इलाज करणारे किचनमधील मसाले (Treat Diseases with...

इलाज करणारे किचनमधील मसाले (Treat Diseases with kitchen spices)

किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असणारे लसूण, आलं, वेलची, मेथी यांसाखे मसाल्याचे पदार्थ, जेवणाची चव तर वाढवतातच, शिवाय आपल्या आरोग्याचीही काळजी घेत असतात. आपल्या घरातील आजी-आजोबांची जीवनशैली, त्यांची या वयातही असलेली एनर्जी, यापुढे आपला हेल्थ कॉन्शसपणा फिका आहे. आपण फार क्वचित त्यांना आजारी पडताना पाहतो. आजारी पडले तरी त्यांची रोगप्रतिकारशक्ती जबरदस्त असते. यासाठी त्यांना फार काही करावंच लागत नाही. कारण आजारी पडूच नये यासाठीची गुरुकिल्ली स्वयंपाकघरातच असते, हे त्यांना माहीत आहे आणि त्याचा वेळोवेळी ते वापरही करतात. रोजच्या वापरात असलेले मसाल्याचे पदार्थही असेच गुणकारी आहेत. त्याविषयी-

लसूण

–    उच्च रक्तदाबासाठी रोज

सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्या खाव्यात.

–    लसूण बारीक वाटून दुधातून घेतल्यास रक्तदाबाचा त्रास कमी होतो.

–   रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित राहतं.

–    लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये उकळवून ते तेल दोन-दोन थेंब कानामध्ये घातल्यास कानाचं दुखणं कमी होतं.

–    लसूण, साखर आणि सैंधव मीठ सारख्याच प्रमाणात घेऊन चटणीसारखं वाटून घ्या. त्यात तूप घालून त्याचं चाटण करा. म्हणजे पोटदुखी, अपचन, पोटातील जळजळ नाहीशी होते.

–    लसणाच्या 10-15 पाकळ्या दुधात शिजवून ते दूध गाळून घ्या. हे दूध सकाळ-संध्याकाळ मुलांना प्यायला दिल्यास मुलांचा खोकला कमी होतो.

–    तिळाच्या तेलामध्ये ओवा व लसूण घालून गरम करून, त्या तेलाने मालीश केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो.

ओवा

–    ओवा आणि काळं मीठ गरम पाण्यासोबत घेतल्यास गॅसचा त्रास होत नाही.

–    पोटदुखीसाठी ओवा आणि गूळ खावा. नंतर पाणी प्यावं.

–    ओवा, काळं मीठ आणि हिंग एकत्र वाटून ठेवावं. जेव्हा पोटदुखीचा त्रास होईल, तेव्हा त्यातील 1 ग्रॅम चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावं.

–   100 ग्रॅम ओवा बारीक करून, त्यात 100 ग्रॅम गूळ एकत्र करून ठेवावं. रोज सकाळ-संध्याकाळ 5 ग्रॅम इतकं घ्यावं. त्यामुळे कंबरदुखी दूर होते.

आलं

–    पोटांचे आजार, तसंच बद्धकोष्ठता यासाठी आलं हे उत्तम औषध आहे. आलं बारीक चिरून त्यावर लिंबाचा रस आणि मीठ घालून खावं. हे जेवणासोबतही खाता येतं. त्यामुळे जेवण पचतं.

–   आलं आणि लिंबाचा रस, सैंधव मीठ घालून जेवणापूर्वी घेतल्यास, भूक चांगली लागते आणि गॅसही होत नाही.

–    मासिक पाळीच्या त्रासासाठी सुंठ आणि जुना गूळ यांचा काढा करून प्यावा.

–    अ‍ॅसिडिटी असेल किंवा आंबट ढेकर येत असतील, तर 1 कप कोमट पाण्यामध्ये 2 चमचे आल्याचा रस आणि अर्धा चमचा काळं मीठ घालून काही दिवस घ्यावं.

–    ताप आल्यास आलं आणि पुदिना यांचा काढा घ्यावा.

–    सर्दी-पडसं यासाठी आल्याचा चहा प्यावा.

–    आल्याच्या रसामध्ये मध घालून चाटण केल्यास, खोकला होत नाही.

–    आल्याचा रस नियमितपणे प्यायल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी होतो.

लवंग

–    सर्दी-पडसे यासाठी लवंगाचा काढा प्यावा.

–    लवंग तेलाचे काही थेंब रुमालावर घेऊन, ते वेळोवेळी हुंगल्यास बंद नाक मोकळं होतं.

–    दातदुखी किंवा दात किडला असेल तर, लवंग तेल लावल्यास वा दुखर्‍या ठिकाणी लवंग दाबून ठेवल्यास आराम मिळतो.

–    खोकला किंवा घसा दुखत असल्यास लवंग तोंडात ठेवावं आणि हळूहळू त्याचा रस चोखावा.

–    गर्भावस्थेत उलटी होत असल्यास उलटीनंतर 1 ग्रॅम लवंग पूड डाळिंबाच्या रसासोबत घ्यावी.

–    गॅसेससाठी अर्धा कप पाण्यामध्ये 2 लवंगा घालून पाणी उकळवून थंड करून घ्यावं.

–    भूक लागत नसल्यास अर्धा ग्रॅम लवंग पूड 1 ग्रॅम मधासोबत सकाळी घ्यावी.

–    डोकेदुखीसाठी लवंग वाटून त्याचा लेप लावा.

पुदिना

–    पुदिना आणि आलं यांचा रस एकत्र करून, त्यात सैंधव मीठ घालून घेतल्यास पोटदुखी बंद होते.

–    4 चमचे पुदिना रसामध्ये एका लिंबाचा रस आणि 2 चमचे मीठ एकत्र करून घेतल्यास गॅस होत नाही.श्र  पुदिन्याचा रस प्यायल्यास पोट आणि आतड्यांत जंतुसंसर्ग होण्यापासून मुक्ती मिळते.

–    पुदिन्याची पानं थोड्या-थोड्या वेळाने चावत राहिल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.

–    डोकंदुखी होत असल्यास, पुदिन्याचा रस लेप म्हणून लावावा.

–   त्वचेला अ‍ॅलर्जी, इन्फेक्शन, खाज, असे त्रास होत असल्यास हळद आणि पुदिना यांचा रस समान मात्रेत घ्यावा.

–    सर्दी-पडसे होत असल्यास पुदिन्याची पानं आणि काळी मिरी घालून चहा बनवावा. हा चहा प्यायल्यास आराम मिळतो. हा चहा अस्थमासाठीही उपयुक्त आहे.

मेथी

–    मेथी हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे. मेथीमुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं.

–    मधुमेहींसाठी मेथी योग्य उपाय आहे. ती रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

–    कंबरदुखी, सर्दी-खोकला असल्यास मेथीचे लाडू खावेत. थंडीच्या दिवसात मेथी खाल्ल्यास फायदा होतो. रोज एक मेथीचा लाडू खावा.

–    मेथीच्या नियमित सेवनाने महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो.

–    मेथीमधील फायबर पोटासाठी चांगले असतात. मेथी वजन कमी करते.

–    मेथीमध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असल्याने शरीराची झीज भरून निघतेे. तसंच अशक्तपणा कमी होतोे.

–    आल्याच्या रसामध्ये मेथीचा दाणा आणि मध एकत्र केल्यास अस्थमाच्या रुग्णांना दिलासा मिळतो.

वेलची

–   उलटीसारखं होत असल्यास तोंडात वेलची ठेवून चघळावी.

–    उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हातून जाताना वेलची तोंडात ठेवावी, त्यामुळे चक्कर येणार नाही.

–    अ‍ॅसिडिटी होत असल्यास, वेलची आणि साखर खावी. लगेच आराम पडतो. साखर नसल्यास नुसती वेलची खाल्ली तरी चालेल.

–    सर्दी आणि घशाचं खवखवणं यासाठी सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी वेलची खावी आणि कोमट पाणी प्यावं.

–    वेलची रक्तदाब नियंत्रित करते. वेलचीमध्ये पोटॅशियम आणि फायबर असल्याने ती चावून खावी किंवा आपल्या अन्नपदार्थामधून ती खावी.

–    उचकी लागल्यास, वेलची खाल्ली की लगेच थांबते.

–    वेलची हृदयासाठीही उपयोगी असते. यामुळे नाडीचे ठोके व्यवस्थित पडतात, तसंच रक्ताभिसरण सुधारतं.

दालचिनी

–    सॅलेड, दही, चहा यांमध्ये दालचिनी पूड एकत्र करून घ्यावी.

–    मधुमेहींनी रोज दालचिनीचं सेवन केल्यास रक्तशर्करा नियंत्रणात राहते.

–    दालचिनी बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवते.

–    दालचिनीच्या अँटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे ती हृदयासाठी अतिशय फायदेशीर असते.

    कॅन्सरसारखा आजार रोखण्यास किंवा वाढू न देण्यास ही मदत करते.

काळी मिरी

–    काळ्या मिरीच्या नियमित वापराने पचनक्रिया सुधारते.

–    पोटातील सूज, गॅस, अपचन अशा समस्यांसाठी काळी मिरी घ्यावी.

–    रोज सकाळी भिजवलेल्या बदामासोबत काळी मिरी चावून खाल्ल्यास, घशाचं इन्फेक्शन

दूर होतं.

–    ही अँटी-बॅक्टेरिअल आहे आणि आतड्यांच्या रोगांसाठी उपयुक्त आहे.

–    दालचिनीची पूड करून ठेवल्यास, सॅलेड, दही, चहा यामध्ये वापरता येते.

काय मग? आता रोज रोजच्या हवामान बदलांमुळे होणार्‍या आजारांसाठी घरच्या घरी मसाल्यांचे हे उपचार करून बघाच!