देवकी पंडितची १७ वर्षांनंतर रिऍलिटी रिअलिटी शो ...

देवकी पंडितची १७ वर्षांनंतर रिऍलिटी रिअलिटी शो मध्ये हजेरी (Top Playback Singer Devaki Pandit To Appear In Reality Show After 17 Years)

‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस स्पर्धा रंगत चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता महाराष्ट्राला मिळणार आहे. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ ही टॅगलाईन असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच खरंच रत्न घडवतो आहे. सध्या महाराष्ट्राला टॉप 6 स्पर्धक मिळाले असून अंतिम फेरीसाठी आता सुरांची स्पर्धा बघायला मिळते आहे. यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी लोकप्रिय गायिका देवकी पंडित येणार आहेत.

देवकी पंडित हे मराठी संगीत जगतातलं एक आदरणीय नाव. शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजवत असतानाच हिंदी-मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणार्‍या, मालिकांची शीर्षकगीते करणार्‍या देवकी पंडित यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. गेल्या तीन दशकांपासून देवकी पंडित संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपांत, वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्यांची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहे. तब्ब्ल 17 वर्षांनी देवकी पंडित पुन्हा एकदा रिऍलिटी शोमध्ये रसिकांना बघायला मिळणार आहे. देवकी पंडित यांची संगीतावर असलेली पकड, त्यांचा अभ्यास या सगळ्याने प्रत्येक नवोदित गायकाला मार्गदर्शन मिळतं. ‘इंडियन आयडल मराठी’ च्या मंचावर देवकी पंडित यांच्याकडुन रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे.