प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात उर्मिला कोठारे,...

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात उर्मिला कोठारे, माधवी निमकरच्या ठसकेबाज लावण्या, तर सिद्धार्थ जाधवची दादा कोंडके यांना मानवंदना (Urmila Kothare, Madhavi Nimkar To Entertain With Lavani Performances In Pravah Picture First Awards Event)

दिवाळीच्या सणासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र प्रवाह पिक्चर पुरस्कारांच्या रुपात दिवाळीआधीच पिक्चरवाली दिवाळी साजरी होणार आहे. प्रवाह पिक्चर पुरस्कारांचं यंदाचं हे पहिलं वर्ष. मराठी परंपरेचं प्रतीक असणाऱ्या सन्मानचिन्हापासून ते अगदी मराठमोळ्या गाण्यांपर्यंत अस्सल मराठी मनोरंजनाची मेजवानी देणारा हा सोहळा येत्या रविवारी म्हणजेच १६ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील सर्वोत्त्तम कलाकृतींचा सन्मान, सोबतीला फराळा इतकाच खमंग कॉमेडीचा तडका आणि फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे लखलखते कलाकारांचे परफॉर्मन्स या सोहळ्याची शान वाढवणार आहेत.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात आपल्या अष्टपैलू अभिनयाने सर्वांना आनंद देणाऱ्या अभिनय सम्राट अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते अशोक सराफ यांना गौरवण्यात आलं.

या प्रसंगी अशोक मामांचा सन्मान करण्याचं भाग्य मिळालं हाच माझा मोठा सन्मान आहे अशी भावना रितेश देशमुख यांनी व्यक्त केली. प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात उमेश कामत, वैदेही परशुरामी, रुपाली भोसले आणि रसिका सुनिलच्या रोमॅण्टिक अंदाजासोबतच उर्मिला कोठारे, संस्कृती बालगुडे आणि माधवी निमकरची ठसकेबाज लावणी पाहायला मिळेल. तर सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या नृत्यातून चित्रपट सृष्टीमधील हरहुन्नरी व्यक्तिमत्व ‘दादा कोंडके’ यांना मानवंदना देणार आहे.

आदर्श शिंदे आणि छोट्या उस्तादांचं धमाकेदार गाणं आणि सिद्धार्थ जाधव-विशाखा सुभेदार यांचं बहारदार सूत्रसंचालन या सोहळ्याची रंगत आणखी वाढवणार आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांचा अनोखा अंदाज देखील या सोहळ्यात पाहायला मिळेल.