हरकत वाटत नाही. स्विमिंग कॉश्च्युम घालून स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतानाच्या उर्वशीच्या फोटोंना चाहतेही लाइक करत आहेत.

अलिकडेच एका मुलाखती दरम्यान उर्वशी असे बोलली होती की, ”आता ती जीवनाच्या अशा टप्प्यावर येऊन पोहचली आहे, जिथे ती स्वतःच्या त्वचेची फारच काळजी घेते. वयाच्या या टप्प्यावर पोहोचल्यानंतरही ती आपल्या व्यक्तिमत्त्वाबाबत अतिशय खूश आहे.”

याच मुलाखतीत पुढे ती म्हणते, ”मला माहीत आहे की लोक स्त्रियांना धाकात ठेवण्याचा कसा प्रयत्न करतात? विशेषतः आई झाल्यानंतर जेव्हा ती स्वतःच्या आवडीचा ड्रेस घेऊन येते. मला विचारायचं आहे की, हे नियम कोणी बनवले? मला हे करण्यापासून थांबवून पाहा. माझं माझ्या शरीरावर खूप प्रेम आहे. हे स्ट्रेच मार्क्स; टॅटूप्रमाणे दिसतात आणि ते माझं आयुष्य पुढे जात असल्याची ग्वाही देतात. कोणी मला माझ्या या शरीरापासून अलग करू शकत नाही.”

४२ वर्षांच्या उर्वशी ढोलकियाने हे स्ट्रेच मार्क्सचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी टाकलेले नाहीत. तर ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी तिने स्ट्रेच मार्क्सचे फोटो शेअर केले आहेत. युजर्सनी त्यांना या फोटोंसाठी ट्रोल केले होते. काही युजर्सनी तिला तिच्या वयाची आठवण करून दिली तर एका युजरने आपल्या कमेंटमधे असं लिहिलं की, या वयामध्ये असं करणं तुला शोभा देत नाही.