२ वर्षं… ६७७ दिवस, तरीही सुशांत सिंगच्या मृत्यू...

२ वर्षं… ६७७ दिवस, तरीही सुशांत सिंगच्या मृत्यूचं गूढ का उकललं नाही ? (Two Years… 677 Days, SSR’s Death Is Still An Unsolved Mystery, Know All The Updates Of SSR’s Case)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) या अभिनेत्याला जाऊन आज दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. सुशांत भलेही आज आपल्यात नसला तरी त्याला ओळखणारे, त्याच्या कुटुंबातले, जवळचे आणि त्याचे चाहते अशा सगळ्यांच्याच आठवणीत आजही तो जिवंत आहे. आजही त्याच्या स्मरणाने सर्व भावूक होतात. सुशांतचे कुटुंब आणि त्याचे लाखो चाहते आजपर्यंत त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच एम्सच्या तपासणीतही आत्महत्येची पुष्टी झाली आहे. पण, सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचे त्याचे कुटुंबीय आणि चाहते अजूनही सांगतात. दोन वर्षांनंतरही सुशांतचा मृत्यू खून होता की आत्महत्या हे गूढ उकललेले नाही.

१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ जून रोजी सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पोलिसांनी याला आत्महत्येचे प्रकरण म्हटले, पण त्यावेळी अनेक वादंग उठले, अनेक एफआरआय नोंदवले गेले, देशातील सीबीआय, एनसीबी आणि ईडी यासारख्या तीन मोठ्या तपास यंत्रणा या तपासात कार्यरत आहेत. ६ ऑगस्टला हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतरही ६७७ दिवस झाले आहेत, पण आजतागायत तपास यंत्रणा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या नाहीत.

पोलिसांनी याला आत्महत्येचे प्रकरण म्हटले असले तरी सुशांतच्या वकिलाचे म्हणणे आहे की, सुशांतची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. ते म्हणतात की एम्सच्या डॉक्टरांनी, ज्यांनी नंतर सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या म्हटले, त्याच डॉक्टरांनी मला सांगितले की, सुशांतच्या मानेवर आढळलेल्या खुणा गळा दाबल्याच्या आहेत, लटकलेल्याच्या (आत्महत्येच्या) नाहीत.

सुशांतचे वडील केके सिंग यांनीही त्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली होती आणि आज सुशांतच्या कुटुंबीयांचा असा ठाम विश्वास आहे की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. याबाबत सीबीआयच्या हाती काहीतरी सुगावा लागेल आणि त्यांना या प्रकरणात नक्कीच न्याय मिळेल, अशी त्यांना आशा आहे.

या प्रकरणी सुशांतची तथाकथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती, रियावर सुशांतच्या वडिलांनी पैशांचा गैरवापर आणि सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. रियाने १५ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून ईडीने रियाविरुद्ध १५ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला. पण ईडीला रियाने मनी लाँड्रिंग केले असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही.

ऑगस्टमध्ये सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, सुशांत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनही समोर आले आणि यावेळी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना एनसीबीने पकडले. रियाने सुशांतला ड्रग्ज देऊन वश केल्याचे बोलले जात होते. याप्रकरणी रियालाही अटक करण्यात आली होती. मात्र नंतर रियाला जामीन मिळाला.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल अजून बंद झालेली नाही. अजूनही तपास सुरू आहे. त्याच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. या प्रकरणात सीबीआयने अमेरिकेचीही मदत घेतली आहे. सीबीआयनेही सुशांतचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले आहे, परंतु तरीही सुशांतच्या ईमेल आणि सोशल मीडियावरून हटवलेल्या डेटाची छाननी सुरू आहे, जेणेकरून सुशांतने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले हे कळू शकेल. म्हणजेच तपास अजूनही सुरू आहे. आणि आजही सुशांतचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टारच्या मृत्यूचे सत्य बाहेर येण्याची वाट पाहत आहेत.