तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी जाधव हि...

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी जाधव हिच्यावर काळाचा घाला (Tujhyat Jeev Rangala Fame Actress Kalyani Jadhav Passed Away Due To Accident)

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी जाधवचे अपघाती निधन झाल्यामुळे मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. कल्याणीच्या अशा अचानक निघून जाण्यामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचा मित्रपरिवार देखील तिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करत आहे.

अभिनेत्री कल्याणी जाधवने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. राधा हे पात्र तिने साकारले होते. याशिवाय तिने दख्खनचा राजा ज्योतिबा आणि सुंदरी या मालिकांमध्येही काम केले. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उद्योजिकासुद्धा होती. कल्याणीने हालोंडी सांगली फाटा इथे ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हॉटेल सुरु केले होते. तिथे ती स्वत: काम करायची.

मात्र काल असचं हॉटेलमधील काम करुन घरी परतत असताना काळाने तिच्यावर झडप घातली. कल्याणी हॉटेलमधून निघाल्यावर एका भरधाव येणाऱ्या डंपरने तिला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे साधारण आठवड्याभरापूर्वीच कल्याणीचा वाढदिवस झाला. त्यासंदर्भातील पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. ती तिची शेवटची पोस्ट ठरली. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलेलं, ‘काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली… मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या…’