तेव्हाच वास्तू म्हणेल तथास्तु! (Traditional Rul...

तेव्हाच वास्तू म्हणेल तथास्तु! (Traditional Rules To Gain Positive Energy In Your House)

तेव्हाच वास्तू म्हणेल तथास्तु!
आपल्या अपेक्षांची पूर्तता व्हावी, असं वाटत असेल तर सर्वप्रथम आपण वास्तूच्या अपेक्षांची पूर्तता करायला हवी. हो, आपल्याप्रमाणेच वास्तूच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतात. आपण त्या योग्य प्रकारे पूर्ण केल्या, तरच ती आपल्याला ‘तथास्तु’ म्हणते.
थकल्या-भागलेल्या आपल्या शरीर-मनाला सुख, समाधान, शांती देणार्‍या आपल्या घराचं, आपल्या वास्तूचं पावित्र्य आपणच टिकवून ठेवलं पाहिजे. आपल्या वास्तूमध्ये सुखशांती, समाधान कायम राहावं, आपल्या वास्तूमधील प्रत्येक सदस्याचं आरोग्य उत्तम राहावं, त्याला प्रत्येक कार्यात यश संपादन करता यावं, याच आपल्या माफक अपेक्षा असतात. आपल्या या अपेक्षांची पूर्तता व्हावी,
असं वाटत असेल तर सर्वप्रथम आपण वास्तूच्या अपेक्षांची पूर्तता करायला हवी.
हो, आपल्याप्रमाणे वास्तूच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतात. आपण त्या योग्य प्रकारे पूर्ण केल्या, तरच ती आपल्याला ‘तथास्तु’ म्हणते. लक्ष्मी प्रसन्न राहते आणि घरात सुखशांती, समाधानही सदैव नांदतं.
स्वच्छता असे जिथे,
लक्ष्मी वसे तिथे
सर्वांत महत्त्वाची आहे घरातील स्वच्छता. सणावाराच्या निमित्ताने आपण सर्वच घराची साफसफाई करतो. हे गरजेचंच आहे. घरातील कचरा, जळमटं किंवा वापरात नसलेल्या वस्तू इत्यादींमार्फत घरात नकारात्मक किंवा अशुभ ऊर्जा स्थिरावलेली असते. वेळोवेळी केलेल्या साफसफाईमुळे ही नकारात्मक-अशुभ ऊर्जा घराबाहेर निघून जाण्यास आणि शुभ ऊर्जा घरात प्रस्थापित होण्यास मदत होते. आणि म्हणूनच साफसफाई केल्यानंतर आपल्याला घरात अधिक प्रसन्न वाटू लागतं. आपण आनंदात-जोशात सणवार साजरे करतो. असंच प्रसन्न वातावरण घरात सदैव राहावं यासाठी घराची साफसफाई वरचेवर करायला हवी. घरात कचरा, जळमटं, अनावश्यक वस्तू साचून राहणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यायला हवी.
पहाटे लवकर उठा


घराला घरपण येतं, ते त्या घरातील सदस्यांमुळे. म्हणूनच सर्वांनी पहाटे लवकर उठून स्नान करावं. केरकचरा काढून घर स्वच्छ करावं.
मग देवपूजा करावी, तुळशीला
पाणी वाहून तिचीही पूजा करावी. मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढावी, त्यावर हळदकुंकू वाहावं. सकाळी घरात देवाची आरती किंवा गाणी म्हणावीत. ते शक्य नसेल, तर म्युझिक सिस्टमवर ती लावावीत. यामुळे घरातील वातावरण पवित्र होतं. घरात शुभ लहरींचा वावर वाढतो. प्रसन्नता येते. घरात कायम महालक्ष्मीचा वास राहतो. रांगोळीमुळे बाहेरची अशुभ ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
सूर्यास्तापूर्वी दिवे लावा संध्याकाळी सूर्यास्ताच्या जरा आधीच घरातील सर्व दिवे सुरू करा आणि त्याच वेळी देवाची, तसंच तुळशीची पूजा करून त्यांच्यासमोरही दिवा लावा. मुलांकडून शुभंकरोती
म्हणून घ्या. यामुळे घरात शांतता नांदते. घरातील सदस्यांमधील एकमेकांविषयी प्रेम आणि आदर वाढतो.
सणासुदीला तोरण लावा, नैवेद्य दाखवा सणावाराला प्रवेशद्वाराला फुला-पानांचं तोरण लावा. फुलांमुळे वातावरण सुगंधी होतं. घरातील वातावरण
प्रसन्न होतं. घरात शुभ ऊर्जा प्रवाहित होते. तसंच सणासुदीला गोडाचा स्वयंपाक करून, त्याचा नैवेद्य देवाला, तुळशीला
आणि अग्नीलाही दाखवा. यामुळे देवदेवता प्रसन्न होतात. अग्नीला नैवेद्य दाखवल्यामुळे अग्नी देवता नि अन्नपूर्णाही प्रसन्न राहते आणि त्यामुळे वास्तूमध्ये अन्नाची कमतरता भासत नाही. अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. प्रत्येकाने आपल्याला जमेल तसं अन्नदान करायला हवं. निदान जेवणाच्या वेळी एखादी व्यक्ती घरी आली, तर त्यांना जेवल्याशिवाय पाठवू नका. दानामुळे पुण्य लाभतंच, सोबत देण्याची वृत्ती आपल्याला समाधानही देऊन जाते.
देवदेवतांसोबतच पितरांचीही पूजा करा तसंच घरात वर्षातून किमान एकदा पूजा-पाठ, होम-हवन होणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे घरातील अशुभ ऊर्जेचा नाश
होतो आणि शुभ लहरींचा प्रवाह वाढतो. मंत्रघोष, घंटानाद यामुळे शुभ ऊर्जेचा वेग वाढतो आणि
ही शुभ ऊर्जा घरातच स्थिरावते. देवपूजेप्रमाणेच पितरांची पूजा होणंही गरजेचं आहे. श्राद्ध घालून पितरांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी पूजा करा. पितरांचे आशीर्वादही आपल्याला कामधंद्यामध्ये यशस्वीहोण्यास मदत करतात.
खरं तर हे नियम नवे नाहीत. पूर्वापार चालत आलेले आहेत. मात्र
बरेचदा हे सर्व आपण केवळ पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती म्हणून करतो. पण त्यामागील उद्देश
जाणून घेतल्यास, हे किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येईल. हे सर्व करण्यामागे उद्देश हाच की, घरातील सर्वांना दीर्घायुष्य लाभावं, आरोग्य उत्तम राहावं, सुख-समृद्धी लाभावी,
कामात-क्षेत्रात यश संपादन करता यावं, सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. या अशा लहानसहान गोष्टीच खूप महत्त्वाच्या असतात. यामुळे आपलं आयुष्य सुख-समाधानाने भरून जातं. घरात शुभ
ऊर्जेचा संचार होतो, ती शुभ ऊर्जा कायम राहते. आणि
हीच शुभ, सकारात्मक ऊर्जा आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही सकारात्मक करते.