साडी अशी नेसा, नि बारीक दिसा (Tricks To Look Sl...

साडी अशी नेसा, नि बारीक दिसा (Tricks To Look Slim In Saree, How to select blouse-footwear-jewellery for perfect saree look?)

साडीला ग्लॅमरस बनवायचं असेल तर साडी स्टायलिंगच्या काही बेसिक गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. फॅशनच्या काही ट्रिक्स वापरून आपण साडीतील परफेक्ट लूक कशाप्रकारे मिळवू शकतो, ते पाहूया.

आपली शरीरयष्टी कशी आहे हे जाणून घ्या

तुम्ही उंच असलात, तर प्रिंट आणि टेक्स्चरमध्ये तुम्हांला अनेक पर्याय उपलब्ध असतात, कारण उंच व्यक्तींना सर्वच छान दिसते. पण जर तुमची उंची कमी आहे, तर तुम्ही फ्लोई फॅब्रिकची साडी निवडा. तसेच साडी जास्त वर्क केलेली नसेल याची काळजी घ्या. तुम्ही वर्टिकट लाइन वा प्रिंट निवडू शकता. यात तुम्ही उंच आणि सडपातळ दिसाल.

फिगर जशी असेल त्यानुसार ब्लाऊज निवडा

ब्लाऊजची योग्य निवड तुमच्या साडीतील सौंदर्यात ग्लॅमरची भर घालते. तुमचे दंड जाड असतील तर तुम्ही ३/४ स्लीवचे ब्लाऊज घ्यावेत. तुम्हाला ब्रेस्ट एरियामध्ये व्हॉल्यूम हवं असल्यास, वर्क असलेले ब्लाऊज निवडा. सर्वप्रथम आपल्याला जी समस्या आहे, ती ओळखा आणि ब्लाऊजची निवड करताना समस्या असलेला भाग हायलाईट होणार नाही, याची काळजी घ्या. मात्र ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट असले पाहिजे. खूप घट्ट किंवा सैल ब्लाऊज तुमच्या साडीतील लूक बिघडवू शकते.

साडीची निवड करताना त्वचेचा वर्णही महत्त्वाचा

आपल्या त्वचेचा वर्ण कसा आहे, त्याप्रमाणे साडीची निवड केल्यास ती छान दिसते. उदाहरणार्थ, गौरवर्ण असल्यास पेस्टल कलर्स, पिंक, बेबी ब्लू यासारखे रंग उठून दिसतात. पण गौरवर्णीयांनी बेज-क्रीम सारखे न्यूड शेडस्‌ चुकूनही घेऊ नयेत. तुम्ही गव्हाळ रंगाच्या असलात तर तुम्ही ऑरेंज, टील ब्लू, डस्टी रोज शेड्समध्ये अधिक खुलून दिसता. तुम्ही नियॉन शेड्‌सकडे अजिबात जायचे नाही. तर कृष्णवर्णीय महिलांनी पीच, कोरल यांसारखे अर्दी टोन आणि ब्लू, ऑलिव्ह आणि पर्पल सारखे ज्वेल टोन सिलेक्ट केले पाहिजेत.

योग्य आणि सुलभ फॅब्रिकची निवड

साडीचे फॅब्रिक असे असू द्या, की जेणेकरून तुम्हाला साडीत वावरणे सोपे जाईल. शिफॉन, जॉर्जेट, नेटच्या साड्यांत सहजतेने वावरता येते. तुम्हाला साडीची सवय नसेल तर कॉटन, सिल्क सारख्या मोठ्या फॅब्रिकच्या साड्यांचा मोह टाळलेलाच बरा.

तुम्ही स्थूल असाल तर…

स्थूल महिलांनी मोठ्या प्रिंटवाल्या साड्या नेसू नयेत, त्यांनी छोट्या प्रिंटवाल्या साड्या निवडाव्यात. तुम्ही नाजूक डिझाइन्सच्या साड्याच नेसा. त्यात तुम्ही सडपातळ दिसाल. गडद रंगाची साडी नेसूनही तुम्ही सडपातळ दिसू शकता. फक्त रुंद बॉर्डर असलेली साडी नेसण्यापेक्षा बारीक काठाची साडी नेसा.

चपलांची निवड योग्य करा

चप्पलची निवड साडीला चपखल बसणारी असेल तर निश्चित तुमचा रुबाब वाढेल. साडी नेसल्यानंतर तुम्हाला स्वतःला ज्या चपलांत सहजता असेल अशाच चप्पलची निवड करा. तसं पाहिल्यास साडीसोबत हिलच्या चपलांची जोडी उत्तम जुळते, पण तुम्हाला पेन्सिल हिल जमत नसतील तर तुम्ही प्लॅटफॉर्म हिल्स किंवा वेजेजची निवड करू शकता.

आजमवा साड्यांची नवीन स्टाइल

आजकाल साड्यांच्या ड्रॉपिंगमध्ये नवनवीन स्टाइल आलेल्या आहेत. तेव्हा जुना टिपिकल ट्रेंड बाजूला ठेवून नवीन स्टाइल आजमावून पाहा. नवीन स्टाइलमध्ये तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्ही प्री स्टिच्ड साडी वापरून पाहा. प्री-स्टिच्ड साडीमध्ये गाऊन, धोती साडी, केप साडी, वन शोल्डर, ऑफ शोल्डर सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी कोणताही पर्याय निवडा नि काही मिनिटांत स्टायलिश दिसा.

साडी वर वा जास्त खाली नेसण्यावरही साडीचा आकर्षकपणा अवलंबून असतो. खूप वर किंवा खूप खाली साडी नेसल्यास तुमचा साडीतील लूक बिघडू शकतो. खूप वर साडी नेसल्यास तुम्ही ठेंगणे दिसाल आणि खूप खाली साडी नेसली तर तुमचे पाय छोटे वाटतील. तेव्हा साडीत सुंदर व  आकर्षक दिसायचं आहे तर साडी व्यवस्थित नेसा.

दागिन्यांची निवडही योग्य असावी

साडी नेसली की महिलांना दागिन्यांचा मोह आवरता येत नाही. पण साडीसोबत भरपूर दागिने वापरायचे नाहीत. आकर्षक दिसण्यासाठी साडीसोबत स्टेटमेंट नेक पीस किंवा एथनिक सी ईयररिंग्स वापरा. मात्र नेकलस आणि ईयररिंग्स एकत्र घालण्याची चूक करू नका.