टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता अमन वर्माचे बऱ्...

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता अमन वर्माचे बऱ्याच वर्षांनंतर ‘रूहानियत’ या वेब सीरिजमधून पुनरागमन (Tv Actor Aman Verma Has Made Come Back With Web Series ‘Roohaniyat’)

एके काळी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि हँडसम अभिनेता अशी ओळख असलेला अमन वर्मा गेली अनेक वर्षे छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही पडद्यांपासून अचानक गायब झाला आहे. अमनचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांना अमनला पुन्हा काम करताना पाहायचं आहे. म्हणूनच बऱ्याच मोठ्या गॅपनंतर अमन ‘रूहानियत’ या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. टेलिव्हिजनवरील टॉपचा अभिनेता असूनही तो अभिनयापासून इतके दिवस लांब का राहिला आणि कुठे राहिला? जाणून घेऊया.

अमन वर्मा याने १९९३ मध्ये ‘पचपन खंबे लाल दीवारें’ या टेलिव्हिजनवरील मालिकेपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्याने शांति, सीआईडी, क्योंकि सास भी कभी बहू थी, कुमकुम, विरासत, सुजाता यांसारख्या मालिकांमधून काम केले आहे. या व्यतिरिक्त खुल जा सिम सिम, इंडियन आइडल, इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज यांसारख्या कार्यक्रमांचं निवेदनही त्याने केलं.  एवढेच नाही तर अमनने बागबान, अंदाज, कोई है, संघर्ष, जानी दुश्मन, लम्हा, देश द्रोही, तीस मार खां, दाल में कुछ काला है, यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. एकंदरच त्याचं करिअर व्यवस्थित चालू असतानाच अचानक तो गायब झाला.

अलीकडेच घेतलेल्या एका मुलाखती दरम्यान अमन वर्माने स्वतः याबद्दल सांगताना म्हटले की, “या सगळ्याला मीच जबाबदार आहे. मुंबईत आल्यानंतर पहिली ५ वर्षं मी खूप संघर्ष केला, त्यानंतर मला यश मिळत गेलं. कदाचित ते यश मी पचवू शकलो नाही. त्यावेळेस मला कोणी समजावणारं नव्हतं. दरम्यान मी अशा काही गोष्टी केल्या, ज्या मला करायला नको होत्या. सेट सोडून निघून गेलो, छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडायचो, लोकांवर रागवायचो, शुटींगसाठी वेळेवर जायचं नाही. या सगळ्याचा माझ्या करियरवर नकारात्मक परिणाम झाला. २००४-०५ पर्यंत सर्वकाही व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर माझ्याच स्वभावामुळे माझ्या करियरचा ग्राफ खाली आला. त्यानंतर मी स्वत:ला सावरले अन्‌ आजपर्यंत सावरतच आहे.”

२००५ सालात अमनवर कास्टिंग काऊच सारखा गंभीर आरोप करण्यात आला. ज्यानंतर त्याच्या करियरला ब्रेकच लागला. एका न्यूज चॅनलने अमन वर्माचे ‘कास्टिंग काउच स्टिंग ऑपरेशन’  केले होते. त्यात अमन एका मॉडेलकडून करियरच्या बदल्यात शारीरिक संबंधाची मागणी करताना दिसत होता. हा व्हिडिओ टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आला होता. या घटनेनंतर अमन वर्माचं करियर जवळपास संपलंच.

त्यानंतर अनेक वर्षं त्याला काम मिळालं नाही. त्यावेळेस खरं तर अमनने त्या न्यूज चॅनलवर केस केली होती आणि आपली बाजू मांडताना हे स्टींग ऑपरेशन मला फसवण्यासाठी केले गेले असल्याचे सांगितले. नंतर हे प्रकरण थंडावले, परंतु तेव्हापासून त्याला हवं तसं काम मिळालं नाही.

२०१६ साली अमन वर्माने टीव्हीवरील अभिनेत्री वंदना लालवानीसोबत गुपचूप लग्न केले. वंदना त्याच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. अमन वर्मा २०१७मध्ये टीव्हीवर दिसला होता आणि त्यानंतर आता ‘रूहानियत’ या वेब सीरीजमधून तो पुनरागमन करत आहे.