उपचार करणारी सुवासिक फुलं (Treat Yourself With ...

उपचार करणारी सुवासिक फुलं (Treat Yourself With Flowers)

फुलांना आपल्या जीवनात अतिशय महत्त्व आहे. सुंदर, विविधरंगी आणि सुवासिक फुलांचा वापर देवाच्या पूजेसाठी, सौंदर्यासाठी तसंच आजारांवरील उपचारांसाठीही फार प्राचीन काळापासून होत होता, होत आहे आणि होत राहील.
सुंदर, विविधरंगी व सुवासिक फुलांकडे पाहिलं की कसं प्रसन्न वाटतं. ह्या फुलांचं आपल्या जीवनात अतिशय महत्त्व आहे. देवाच्या पूजेसाठी, सजावटीसाठी, भेट म्हणून देण्यासाठी, सजण्यासाठी, सौंदर्यासाठी आणि औषधासाठी… आपल्या रोजच्या परिचयाची ही फुलं एवढी महत्त्वाची का आहेत ते पाहूया.

गुलाब


फुलांचा राजा. गुलाबाचं फुल जितकं सुंदर आहे त्यापेक्षा अधिक ते औषधी आहे. सौंदर्याशी या फुलाचं फार जुनं नातं आहे. पूर्वीच्या राजकन्या, राण्या गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात घालून स्नान करत असत. तसेच गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनविलेले उटणं त्या लावत असत. त्यामुळे त्यांची त्वचा सुंदर व नाजूक असे.
गुलाबाच्या सुवासाने मन शांत होतं.
सौंदर्य आणि शृंगार याबरोबरच गुलाब हरतर्‍हेच्या आजारांचा डॉक्टरही आहे.
गुलाबामध्ये सी जीवनसत्त्व भरपूर असतं. त्यामुळे सांधेदुखी असणार्‍यांनी रोज गुलकंद खाल्ल्यास बरं वाटतं.
रोज गुलाबाची फुले खाल्ल्याने टी. बी. सारखे श्‍वसनरोग बरे होतात.
गुलाबाच्या पाकळ्यांमुळे दातांची दुर्गंधी व पायरियासारखे आजार निघून जातात आणि दात व हिरड्या मजबूत होतात.
पोटांच्या आजारांसाठी रोज गुलकंद खावे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही गुलाबपाणी उपयुक्त ठरतं.
पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालून उकळवलेले पाणी नियमित घेतल्यास त्यामुळे शरीरातील पित्त दोष, थकवा आणि ताण नाहीसा होतो.

जास्वंद


गणपती तसेच कालीमाता यांच्या पूजेसाठी जास्वंदाचं फूल लागतं. त्यामुळे या फुलाला पवित्र मानलं जातं. हे झाड मुळापासून फुलापर्यंत संपूर्णतः उपयुक्त आहे. खास करून त्वचा आणि केसांच्या समस्येसाठी या फुलांचा वापर केला जातो.
जास्वंदीची 20 फुलं किंवा पानं सुकवून त्याची पावडर रोज एक ग्लास दुधात घालून घेतल्यास स्मरणशक्ती उत्तम होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरतादेखील भरून निघते.
चेहर्‍यावरील मुरमांसाठी जास्वंदीची फुलं वाटून त्यात मध घालून चेहर्‍यास लावल्यास फायदा होतो. चेहर्‍याचं सौंदर्य असं खुलून येतं की त्यामुळे वयाचा अंदाज येत नाही.
जास्वंदीची फुलं वाटून केसांना लावल्यास ते सुंदर व मजबूत होतात.
सौंदर्यप्रसाधन म्हणूनही वापरता येतं. जास्वंदीची फुलं आणि पानं वाटून त्यापासून हर्बल आयशॅडो बनवितात.

कॅमोमाइल


हा ग्रीक शब्द आहे. ग्रीकमध्ये ‘कॅमोज’ म्हणजे जमीन आणि ‘माइल्स’ म्हणजे सफरचंद (अ‍ॅपल). अर्थात कॅमोमाइल हे जमिनीच्या जवळ वाढणारे व सफरचंदाप्रमाणे चव असणारे फूल आहे. हे अतिशय सुवासिक व आकर्षक असून ते जून-जुलै या महिन्यांतच दिसते.
बाष्प रूपाने या फुलांचा वापर केल्यास सर्दी, अस्थमा यांसारख्या आजारांवर उत्तम उपाय ठरतो.
कॅमोमाइल टी देखील शरीराच्या अंतर्गत पोटांचे आजार दूर ठेवते.
त्वचेसाठी कॅमोमाइल क्रीम किंवा तेल वापरल्यास त्वचा मुलायम होते तसेच त्वचेसंबंधी काही तक्रारी असल्यास त्याही दूर होतात.
माऊथ वॉश सारखाही याचा वापर होऊ शकतो.

कमळ


कमळ हे त्याच्या गुणांमुळेच आपलं राष्ट्रीय फूल आहे.
कमळाच्या बिया अनेक आजारांवर उपयुक्त आहेत. या बियांच्या सेवनानं मधुमेहींची रक्तातील साखर नियंत्रित राहते.
रक्ताभिसरण सुधारून उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी तसेच ज्यांना झोप येत नाही त्यांनी कमळाच्या बियांचा वापर केल्यास मनःशांती मिळते.
गर्भावस्थेमध्ये अशक्तपणा आल्यास आई व बाळ अशा दोहोंच्या स्वास्थ्यासाठी कमळ उपयोगी आहे.

गोंडा


सणासुदीचे दिवस असोत वा घरात एखादं धार्मिक कार्य असो, दाराला लावण्यात आलेलं गोंड्याचं तोरण हे शुभ मानलं जातं. देवपूजा व धार्मिक कामांसाठीच बहुतांशी वापरला जाणारा गोंडा औषधीही आहे.
भाजणं, कापणं यासारख्या इजा झाल्यास त्या नैसर्गिकरीत्या बर्‍या करण्याचे गुण गोंड्याच्या अर्कामध्ये असतात.
गोंड्याच्या फुलांमध्ये अ‍ॅन्टी ऑक्सिडंट असल्यामुळे स्तनाचा कॅन्सर बरा होण्यास मदत होते. तसेच कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरमध्ये तो वाढू नये यासाठी गोंडा मदत करतो.
पोट आणि तोंड यांच्या वेदनात्मक अल्सरमध्ये गोंड्याचा अर्क पाण्यासोबत घेतल्यास उपयुक्त ठरते.
गोंड्याच्या फुलामध्ये जीवनसत्त्व सी असते, ज्यामुळे शरीराला हार्ट अ‍ॅटॅक होण्याची शक्यता कमी होते.
आर्थरायटीस तसेच सांधेदुखी सारख्या आजारांमध्ये गोंड्याचा अर्क वा तेल वापरल्यास बरे वाटते.
योनीस इन्फेक्शन झालं असल्यास बाथटबमध्ये गोंड्याच्या पाकळ्या घालून गरम केलेले पाणी घ्यावे.
त्वचा तेलकट असल्यास गोंड्याची ताजी फुलं पाण्यात उकळवून ते पाणी चेहर्‍यास लावून ठेवावं. 10 ते 15 मिनिटानंतर चेहरा धुऊन टाका. रोज दिवसातून एक वेळ तरी असं केल्यास चेहरा तजेलदार होतो. नाहीतर शक्य असल्यास गोंड्याच्या तेलाने चेहर्‍यास मसाज करा. याचाही उत्तम रिझल्ट मिळतो.

फुलांची ताकद


हवा जब फुलोंसे गुजरती है,
तो वो भी खुशबुदार हो जाती है।
मग माणसांचं काय?
नाजुक, रंगीत पाकळ्या-पाकळ्यांनी बनलेल्या फुलांमध्ये एवढी शक्ती असते की ती आपल्या सहवासात येणार्‍यांनाही आपल्यासारखंच स्वच्छंद, ताजेतवानं बनवून टाकतात. आपल्या दैनंदिनीमध्ये फुलांचा समावेश करून बघा त्यांची करामत.

मूड
सकाळी उठल्या उठल्या, समोर ताजी सुंदर फुलं दिसली की संपूर्ण दिवस त्याच ताजेपणानं भरून जातो. अशा वेळी जेथे जेथे म्हणून आपला वावर असेल अशा बेडरूम, हॉल, किचन अशा सर्वच ठिकाणी फुलं ठेवून द्यावी म्हणजे सर्व ताण व आळस जाऊन एक नवीन मूड येईल.

ऊर्जा
फुलांचा दरवळणारा सुगंध घरभर एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. जर्मनीचे प्रो. नॅन्सी रोलिंग यांच्या मते केवळ 15 मिनिटं फुलांच्या सानिध्यात राहिल्यानं आपल्या मनात सकारात्मक विचार येतात. आपल्या काळज्या, अस्वस्थपणा नाहीसा होतो. फुलांचे गडद रंग आपली ऊर्जा वाढवितात.

शुद्ध हवा
फुलझाडं लावल्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होतं. हवेतील कार्बन डायऑक्साईड वा इतर अपायकारक वायू शोषून घेऊन ऑक्सिजन बाहेर टाकण्याच्या त्यांच्या क्रियेमुळे आपण शुद्ध हवा घेऊ शकतो.

सृजनशीलता
जेव्हा जेव्हा आपल्याला काय करावं हे सुचत नाही किंवा आपली कल्पनाशक्ती तोकडी पडते, तेव्हा चहा वा कॉफी पिण्यापेक्षा रूममध्ये वा आपल्या डेस्कवर मस्त ताजी फुलं आणून ठेवा. लगेचच कल्पनाशक्तीला स्फुरण चढून अपेक्षित कृतीही घडेल. खास करून लहान मुलांच्या रूममध्ये फुलं वा फुलझाडाची कुंडी ठेवून पाहा. याचा प्रत्यय येईल.