वंध्यत्वावरील उपचारांना उशीर नको! (Treat Infert...

वंध्यत्वावरील उपचारांना उशीर नको! (Treat Infertility Well In Time)

अलिकडे अधिकाधिक स्त्रिया शिक्षण आणि नोकरी या गोष्टींसाठी लग्नाचा निर्णय लांबणीवर टाकताना दिसत आहेत. याखेरीज घटस्फोट आणि पुनर्विवाह यांच्या वाढत्या संख्येमुळेही गर्भधारणेला उशीर होत आहे. मात्र कोणत्याही गुंतागुंतीशिवाय गर्भधारणा होण्यामध्ये वय हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही.

आजकाल सेलिब्रिटी वर्तुळामध्ये उशिराने मातृत्वाचा निर्णय घेण्याकडे कल वाढत असल्याने कोणत्याही वयामध्ये गरोदर राहणे शक्य आहे, असा समज समाजामध्येही वाढत आहे. मात्र कोणत्याही गुंतागुंतीशिवाय गर्भधारणा होण्यामध्ये वय हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही. अलिकडे करिअर घडविण्याच्या महत्त्वाकांक्षेला महिलांकडून प्राधान्य दिले जात असून मातृत्वावर लक्ष केंद्रित करण्याला दुय्यम महत्त्व दिले जात आहे. शिक्षण आणि नोकरी या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरत असल्याने अधिकाधिक स्त्रिया लग्नाचा निर्णय लांबणीवर टाकताना दिसत आहेत. याखेरीज घटस्फोट आणि पुनर्विवाह यांच्या वाढत्या संख्येमुळेही गर्भधारणेला उशीर होत आहे, ही वस्तुस्थिती क्लाउडनाइन हॉस्पिटलच्या कन्सल्टन्ट फर्टिलिटी व आयव्हीएफ स्पेशलिस्ट, डॉ. राधिका शेठ यांनी निदर्शनास आणली आहे. त्या पुढे म्हणतात -प्रजननक्षम वयातील स्त्रीची शरीररचना समजून घेण्यासाठी, एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, ती म्हणजे शरीराद्वारे उत्तम दर्जाची अंड्यांची निर्मिती होण्यासाठी वय हा घटक कारणीभूत ठरत असतो. जसजसे वय वाढत जाते, तसतशी अंड्यांची गुणवत्ता कमी होत जाते व एकूणच गर्भधारणेची शक्यताही कमी होत जाते. अंड्यांची गुणवत्ता आणि भ्रूणाचा दर्जा या गोष्टी एकमेकांशी निगडित असतात. त्यामुळे बाळाला कोणतेही जन्मजात व्यंग असू नये याची खातरजमा करण्यामध्ये अंड्याची गुणवत्ता चांगली असणे महत्त्वाचे ठरते. अंड्यांमध्ये गुणसूत्रीय विकृती निर्माण होण्याची शक्यताही वयानुसार वाढते हे सर्वज्ञात आहे.

Treat Infertility Well In Time

निर्णय लांबवू नका
वयाच्या तिशीपासून बिजांडकोषातील अंड्यांचा साठा कमी होऊ लागतो या गोष्टीची इथे नोंद घ्यायला हवी. म्हणूनच एकुलते एक मूल हवे असल्यास त्यासाठी वयाच्या 32 व्या वर्षीच्या आसपास प्रयत्न करायला हवेत तर दोन मुलांसाठी नियोजन करणार्‍या जोडप्याने वयाच्या 27व्या वर्षीपासून त्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. त्याचप्रमाणे आयव्हीएफ उपचार घेऊ पाहणार्‍या जोडप्यांनी एक मूल हवे असल्यास 35 वर्षांहून आणि दोन मुलं हवी असल्यास 31 वर्षांहून अधिक काळ हा निर्णय लांबवता कामा नये. साधारणपणे विशी सुरू होताना किंवा पंचविशीपर्यंत एकाच सायकलमध्ये गरोदर राहण्याचे प्रमाण 25 ते 30 टक्के असल्याचा अंदाज आहे. मात्र जसजसे वय वाढत जाते आणि चाळीशी जवळ येऊ लागते, तसतशी ही शक्यता कमी कमी होत जाते व एका सायकलमध्ये केवळ 5 टक्क्यांवर येऊन पोहोचते.

Treat Infertility Well In Time

शिवाय उशिराच्या गर्भधारणेमध्ये नवजात अर्भकालाही अनेक धोके संभवतात. गरोदरपणातील मधुमेह, एक्टोपिक प्रेग्नन्सीज आणि सी-सेक्शन डिलिव्हरीज अशा धोक्यांबरोबरच नवजात बाळ कमी वजनाचे जन्माला येण्यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. मातांसाठी एंडोमेट्रिऑसिस आणि फायब्रॉइड्ससारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात व याचा भविष्यकाळात प्रजननक्षमतेवर परिणामहोऊ शकतो. सध्या देशात कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या कमी होत आहे व देशातील परिस्थिती पुन्हा एकदा रूळावर येत आहे. त्यामुळे वंध्यत्वावरील उपचार घ्यायचे असल्यास उशीर करू नका आणि संधी आहे तोवर यासंदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करा.