वृक्षवल्ली आम्हा सोयरी (Trees Live Like Closed...

वृक्षवल्ली आम्हा सोयरी (Trees Live Like Closed Ones)

आपल्या घरात, तसंच घराभोवती लावण्यात येणार्‍या वृक्षवेलींमुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते. परंतु सर्वच वृक्ष शुभ फळं देणारे नसतात.

फेंगशुईशास्त्रामध्ये काष्ठ (वुड), अग्नी (फायर), पृथ्वी (अर्थ), धातू (मेटल) आणि पाणी (वॉटर) अशा पाच तत्त्वांना महत्त्व देण्यात आलं आहे. या पाच तत्त्वांचं संतुलन असेल, तर घर वास्तुशास्त्रास अनुसरून अनुकूल सुखदायक राहतं. अन्यथा तेच घर विपरीत फळ देतं. झाडं, वृक्ष-वेली, पानं-फुलं यांनी निसर्ग नटलेला असतो. बहरलेल्या झाडांनी निसर्गाचं सौंदर्य खुलतं. अशा रम्य ठिकाणी आपल्यालाही प्रसन्न वाटतं. आपल्यामध्ये शुभ ऊर्जा प्रवाहित होते. म्हणून आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहणं पसंत करतो. परंतु, आपल्याला हा आनंद सतत घेण्यासाठी पर्यटन करायला मिळत नाही. मग आपण घरात आणि घराभोवती आवडीची झाडं लावतो. त्या झाडांची निगा राखतो. अंगणात बहरलेली ही झाडं आपल्याला आनंद देतात. परिसर पानाफुलांनी सुंदर दिसतो आणि ती सुंदरता शुभ ऊर्जेच्या रूपात घरात वावरते.

प्रत्येक झाडाचं आपलं एक वैशिष्ट्य असतं. तरीही सगळीच झाडं घरात, तसंच घराभोवती लावण्यास योग्य नसतात. त्यांची शुभ-अशुभ फळं आपल्याला मिळत असतात. अशा वेळी फेंगशुई शास्त्रानुसार काही झाडं लावून आपण त्याचा नक्की लाभ घेऊ शकतो.

शुभ फळ देणारे वृक्ष
– सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, घरासमोर तुळस लावा. रोज सकाळी तुळशीला पाणी घातल्यास घरात शुद्ध हवा येते.
– घरासमोर कडुलिंब लावल्यास हवेतील प्रदूषण नष्ट होतं.
– घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचं झाड लावल्यास घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत राहते.
– घराजवळ चंपा, चमेली, गुलाब, केतकी ही फुलझाडं लावल्यास शुभ फळं मिळतात.
– पूर्वेला वटवृक्ष, पश्‍चिमेला पिंपळ, दक्षिणेला औदुंबर आणि उत्तरेला पाकर शुभ असतो.
– फणस आणि नारळ कोणत्याही दिशेला शुभ फळं देतात.
– चंपा, डाळिंब, शमी, बेल, अशोक, नागकेशर घराजवळ असणं शुभ आहे.
– मालती, केसर, जास्वंद घराच्या कोणत्याही दिशेला असल्यास शुभ फळंच देतात.
– घरात बांबूचं झाड पूर्व आणि उत्तर दिशेला ठेवता येईल.

अशुभ फळ देणारे वृक्ष
– घराच्या आग्नेयाला लाल फुलांची झाडं त्रासदायक ठरतात.
– आग्नेय आणि उत्तरेला औदुंबर अशुभ फळं देतो.
– पश्‍चिमेला वटवृक्ष लावल्यास अशुभ फळं मिळतात. त्यापासून मानसिक पीडा उद्भवते.
– ज्या घरात बोर, बाभूळ, केळं, महाळुंग ही झाडं वाढतात, त्या घरात कशातच वृद्धी होत नाही.
– घराजवळ रुईचं झाड लावल्यास आर्थिक उन्नती होत नाही.
– हळदीचं झाड घराजवळ लावल्यास मुलांसाठी प्रतिकूल ठरतं.
– घरात बोन्साय (वाढ खुंटवलेली) झाडं ठेवू नयेत.
– घरात निवडुंगासारखी काटेरी झाडे लावू नयेत.
– वॉल कंपाऊंडला लागून वड-पिंपळासारखे मोठे वृक्ष असू नयेत.

हेही महत्त्वाचं…
– सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, घरावर कोणत्याही झाडाची सावली असू नये.
– वास्तूच्या ब्रह्मस्थानी कुठलाही मोठा वृक्ष ठेवू नका.
– घराभोवती काटेरी कुंपण असू नये.
– रोगी व्यक्तीने आणून दिलेलं रोप घराजवळ लावू नये.
– टॉयलेट आणि बेडरूममध्ये कोणतंही झाड ठेवू नये.
– कितीही सुंदर दिसणारी, मोहक रंगाची वेल पूर्व किंवा उत्तर दिशेने मांडव करून घरावर चढवू नये.
– घरात किंवा घराबाहेर गुलाब, तसंच शतावरीसारखी काटेरी झुडूपं अपवादात्मक लावू शकता.

फेंगशुईशास्त्रच्या या नियमांचं पालन केल्यास वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… ही ओळ यथार्थ सिद्ध होईल.