वाईट दिवस आठवून उवर्शी ढोलकियाचा भरून आला ऊर, म...

वाईट दिवस आठवून उवर्शी ढोलकियाचा भरून आला ऊर, मुलांच्या फीचे १५०० रुपयेही नव्हते… (Urvashi Dholakia recalls bad phase of her life, Says- ‘Didn’t have Rs 1,500 to pay for kids’ school)

‘कसौटी ज़िंदगी की’ या मालिकेत कोमोलिका साकारल्यानंतर घराघरात लोकप्रिय झालेली उर्वशी ढोलकिया ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परतली आहे. सध्या ती नागिनच्या ६व्या पर्वात दिसत असून प्रेक्षक तिच्या भूमिकेची प्रशंसा करीत आहेत. वयाच्या सहाव्या वर्षापासून ॲड फिल्ममधे काम करणाऱ्या उवर्शीचं जीवन दिसतं तेवढं सरळसोपं नव्हतं. तिला आपल्या खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यात बराच संघर्ष करावा लागलेला आहे. अलीकडेच तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वाईट दिवसांच्या आठवणीने तिचा ऊर भरून आला होता.

१६व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी घटस्फोट आणि १९व्या वर्षी मातृत्त्व

उर्वशीने धोक्याच्या वयात अर्थात १६व्या वर्षी लग्न केले होते, परंतु लग्न फार टिकले नाही आणि १८व्या वर्षीच ती पतीपासून दूर झाली. त्यावेळेस ती गरोदर होती. वयाच्या १९ व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना क्षितिज आणि सागरला जन्म दिला. एकल माता बनून उर्वशीने आपल्या मुलांचा सांभाळ केला आहे. हे सगळं एकटीने करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. मुलांच्या शाळेची फी देण्याइतकेही पैसे तिच्याकडे नव्हते. फीच्या पैश्यांसाठी तिने एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट केला. त्याच्या निर्मात्याने काम झाल्यानंतर पहिलेच काम म्हणून अर्धेच पैसे दिले होते. फीसाठी ३००० रुपयांची गरज होती आणि १५०० रुपयेच मिळाले होते, असे सांगताना उर्वशीला भरुन आले होते.

उर्वशी पुढे म्हणाली, “त्यावेळी मला एक धडा मिळाला होता की कोणावरही अवलंबून राहायचे नाही. मी कोणावर अवलंबून नव्हते, तरीही काय करावे ते सूचत नव्हते. चिडचिड व्हायची. मुलांच्या फीचेही पैसे माझ्याकडे नसावेत या गोष्टीचे मला फार वाईट वाटले होते. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला असं वाटतंय की मी त्या परिस्थितीतून तरले आहे. जीवनात कठीण प्रसंग तर येणारच, पण आपल्याला पुढे जायचं आहे. यालाच तर जीवन म्हणतात.”

मागील दिवसांच्या या आठवणींनी तिचे डोळे भरून आले. पतीपासून वेगळी झाल्यानंतर उर्वशी तिच्या आई-वडीलांसोबत राहत होती. आज तिचे दोन्ही मुलगे २६ वर्षांचे झाले आहेत. तिने आपल्या मुलांना त्यांचे मार्ग निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्या दोघांनाही अभिनयामध्ये करिअर करायचे असल्यास त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार, असेही ती म्हणाली. उर्वशी बरेचदा आपल्या दोन्ही मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आणि चाहत्यांकडून पसंती मिळवित असते. सध्या ती नागिन ६ मधील तिच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे.