तुळशीपेक्षा तुळशीची मंजिरी अधिक श्रेष्ठ (Tulsi ...

तुळशीपेक्षा तुळशीची मंजिरी अधिक श्रेष्ठ (Tulsi Seeds Are More Important Than Leaves In Worshipping Lord Krishna And Vishnu)

कृष्ण व विष्णूच्या पूजेत तुळशीला एवढे महत्त्व का? तुळशीपेक्षा श्रेष्ठ काय?
– गिरिजा, सातारा
गौतमी तंत्रात तुळशी दलाचे महात्म्य वर्णन केलेले आढळते. त्यात असे म्हटले आहे की, सर्व फुलांपेक्षा नील किंवा लाल कमळ हजार पटीने श्रेष्ठ आहे. परंतु त्याही पेक्षा तुळशीपत्र अधिक श्रेष्ठ आहे. तुळशीपेक्षा तुळशीची मंजिरी अधिक श्रेष्ठ आहे. या तंत्रात पुढे असेही म्हटले आहे की, तुळशीदल किंवा मंजिरी न मिळाली तर तेथील मृतिकाही (माती) कृष्णाला वा विष्णूला वाहावी.

घरातील वातावरण प्रसन्न व शांत ठेवण्यासाठी काय करावे?
– दिपाली, रत्नागिरी
सकाळ-संध्याकाळ (सूर्योदय – सूर्यास्ताच्या वेळी) अग्निहोत्र करावे. गायत्री मंत्र, श्लोक, अभंग इत्यादी देवांची गाणी लावावीत. कातरवेळी घरात धूप जाळावा. म्हणजे घरात शांतता नांदते. घरातील व्यक्तींची विचारसरणी, दुसर्‍याला समजून घेण्याची भावना वृद्धिंगत होते.

ध्यानधारणा करताना कोणत्या दिशेला बसावे?
– वृंदा, पनवेल
ध्यानधारणा, देवपूजा, अभ्यास, औषध घेणे यांसारख्या गोष्टी करताना पूर्व – उत्तर अथवा ईशान्येला तोंड करावे. यामुळे तुम्हाला फलप्राप्ती लवकर मिळते.

वास्तुशास्त्र व फेंगशुई मधील पंचतत्त्वे कोणती?
– पूजा, ठाणे
भारतीय वास्तुशास्त्राचा सिद्धांत – अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश या पंचमहाभूतांपासून वास्तुशास्त्र बनलेले आहे. तर फेंगशुईमध्ये वृक्ष (लाकुड), अग्नी, पृथ्वी, धातू आणि जल या पंचतत्त्वांचा परिणाम या चराचर सृष्टीतील प्रत्येक वस्तूवर होत असतो, असे म्हटले आहे.