महिलांच्या गर्भाशयाचा व्यापार करणारे नराधम (Tre...
महिलांच्या गर्भाशयाचा व्यापार करणारे नराधम (Treacherous Doctors Exploit Women To Remove Uterus)

महाराष्ट्रात उसाचे पीक अमाप आहे. पण हे उस तोडणाऱ्या मजुरांचे क्रूरपणे शोषण केले जात आहे, याची खबरबात आपल्याला नाही. विशेषतः महिला उसतोडणी मजुरांवर जे अत्याचार केले जातात, ते एखाद्या क्रूरकर्म्याला लाजवतील असे आहेत.

बीड मधील महिला उसतोडणी मजुरांना रोजची भाजी-भाकरी मिळवण्याच्या संघर्षापायी अत्याचार सहन करावे लागत आहेत. हा भयंकर अत्याचार चव्हाट्यावर मांडणारा ‘बिटरस्वीट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सुचंदा चॅटर्जी आणि शुभा शेट्टी निर्मित या वास्तववादी चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अनंत महादेवन यांचे आहे. तोंड कडू करणाऱ्या साखरेचे कथानक असलेला हा मराठी चित्रपट नोव्हेंबर महिन्यात गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

‘बिटरस्वीट’ ही सगुणा आणि तिच्या सहकारी महिला, उसतोडणी मजुरांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कष्टांची विलक्षण कथा आहे. ” ही भारताच्या साखर निर्मिती मागच्या वेदनांची कथा आहे. उसतोडणीचा कालावधी वर्षातील फक्त सहा महिने असतो आणि त्यावर काम करणाऱ्या महिलांना उर्वरित वर्षभर तोडणीच्या काळात मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर जगावे लागते. त्यामुळे उसतोडणीच्या काळात एक दिवस देखील सुट्टी घेणे परवडत नाही. कारण रोजगार बुडतो. पण महिन्यातील मासिक पाळीमुळे हे कष्टाचे काम करता येत नाही व त्यांना दरमहा ३ ते ४ दिवस गमवावे लागतात. हे नुकसान टाळण्यासाठी काही संधीसाधू लोकांनी बीड गावात, सुमारे १० वर्षांपूर्वी एक विचित्र प्रथा सुरू केली,” अशी माहिती लेखक व दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिली.

ही प्रथा म्हणजे, महिलांचे गर्भाशय काढून टाकणे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या भागातून स्थलांतरित झालेले भोंदू आणि पात्रता नसलेले स्त्रीरोग तज्ज्ञ बीडमध्ये आले. आणि पैसे कमावण्यासाठी त्यांनी या उसतोडणी करणाऱ्या महिलांना हिस्टेरेक्टॉमी – अर्थात् गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊ लागले. मासिक पाळीमुळे महिन्यातून ३-४ दिवस रोजगार बुडतो, त्यावर उपाय म्हणजे पाळी येऊ न देणे आणि पाळी येऊ द्यायची नसेल, तर गर्भाशय काढून टाकणे. शिवाय मासिक पाळी येते तेव्हा होणाऱ्या वेदना आणि गर्भाशयात होणाऱ्या गाठींची वाढ या गोष्टी टाळण्यासाठी गर्भाशय काढले की, त्यांची सुटका होऊ शकते. अशा गोष्टी या गरीब, गरजू महिलांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले.
अशी या भयंकर प्रथेची पार्श्वभूमी सांगून अनंत महादेवन पुढे म्हणाले की, “या भयंकर प्रथेचा परिणाम म्हणून आज ‘बिटरस्वीट’ या चित्रपटातील नायिकेसारख्या तरुण मुलींवर या शस्त्रक्रिया होत आहेत. जैविक चक्रच अनैसर्गिकरित्या बदलून टाकण्याची ही कथा पूर्णपणे हादरवून टाकते.”
एका अग्रगण्य दैनिकात ‘बीड : एक गर्भ नसलेल्या स्त्रियांचे गाव’ या शीर्षकाची बातमी वाचली. ती वाचून आपल्याला या चित्रपटाची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटाची नायिका सगुणा आणि तिच्या सहकारी महिला उसतोडणी मजुरांची ही कथा आहे. तरुण सगुणा इतर मजुरांसोबत उसाच्या शेतात काम करायला येते. कठोर परिश्रम आणि वडिलांचे कर्ज फेडण्याचा तिचा निर्धार आहे. पण मासिक पाळी येते तेव्हा ती तीन दिवस कामावर येत नाही. त्यावर तिला मोठा दंड आकारला जातो. तिचे काम थांबू नये म्हणून हिस्टरेक्टॉमी करण्याचा सल्ला दिला जातो. हा नियम सगळ्यांसाठी आहे, हे कळल्यावर तिला धक्का बसतो.
सगुणाची भूमिका अक्षया गुरवने केली असून विश्वकर्मा व स्मिता तांबे तिच्यासोबत आहेत.