“भारतीय मुली आळशी आहेत, त्यांना चांगला कमावणारा...

“भारतीय मुली आळशी आहेत, त्यांना चांगला कमावणारा नवरा हवा असतो,” अशा आशयाच्या सोनाली कुलकर्णीच्या विधानावर मॉडेल उर्फी जावेदचा आक्षेप (Urfi Javed slams Sonali Kulkarni’s ‘ladkiyaan aalsi hai’ comment, calls actress ‘too entitled to see…’)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. ती तिच्या स्पष्ट अन्‌ सडेतोड विधानांसाठी प्रसिद्ध आहे. सोनाली कुलकर्णीने अलीकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लग्नासाठी मुलगा शोधताना मुलींच्या अपेक्षा किती जास्त व अवाजवी असतात, याबद्दल ती बोलत आहे.

सोनाली कुलकर्णी तिच्या व्हिडीओमध्ये म्हणते, “भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर असेल, पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करेन.”

आता सोनालीच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय मुली आळशी आहेत, त्यांना चांगला कमावणारा नवरा हवा असतो, अशा आशयाच्या तिच्या विधानावर मॉडेल उर्फी जावेदने आक्षेप घेतला आहे. राजकारणी असो, तिच्यावर टीका करणारे नेटकरी असो किंवा माध्यमं… कोणालाही न घाबरता उर्फी जावेद सतत आपली मतं मांडत असते. सोनाली कुलकर्णीच्या या विधानाबद्दलही उर्फीने ट्वीट करत आपला आक्षेप नोंदवला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये उर्फी म्हणते, “तू जे काही बोललीस ते किती असंवेदनशील आहे. आधुनिक काळातल्या महिला जेव्हा त्यांचं काम आणि घरातली कामं एकत्र सांभाळत असतात, तेव्हा तुम्ही त्यांना आळशी म्हणता? चांगला कमावणारा नवरा हवा यात गैर काय आहे?

उर्फी पुढे म्हणते, “वर्षानुवर्षे पुरुषांनी महिलांकडे केवळ मुलं जन्माला घालण्याची मशीन म्हणूनच पाहिलं आहे आणि लग्नाचं मुख्य कारण म्हणजे हुंडा. त्यामुळे महिलांनो, बोलण्यासाठी किंवा काही मागण्यासाठी घाबरू नका. महिलांनी काम करायला हवं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हा एक विशेषाधिकार आहे, जो प्रत्येकाला मिळत नाही.”