४६ वर्षीय अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशींचं निध...

४६ वर्षीय अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशींचं निधन, जीम मध्ये वर्कआऊट करताना आला हार्ट अटॅक (TV actor Siddhanth Vir Surryavanshi dies at 46 hearth attack)

छोट्या पडद्यावर आपल्या वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून घराघरात ओळखला जाणारा ४६ वर्षीय सिद्धांत वीर सुर्यवंशी याचे आज शु्क्रवारी ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. जीममध्ये वर्क आऊट करताना त्याला हृद्यविकाराचा तीव्र झटका आला अन् त्यात त्याचा मृत्यू झाला. सिद्धांतला तातडीने इस्पितळात दाखल केलं गेलं,पण तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्याला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न डॉक्टर्सनी केले पण त्यांना त्यात यश आलं नाही. राजू श्रीवास्तव आणि दीपेश भान यांच्यानंतर आता जीममध्ये वर्कआऊट करताना तिसरा मृत्यू सिद्धांतचा झाला आहे.

सिद्धांतने कुसुम, वारिस,सुर्यपुत्र करण मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याला त्या मालिकांमुळे ओळख मिळाली होती. टी.व्ही अभिनेता जय भानुशालीनं सिद्धांतच्या निधनाची बातमी कन्फर्म करत चाहत्यांना याविषयी सांगितले. सिद्धांत वीरच्या पश्चात त्याची पत्नी अलिसिया राऊत आणि दोन मुलं असा परिवार आहे. आपल्या फिटेनसची सिद्धांत खूप काळजी घ्यायचा असं बोललं जात आहे.

जय भानुशालीनं सिद्धांत वीरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, ”मित्रा तु खूप लवकर गेलास”. मीडियाशी बातचीत करताना जय भानुशालीनं सिद्धांतच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्याला एका मित्राकडून सिद्धांतविषयी कळाल्याचं तो म्हणाला. जिममध्ये वर्कआऊट करताना जागीच सिद्धांतचा मृत्यू झाल्याचं जयने सांगितलं आहे.

सिद्धांत वीर सूर्यवंशीनं मॉडेल म्हणून आपली कारकिर्द सुरु केली होती. त्याला आनंद सुर्यवंशी नावानं देखील ओळखलं जायचं. प्रसिद्ध कुसुम मालिकेतून त्यानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.