१४१ कोटी रुपयांची अफरातफर केली : टी. व्ही. स्टा...

१४१ कोटी रुपयांची अफरातफर केली : टी. व्ही. स्टार अनुज सक्सेना अटकेत (TV Star Anuj Saxena Arrested For 141 Crore Rupees Scam)

टेलिव्हिजन कार्यक्रमात काम करणारा अभिनेता अनुज सक्सेना याला मुंबई पोलिसांनी पैशांची अफरातफर केली, या आरोपाखाली अटक केली आहे. त्याने साधीसुधी नव्हे तर, १४१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला आहे.

अनुज सक्सेना हा एकता कपूरच्या ‘कुसुम’ या लोकप्रिय मालिकेतून पदार्पण करता झाला होता. पुढे त्याने वैद्यकीय उत्पादन करणारी कंपनी स्थापन केली व त्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी बनला. या कंपनीत गुंतवणूक वाढवण्यासाठी त्याने एक योजना आखली. त्याला भुलून कित्येक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले. पण सांगितल्याप्रमाणे त्याचा मोबदला कोणत्याही गुंतवणूकदाराला मिळाला नाही. म्हणून एका गुंतवणूकदाराने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. तेव्हा अनुजला अटक करण्यात आली असता त्याने १४१ कोटी रुपये बुडविल्याचे लक्षात आले.

अनुजची कंपनी पीपीई किटस्‌ आणि हॅन्ड ग्लोवज्‌चे उत्पादन करते. सध्या करोना महामारीने उसळी घेतली असल्याने आपण अटकेत राहिलो तर सदर उत्पादनांवर परिणाम होईल व उपचार करणाऱ्या सेवकांना ही उत्पादने मिळणार नाहीत, अशी सबब पुढे करून अनुज सक्सेनाने, ही पोलिसी चौकशी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती कोर्टास केली होती. परंतु कोर्टाने त्याचा विनंती अर्ज फेटाळून लावला. म्हणून पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा त्याची कसून तपासणी करत आहेत.