‘गंगूबाई काठियावाडी’ विरुद्ध न्याया...

‘गंगूबाई काठियावाडी’ विरुद्ध न्यायालयात दोन याचिका (Two New Petitions Filed Against ‘Gangubai Kathiawadi’)

आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार असला तरी त्याला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. कारण या चित्रपटाविरुद्ध उच्च न्यायालयात काल २ नव्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

या चित्रपटात मुंबईतील कामाठीपुरा हा परिसर वाईट दृष्टीने दाखवण्यात आला आहे, परिणामी, येथे राहणाऱ्या लोकांची बदनामी होऊ शकते. त्यामुळे कामाठीपुरा अशा उल्लेखासह हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास येथील रहिवाशांचे, विशेषतः महिलांचे नुकसान होईल, अशी हरकत या याचिकांमध्ये घेण्यात आली आहे.

सदर याचिका काँग्रेसचे आमदार व कामाठीपुरा परिसरातील रहिवासी यांनी दाखल केली आहे. अन्‌ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटात कामाठीपुरा ऐवजी मायापुरी किंवा मायानगरी असा उल्लेख करावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

शिवाय सध्या या परिसरात केवळ पाच टक्केच शरीरविक्रयाचा व्यवसाय होत आहे. तरी पण चित्रपटात संपूर्ण परिसर हा व्यवसाय करत असल्याचे चित्रण आहे. याबद्दल देखील सदर याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.