‘लताचा आवाज हा मानवी सृष्टीतला अद्भुत चमत...

‘लताचा आवाज हा मानवी सृष्टीतला अद्भुत चमत्कार’ – मान्यवरांनी व्यक्त केलेली आदरांजली (Top Marathi Writers Describe Lata’s Heavenly Voice With Respect)

‘मला आकाशात देव आहे का, हे माहिती नाही. पण आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे’ – पु. ल. देशपांडे

ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांची अभंगवाणी, अगणित काव्यपंक्ती स्वररुपाने अजरामर करणारी, या विश्वातले एक पूजनीय आश्चर्य; हिंदुत्वाची आणि स्वातंत्र्यवीरांची परमभक्त अशा लतादीदी अंतर्धान पावल्या. त्यांच्याबद्दल मान्यवरांनी व्यक्त केलेली ही आदरांजली आहे.

‘पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं… लताचा आवाज हा मानवी सृष्टीतला अद्‌भुत चमत्कार आहे. साक्षात विधात्याला चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही.’ – आचार्य अत्रे.

जुन्या जमान्यातील अभिनेत्री नरगिस एकदा म्हणाली होती की, ‘राजा की आयेगी बारात’ या गाण्यावर मला अभिनय करावा लागला नाही. ग्लिसरीन न लावता देखील आपोआप डोळे पाणावले. ही लताच्या स्वरांची किमया.’

‘लता मंगेशकर या नावातच अनेक ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ पसरलेले आहेत. एखाद्या परग्रहावर पुढेमागे इथल्या ध्वनीलहरी सोडल्या तर त्या ग्रहण करणाऱ्याला पहिला स्वर भावेल तो लतादीदींचाच.’ – पुरुषोत्तम बेर्डे.