गुरमीत चौधरीने एकेकाळी आर्थिक समस्येमुळे केली ह...

गुरमीत चौधरीने एकेकाळी आर्थिक समस्येमुळे केली होती वॉचमनची नोकरी (TV’s Ram Once had to Work as a Watchman, Gurmeet Chowdhary has Gone Through Financial Crisis)

टीव्हीवर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारुन प्रसिद्ध झालेला अभिनेता गुरमीत चौधरीने आपल्या मेहनतीच्या जोरावर छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करून इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुरमीत चौधरी आज जिथे आहे तिथे पोहोचण्याचा मार्ग त्याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता, तरीही त्याने हार मानली नाही. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता तसेच पैशांसाठी त्याला वॉचमन म्हणून काम करावे लागले होते.

गुरमीत चौधरी हा सैन्यदलातील कुटुंबातील असून त्याच्या कुटुंबाचा अभिनय जगताशी काहीही संबंध नव्हता. गुरमीतचा सुरुवातीपासूनच अभिनयाकडे कल असला तरी त्याने आपल्या करीअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. गुरमीत खूपच देखणा आहे यात शंका नाही आणि म्हणूनच त्याला मिस्टर जबलपूर ही पदवी देखील मिळाली आहे.

संघर्षाच्या दिवसांत आर्थिक अडचणींमुळे त्याने कुलाब्यातील एका दुकानात वॉचमन म्हणून काम केले होते. काही काळ वॉचमन म्हणून काम केल्यानंतर त्याला ‘रामायण’ या पौराणिक टीव्ही मालिकेत रामाच्या पात्राची ऑफर मिळाली. या व्यक्तिरेखेने त्याचे आयुष्य बदलले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

‘रामायण’ मालिकेची ऑफर येण्यापूर्वी गुरमीतकडे जवळपास 3 वर्ष कोणतेही काम नव्हते. दैनंदिन जीवनासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत तो स्वतः घरी जेवण बनवत होता. लॉकडाऊन दरम्यान लोकांनी केलेली सर्व कामे त्याने आधीच केली आहेत.

टीव्हीवर सलग तीन वर्षे काम केल्यानंतर मोठ्या पडद्यावरही नशीब आजमावायला हवे, असे अभिनेत्याला वाटले. मात्र, जेव्हा त्याने लोकांना याबद्दल सांगितले तेव्हा लोकांनी त्याची खिल्ली उडवत तू केवळ टीव्ही स्टार आहेस असे सांगितले. लोक तुला टीव्हीवर विनामूल्य पाहतात, मग ते तुला स्क्रीनवर पाहण्यासाठी पैसे का देतील असेही काहींनी म्हटले.

मात्र, लोकांचे म्हणणे ऐकूनही गुरमीतची हिंमत कमी झाली नाही. त्याने मोठ्या पडद्यासाठीही मेहनत केली. यानंतर, अभिनेत्याने 2015 साली ‘खामोशियां’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. चित्रपटाव्यतिरिक्त अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही अभिनेता दिसला आहे.

गुरमीतच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर, गुरमीत चौधरीने २००९ मध्ये देबिना बॅनर्जीसोबत गुपचूप लग्न केले होते, जे त्याच्या घरच्यांनाही माहीत नव्हते. दोघांनीही जवळपास दोन वर्षे आपले लग्न गुप्त ठेवले होते, त्यानंतर 2011 मध्ये गुरमीत आणि देबिनाने अधिकृतपणे लग्न केले. गुरमीत आणि देबिना यांना दोन मुली झाल्या असून ते सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत.