लतादीदींच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या मराठी-...

लतादीदींच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या मराठी-हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करून वाहिली आदरांजली (Tribute to Lata Mangeshkar)

अनेक दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याने एका स्वरयुगाचा अंत झाला. दीदींचा आवाज हा एक दैवी चमत्कार होता. गेली सात दशके त्यांनी आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवली.

एक काळ होता नूरजहाँन या पाकिस्तानात निघून गेल्यामुळे त्यांची जागा घेऊ शकेल अशा नव्या पार्श्वगायिकेला शोधणे आवश्यक झाले होते. दरम्यान महल आणि बरसात  हे चित्रपट आले आणि नूरजहाँची वारस कोण हा प्रश्न निकालात निघाला. तेंव्हापासून मधुबाला ते अगदी प्रिती झिंटा पर्यंत सगळ्या नायिकांना पडद्यावर शोभेल असेच दीदी गात राहिल्या. ‘मला माझे वय आठवत नाही मला वाटतं मी अजूनही तरुण आहे.’ असे एका मुलाखतीत दीदींनी आपलं प्रामाणिक मत  मांडलं होतं. ते त्यांनी त्यांच्या आवाजातून सत्यात उतरवलं. १९४२ पासून पार्श्वगायनास सुरुवात करत २००६च्या दशकापर्यंत अनेक नव्या कलाकारांसाठी त्यांनी गायलेली गाणी आजही  मंत्रममुग्ध करणारी आहेत.

लतादीदींनंतर अनेक पार्श्वगायिका होतील. त्यातल्या काही कदाचित त्यांच्याहून अधिक प्रसिद्धी मिळवतील. पण दुसऱ्या लता मंगेशकर पुन्हा होणे नाही. वि. स. खांडेकरांनी दीदींसाठी लिहिलेल्या या वाक्याची सत्यता आपण पाहतो आहोत.

संगीत क्षेत्रावरच्या नभांवर चमकणारा हा तारा निखळला. वर्षभरापूर्वी याच महिन्याच्या ६ तारखेला या गानसम्राज्ञीने आपला प्रवास संपवला. परंतु शरीराने आपल्यात नसलेल्या लतादीदी त्यांच्या गाण्यातून सतत आपल्या सोबत राहणार आहेत.

अनेक सार्वजनिक नृत्यगायनाचे कार्यक्रम असोत, ऑर्केस्ट्रा असोत लतादीदींच्या गाण्यांनी तो सुरेल होतो यात वादच नाही. दीदींच्या अशाच काही  मराठी आणि हिंदी गाण्यांवर साई श्रद्धाच्या तरुणींनी आपल्या नृत्याचा साज चढवत दीदींना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. गेली अनेक वर्षे या सोसायटीतील महिला तसेच मुलं कार्यक्रम करतात. या वर्षी लतादीदींच्या गाण्यांवरील नृत्यामुळे त्यास उदंड प्रतिसाद लाभला.

  • सीमा सकपाळ